top of page

अहिराणी भाषेचा इतिहास

  • dileepbw
  • Sep 11, 2022
  • 3 min read

लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या मातृभूमीचा व मातृभाषेचा इतिहास

"अहिराणी" भाषा हि खान्देशातील प्रमुख भाषा आहे. हि भाषा खान्देशात प्राचीन काळापासून बोलली जात आहे. परंतु, आता दिवसेंदिवस नवनवीन शोध लागत आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्याच बरोबर भाषा ही बदलत चालल्या आहेत. अहिराणी आता काही खान्देश वासींना आवडत नाही. आणि या भाषेला तर आता "मृत भाषा" म्हणून घोषित करण्यात आले आहे. म्हणून या आपल्या अहिराणी मातेला वाचविण्याचा प्रयत्न करायला हवा .

मंडळी, अहिराणी भाषा म्हणजे श्री कृष्णदेवांचा आशिर्वाद आहे. महाभारतात खान्देशावर एक कथा आहे. श्री कृष्णदेव आणि जरासंध यांच्यात चौदा वेळा युद्ध झाले. तेरा वेळा श्री कृष्णदेवांचा विजय झाला. चौदाव्या युद्धात मात्र जरासंधाला विजय मिळाल्यावर जीव वाचवण्यासाठी देव मथूरेहून द्वारकेला पळाले, म्हणून त्यांस "रणछोडदास" असे म्हणतात.

हे रणछोडदास द्वारकेकडे जात असतांना रस्त्यात खांडव वन लागले. इथे त्यांनी काही वर्षे मुक्काम केला. ते पशूपालांचा राजा असल्यामुळे त्यांच्या सोबत असंख्य मेढपाळ व गोपाळांचा समूह होता. खांडव वनात चारा पाणी भरपूर होते. मैलोनमैल जमीन होती. या ठिकाणी हे पशूपाल खुपच रमले.

या पशूपालांना "अहिर" म्हणत. आणि त्यांची बोलण्याची भाषा म्हणजे "अहिराणी" भाषा होय.

पुढे द्वारकेच्या दिशेने जायचे ठरल्यावर काही लोकांनी नकार दिला. कृष्णदेवांच्या संमतीने त्यांनी खांडव वनातच वसाहत निर्माण केली. आपल्या लाडक्या राजाचे नाव या प्रदेशाला दिले. कन्हैयाचा कान्हदेश. पुढे याच कान्हदेशाचा अपभ्रंश खान्देश असा झाला.

या कान्हदेशाची राजधानी नंद राजाच्या नावावरून वसवली. तिचे नाव नंद दरबार व पुढे याचा अपभ्रंश नंदुरबार असा झाला .

खान्देशात महाभारतातील कौरव, पांडवाच्या नावावरून तर भरपूर गावे आहेत.

आणि ती पुढीलप्रमाणे : -

नन्द राजाच्या नावावरून नंदान

धर्म च्या नावावरून धमानं

भीमच्या नावावरून बामनं

अर्जुन च्या नावावरून जूनून

जयद्रथ च्या नावावरून जैतान

श्रीधर च्या नावावरून शिरधार

मुकुंदा च्या नावावरून कुंडान

गोविन्दा च्या नावावरून वैदान

अस्वत्थामा च्या नावावरून आस्तान

बलराम च्या नावावरून बळसान

दुशासन च्या नावावरून दूसान

अशा प्रकारची नावे गावांची आहेत व त्या समोर त्यांची अपभ्रंश झालेली नाव आहेत तर काही नाव जशीच्या तशी आहेत.

श्रीकृष्णाचा चुलता म्हणजे उध्दवाचे वडिल देवभान हे नाव जसच्या तस एका गावाच आहे.

भगवान श्रीकृष्णाच्या धनुष्याच नाव सारंग धनुष्य होते. या नावाच गाव दोंडाइचे आणि शहाद्याच्या मधे तापीच्या काठावर आहे. याच जागी भगवान श्रीकृष्ण धनुष्य बाणाचा सराव करायचा त्याच मैदानात त्याने नारायणी सेना घडवीली.त्या जागेवर जे गाव वसले त्याच नाव "सारंगखेडा" ! या ठिकाणी महानुभाव पंथियांचा दत्त आहे त्याची मोठी यात्रा भरते. तो त्रिमुखी दत्त नसून एकमुखी दत्त म्हणजेच दत्तात्रय !

प्रभु म्हणजेच श्रीकृष्ण ! श्रीकृष्णाची जात अहीर होती. अहीर म्हणजे गवळी ! हे अहीर लोक जी भाषा बोलतात ती अहिराणी ! अहिरांची भाषा ती अहिराणी.

अशी ही श्रेष्ठ अहिराणी भाषा. या अहिराणी भाषेवर आणि खान्देशावर कितीही लिहिले तरी कमीच आहे. कारण की, हि एक वीरांची भूमी आहे. या भूमीवरती शूरवीर जन्माला आले, आणि या भूमातेला आणखीन पवित्र केले.

भक्तप्रल्हाद, बळीराजा, सितेची आबरू वाचवण्यासाठी बलिदान करणारा घृधराज महाबली जायल(जटायू). अर्जूनापेक्षाही वरचड असलेला धनुर्धारी निषाध राजा एकलव्य, रामभक्त शबरी भिल्लिण, दरभंग रूषी, पवनपुत्र हनुमान ही सर्व मंडळी खान्देशी होती.

महाराष्ट्राबाहेर मराठी साम्राजाचा विस्तार करणारे लढवय्ये खान्देशीच आहेत. इंदूरचे मल्हारराव होळकर तळोदयाचे होते. बुंदेल खंडाची राणी लक्ष्मीबाई झांसीवाली पारोळ्याची कन्या होती. बडोद्याचे दानशूर राजे सयाजीराव गायकवाड कौळाणे (मालेगाव) येथील होते. अहिल्याबाई होळकर अशी कितीतरी नावे घेता येतील.

राम रावण युद्धात न्यायाच्या बाजूने लढतांना पहिला बळी जटायूंच्या नावाने जसा खान्देशी माणसाचा गेला, अगदी तसेच बलिदान ब्रिटीशांविरोधात लढताना खान्देशी लोकांनी केले. ब्रिटिश सत्ते विरूध्द स्वातंत्र्य युद्ध पेटवून ब्रिटिशांची पहिली गोळी छातीवर झेलणारी झाशीची राणी जशी होती तशी या युद्धात शेवटची गोळी छातीवर झेपणारा वीर बालक शिरीष कुमार खान्देशी होता.

अशा या पावन भूमीवर महान अहिराणी भाषिक होऊन गेले. खाज्या नाईक (शिरपूर, सेंधवा), महाराजा सयाजीराव गायकवाड (कवळाणे), रा.ग.गडकरी (गणदेवी), वि. का. राजवाडे (धुळे), महादेव गो. रानडे (निफाड), डॉक्टर. उत्तमराव पाटील (डांगरी), डॉ. लिलाताई पाटील (डांगरी), बहिणाबाई चौधरी (असोधा), पां. स. साने गुरुजी (अमळनेर),भाऊसाहेब हिरे (दाभाडी), ध.ना.चौधरी (फैजपूर), ग.द.माळी गुरूजी (शिरपूर), शिरीष कुमार मेहता (नंदुरबार), दादासाहेब गायकवाड (आंबे-दिंडोरी), श्री. अ.डांगे (करंज), दादासाहेब फाळके (नाशिक), वि. वा. शिरवाडकर (नाशिक), तर्कतिरथं लक्ष्मणशास्त्री जोशी (पिंपळनेर), लताताई मंगेशकर (थाळनेर),तंटया भिल्ल (रावेर-बरहाणपुर).हे खान्देशातील माणिकमोती. या बरोबरच आणखीन भरपूर अहिराणी माणिकमोती आहेत.

परंतु, आज याच अहिराणी मातेवरती खुप वाईट दिवस आले आहेत. आज तिच्याच काही पुत्रांना जन्मभूमी बद्दल ज्ञान नाही. अतिशय मायाळू असणार्‍या या आईचे तिचेच काही पुत्र तिरस्कार करत आहेत.

मंडळी, भाषा निर्माण होण्यासाठी हजारो वर्षे लागतात. आणि तिचाच आज नकार करणे हे चुकीचे आहे. आणि ते ही आपल्या अहिराणी भाषेचे.

आज अहिराणीला वाचवणे ही काळाची गरज आहे. कारण अहिराणी गेली की, सगळेच संपेल. आपले अस्तित्व ही संपेल. कारण ही महाराष्ट्रात मराठी भाषेसारखीच पवित्र भाषा आहे. म्हणूनच या भाषेला जिवंत ठेवायला हवे. तिचा आदर करायला हवे. अहिराणीच काय प्रत्येक भाषेचा मानवाने आदर करायला हवा.

आपला कृपाभिलाषी,

प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी

व्यवस्थापक

फेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या - ७६३२)

 
 
 

Recent Posts

See All
"Oppenheimer - Part २०"

"Oppenheimer - Part २०" काल रात्री जावई सागर,कन्या किर्ती,बंधू सुहास,वहिनी प्रतिभा व पत्नीची वहिनी माधवी असा सहकुटुंब सहपरिवार घरबसल्या...

 
 
 
"आपटा रेल्वे स्टेशन"

"आपटा रेल्वे स्टेशन" माझ्या आयुष्यात "पनवेल-आपटा रेल्वे स्टेशन" ला मनोरंजनाच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे. अकरावी,पी.डी.व...

 
 
 
"मृगागड किल्ला, ता.सुधागड,जि.रायगड"

"मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" आपला वर्गमित्र बापू घोडके यांने नुकताच "मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" हा आपल्या सुवर्ण महोत्सवी...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page