"अलका टॉकीजचा स्मृतीगंध"
- Dec 11, 2022
- 2 min read
पुण्याचे "मराठमोळे" पण जपण्यासाठी या थियेटरने दादा कोंडकेंचे अनेक मराठी चित्रपट वर्षानुवर्षे प्रदर्शित केले.त्यामुळेच दादा कोंडकेंचे "द्वयर्थी" संवाद देखील या थियेटरच्या वाट्याला आलेले आहेत.अलका थियेटरच्या दारातील बसस्टाॅपवर बस पकडली की "अलकावर चढला का ?" असा पाचकळपणा कंडक्टर हमखास करत असे.असाच एक पाचकळ "द्व्यर्थी" प्रश्न विचारुन एकदा एका चाहत्याने साक्षात दादा कोंडकेंनाच निरुत्तर करायचा प्रयत्न केला होता.प्रश्न होता "दादा,तुमचा "पांडू हवालदार" अलकाला किती दिवस लागला होता ? दादा महाखट ! लगेच उत्तरले अलकाच म्हणाली होती "मला फ्रीज हवा" ! अशा या चित्रपटगृहाच्या "चावट" आठवणी !
वर्षभर एकाच चित्रपटाचा "ठिय्या" मांडणारे हे दादा कोंडकेंचे हक्काचे ठिकाण ! तर पूरब-पश्चिम सांस्कृतिक एकात्मकता साधण्यासाठी रात्रीचे व मॅटिनीला "इंग्रजी" चित्रपट दाखविणारे हेच त्या काळातले एकमेव थियेटर ! माझे लग्न ठरले तेव्हा माझी पत्नी MES ला शिकत होती.मग तिला भर लेक्चर मधून पळवून नेऊन तास-दीडतासात आटोपणारे अनेक "इंग्रजी" चित्रपट "मॅटिनी शो" म्हणून पाहिले.आपल्याला एक वर्ष लहान असलेला आपल्याच काॅलेजचा एक विद्यार्थी एकदा याच थियेटरच्या रांगेत उभा असताना मागच्या प्रेक्षकाने त्याला त्याचे तिकीट काढायची विनंती केली.तिकीट काढून मागे वळून पहातो तर साक्षात "तीर्थरूप" ! नशीब आमच्या दोघांवर असे धरले जाण्याची वेळ कधीच आली नाही ते !
अलका थियेटरचे हे "मराठमोळेपण" जपण्यासाठी नुकताच एक अभिनव उपक्रम तेथे राबवण्यात आला.बुधवार दि.४ ऑक्टोबर,२०२२ रोजी मास फिल्म्स प्रस्तुत,महेश काळे दिग्दर्शित "घुमा" या सिनेमासाठी चक्क पुण्याच्या "महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळा" ने आपल्या शालेय विद्यार्थ्यांसाठी अलका टॉकीज पूर्णपणे आरक्षित केले होते.शहरांमधून-गावांमधून शाळा ते सिनेमागृहापर्यंत "प्रभातफेरी" काढून विद्यार्थांचे जथ्थेच्या जथ्थे सिनेमा पाहण्यासाठी येत होते.
माझा पॅथाॅलाॅजिस्ट सहकारी डाॅ.दिलीप धारप याचे अभ्यासू तीर्थरूप श्री.बी.व्ही.धारप हे या थियेटरचे मालक ! चित्रपटसृष्टीचा त्यांचा दांडगा अभ्यास ! त्यासाठी ते एक चित्रपटसृष्टीचे मासिक देखील छापत असत.ते मुकचित्रपटसृष्टीवर FTII व NFAI येथे व्याख्याने देखील देत असत.
पुण्यातील महत्वाच्या "सहा" रस्त्यांच्या संगमावर, मुळेच्या तीरावर,जुने व नवीन पुणे यांच्या वेशीवर, रंग उडाला असला तरी मोठ्या डौलाने उभे असलेले,पन्नास वर्षांचे जुने,सर्वांना परवडणारे,हे एकाच पडद्याचे "अलका टॉकीज" म्हणजे "Art Deco style" चा उत्कृष्ट नमुनाच म्हणावा लागेल. वातानुकूलीत नसले तरी स्वच्छ व टापटीप व भरपूर पार्किंग असलेले, एक हजार प्रेक्षक क्षमतेचे, बाल्कनी व धातूचे सरक दरवाजे असलेले,दोन्ही जिन्यांच्या अंगांवर हाॅलीवूड स्टार्सचे फोटो मिरवणारे "अलका टॉकीज" हे पुण्याच्या बदलत्या गरजांचे एक "रूपक" च समजावे लागेल.कारण काळाच्या ओघात तेथे "dolby digital sound system" व "satellite projection system" बसविण्यात आली.कॅंटीनची सुविधा सुरू झाली.
"अलका टॉकीज" च्या शेजारीच ऐतिहासिक "मढ्या विठोबा" ! का तर म्हणे पेशवेकाळात या थियेटरमागे "मढी" जाळण्याचे "स्मशान" होते म्हणे ! पण याच अलका टॉकीजमधे एक "मढे" सापड्याचे आठवते का कुणाला ? त्याने मोठीच राजकीय खळबळ उडवून दिली होती. असाच एक "किस्सा" माझ्या प्रोस्थोडोंटिस्ट बंधूने सांगीतला. त्याची एक रूग्णा अलका टॉकीज समोरच्याच बसस्टाॅपवर अपघात होऊन वारली.तिच्या दहनानंतर तिच्या पतीने या प्रोस्थोडोंटिस्टने बसवलेला "कृत्रिम दात" आज ही त्यांच्या पूजेत ठेवला आहे. आहे की नाही "मढ्या विठोबा" हे नाव सार्थ ?
Comments