ग्रीको-रोमन व्यापार
- dileepbw
- Sep 9, 2022
- 2 min read
लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या लोकांचा रोम व ग्रीस पर्यंत चालणारा व्यापार"
नुकतेच डेक्कन काॅलेज,पुणे येथील संशोधिका सौ.सायली पलांडे (दातार) यांनी प्राचीन काळी जुन्नर येथून "रोम" शी सुरू असलेल्या व्यापाराचे पुरावे शोधून काढले असल्याची माहिती वाचली.डाॅ.आरती देशपांडे(मुखर्जी), डेक्कन काॅलेज यांनी लाड सका वाणी समाजाचे तत्कालिक वास्तव्य असलेल्या दक्षिण गुजरात(लाड देश) व सौराष्ट्र येथून शंख(Turbinella pyrum shell) आयात करून त्या पासून बांगड्या तयार करायचा कासार समाजाचा उद्योग जुन्नर व पुणे परीसरात चालत असे,असे म्हटले आहे.तसेच श्रीकांत जाधव,वसंत शिंदे(डेक्कन काॅलेज),राजेंद्र बुट्टे पाटील,बापू ताम्हाणे व योगेश फुलपगर या संशोधकांच्या चमूने देखील हा माल थेट रोम मधे ग्रीक व रोमन लोकांना विकला जायचा असे म्हटले आहे.
या शंखांबरोबरच दक्षिण गुजरात(लाड देश) प्रांतातील काही "सका/शक/Scythian" पशुपालक(अभीर) लोक आपल्या गायी विकण्यासाठी जुन्नर या आंतरराष्ट्रीय व्यापारी पेठेत "लाड टेकडी, गोळेगाव,जुन्नर" येथे दाखल झाल्याची माहिती जुन्नरचे स्थानिक नागरिक श्री.बापू ताम्हाणे यांनी दिली.
माझ्या "सका/शक/Scythian" लोकांच्या अभ्यासात जुन्नरच्या सातवाहन राजांचा पराभव करून तेथे नाशिकच्या "सका/शक/Scythian" राजांनी (नहपान) आपली व्यापारी राजधानी स्थापन केल्याचा इतिहास वाचनात आला होता.या "सका/शक/Scythian" राज्यकर्त्यांच्या पाठोपाठ लाड सका वाणी समाजातील काही व्यापारी जुन्नरला जाऊन पोहोचले असावेत. त्यापैकी दक्षिण गुजरात (लाड देश) मधे "अभीर" म्हणून ओळखले जाणारे पशुपालक लोक आपल्या गाई विकण्यासाठी जुन्नरला गेले व तेथे त्यांनी "लाड टेकडी, गोळेगाव,जुन्नर" येथे आपले पशुपालन, पशुसंवर्धन व पशुविक्री केंद्र उभारल्याची माहिती बापू ताम्हाणे यांनी दिली.
लाड सका वाणी समाजातील काही कुशल लोक "टांकसाळ" व्यवस्थापनाच्या व शिक्के(नाणी) निर्मितीच्या व्यवसायात देखील होते.ते दक्षिण गुजरात(लाड देश) व खानदेशात "लाडशिक्के" या नावाने ओळखले जात असत.जुन्नर ही आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असल्याने तेथे "टांकसाळ" असली पाहिजे. त्या टांकसाळीत काम करण्यासाठी काही "लाडशिक्के" लोकांनी जुन्नरला स्थलांतर केले असावे.जुन्नर येथील "लाड सुवर्णकार समाज" याबद्दल अधिक माहिती देऊ शकेल.याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न चालू आहे.
जुन्नरजवळील कल्याण,चौल,सोपारा या बंदरांमधून अरबी समुद्र व आखाती देशमार्गे थेट ग्रीस व रोमशी व्यापार चालत असे.या व्यापारावर ताबा मिळविण्यासाठी पैठणचे "सातवाहन" व नाशिकचे "सका/शक/Scythian" राजे यांच्यात सतत धुमश्चक्री सुरू असे. त्यात कुशाण,महाभोज, महारथी(मराठी) राजेही सहभागी होत असत.
(संदर्भ - Periplus of Erythrian Sea,Ptolemy’s Geography, Geographer Pliny's books)
इ.स.४५ साली Hippalus नावाच्या ग्रीक खलाशाने माॅन्सून वार्यांचा शोध लावून समुद्रमार्गे आफ्रिका खंडाला वळसा घालून भारतात प्रवेश केला व भारताचा रोमशी समुद्रमार्गे व्यापार सुकर केला.तत्पुर्वी इ.स.पू.३० साली ग्रीक सम्राट Augustus याने इजिप्त देश जिंकून "भारत-रोम" हा व्यापार जमिनीवरील(खुश्की) मार्गाने सुरू केलेलाच होता.इ.स.च्या तिसर्या शतकात रोमची आर्थिक स्थिती ढासळल्याने हा व्यापार(रेशीम,मोती,कापूस,सुती कपडे,नीळ,हस्तीदंत,मसाल्याचे पदार्थ,वाघ,माकडे,चित्ते,मोर,गेंडे इ.)
मंदावला.त्यातच भारतातील बंदरे गाळाने भरली व समुद्रमार्गे होणारा व्यापारही अडचणीत आला. रोम हून येणारे सोने,चांदी व मद्य यायचे बंद झाले.मद्याची व्यापारी वाहतूक करण्यासाठी आवश्यक असलेली अजस्त्र रोमन "मद्यपात्रे(Amphora)" भारतातील अनेक प्राचीन व्यापारी शहरांमधे (Barygaza/Bharuch, Shurparak/Sopara, Kalyan, Chaul इ.) उत्खननात सापडली आहेत. हे येथे लक्षात घेण्यासारखे आहे.
जुन्नरमार्गे कोकणात शिरायच्या मार्गावर(नाणेघाट) अनेक ठिकाणी व्यापारी लोकांची प्राचीन वसतीस्थाने(गुंफा,लेणी,स्तूप इ.) आढळतात ती यामुळेच ! पैठण,नेवासा,तगर/तेर,आंध्र प्रदेशातील अमरावती,कराड, कोल्हापूर,भाजे,बेडसे,कार्ला,शेलारवाडी, हिंजेवाडी जवळचे माण,पुण्यातील वृध्देश्वर व पांडव लेणी,तसेच हनुमान टेकडी व वडारवाडी येथे सुध्दा अशी व्यापारी लोकांची वसतीस्थाने(गुंफा,लेणी,स्तूप इ.) आढळतात.
ज्या लाड सका वाणी समाज बांधवांना आपल्या "सका/शक/Scythian" पूर्वजांचा अभ्यास करायचा आहे त्यांनी या स्थानांना आवर्जून भेट द्यावी.ही विनंती.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी
व्यवस्थापक
फेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या दीड लाख)
Comments