जनकल्याणचा पुणेरी भेळभत्ता
- dileepbw
- Aug 2, 2021
- 2 min read
"जनकल्याणचा पुणेरी भेळभत्ता"
माझ्या बालपणात आम्ही दोघे भाऊ भुकेने कोकलायला लागलो की आमची माऊली आम्हाला दोघांना कामाला लावून हमखास "भेळभत्ता" बनवित असे.याचे मूळ तिचे माहेर जायखेडा,नाशिक हे होते.तिच्या माहेरचा पसारा खूपच मोठा ! चार भाऊ व पाच बहिणी ! त्यांची "भूक भूक" सुरू झाली की माझी आजी मणभर चुरमुर्याचा "कच्चा चिवडा" बनवून सर्वांसमोर आदळत असे.आम्ही डझनभर नातवंडांनी देखील "मामाच्या गावाला" गेल्यावर हा अनुभव घेतलेला आहे. खानदेशातील जीभाऊंना देखील हे "पारंपरिक इन्स्टंट फूड" नवीन नसावे.प्रसंगी लाह्या व लोणच्याचा खार देखील वापरला जात असे.
हा "सदाबहार भेळ भत्ता" जनकल्याण रक्तपेढीच्या स्थापनापूर्व तसेच ऐन उमेदीच्या काळात आम्हाला चांगलाच उपयोगात आला.या "सदाबहार भेळ भत्ता" चीच री ओढत जनकल्याण रक्तपेढीच्या अनेक बैठका व विविध कार्यक्रम संपन्न झालेले आहेत.यात लागणारे नगदी पदार्थ म्हणजे मुरमुरे, फुटाणे, डाळया हे तात्काळ वर्गणी करून किंवा एखाद्याला स्पॉन्सरर(बकरा) बनवून विकत आणले जात. बाकी पूरक वस्तु म्हणजे तिखट, मीठ, तेल, कांदे, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर वगैरे जवळच्या मित्रांच्या घरांतून हक्काने मागून आणले जात असत.याशिवाय ऋतुप्रमाणे सिझनल वस्तुंचाही भरणा असे.आंबट गावराणी बोरे, पातीचे कांदे, पातीचे लसूण, उन्हाळ्यात बारीक चिरलेल्या कच्च्या कैऱ्या आणि ज्याला जे सुचेल ते अशी रेसिपी रहायची.हा चिवडा तयार करण्यासाठी तेंव्हा वर्तमान पेपराचाच वापर होई.पेपर अंथरून त्यावर तयार केलेला चिवड्याचा डोंगर भोवताली मंडल करून बसलेले रक्तपेढीचे आबालवृद्ध कार्यकर्ते बैठकीत वेगाने हा भेळ भत्ता हाणून फस्त करीत असत.वेगळ्या थाळ्या, चमचे हे फाजील लाड अजिबात नसायचे.ही लंगर पद्धत बहुधा माझ्या आईच्या माहेरून आली असावी.कांदा, टमाटे वगैरे मुळे ओलसर होऊन वातड पडण्याची संधी मुरमुऱ्यांना कुणीही देत नसे. त्या चिवड्याच्या डोंगराचे काही मिनिटांतच "ग्राउंड झिरो" होऊन पुरावा नष्ट केला जाई. मग वरून माठातले पाणी प्यायल्यावर मुरमुरे पोटात फुगल्यावर एकदम 'सट्ट' नाश्ता झाल्याचा भास व्हायचा.
जनकल्याण रक्तपेढ्यांची उभारणी ही अशी "भेळ भत्त्या" च्या भरवशावर झालेली आहे.व्यावसायिक आयुष्यात सुध्दा मेडीकेअर लॅबोरेटरीत आजूबाजूच्या मित्रमंडळींचा संध्याकाळी "सामूहिक भेळ भत्ता" चा उद्योग चालत असे. कालांतराने ही प्रथा हळूहळू कमी होत गेली.कारण हॉटेलातून समोसे,बटाटेवडे,भजी वगैरे येऊ लागले.पण अधून मधून धूमकेतूसारखा उगवणारा "भेळभत्ता" अजूनही आपले मानाचे स्थान टिकवून आहे.
या "भेळभत्त्याचा महिमा" पाहून पानिपतच्या लढाईचा एक किस्सा आठवतो.पानिपतच्या लढाईच्या आदल्या रात्री अहमदशहा अब्दाली पेशव्यांच्या सैन्याची दुर्बिणीतून पहाणी करीत असतो.त्याला ठिकठिकाणी "जाळ" पेटलेले दिसतात.त्याला वाटते "शस्त्रे परजणे" चालू आहे.पण हेर सांगतात त्या "स्वयंपाकाच्या चुली" पेटलेल्या आहेत. डझनावारी चुली पाहून अहमदशहा अब्दाली एकदम उद्गारतो - आपला विजय निश्चित आहे ! "जे लोक जेवायला एकत्र येत नाहीत,ते मरायला कसे एकत्र येतील ?"
हे वाक्य भारतीयांबद्दल बरेच काही सांगून जाते.त्यामुळेच
जनकल्याण रक्तपेढीतील व मेडीकेअर लॅबोरेटरीतील "सामूहिक भेळ भत्ता" या उद्योगाचे महत्व अधिकच अधोरेखीत होते.




Comments