जनकल्याण रक्तपेढी,महाडची दुर्दशा
- Aug 4, 2021
- 1 min read
जनकल्याण रक्तपेढी,महाडची दुर्दशा
"महाड" हे सह्याद्री रांगांनी घेरलेले व सावित्री आणि गांधारी नद्यांच्या काठावर वसलेले शहर !
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक (क्रांतिभूमी) तसेच "चवदार तळे" यासाठी सुप्रसिध्द असलेले शहर ! एका बाजूला डोंगर रांगा व दुसर्या बाजूला पावसाळ्यात दुथडी भरून वहाणारी "सावित्री" नदी ! त्यातच मानव निर्मित मुंबई-गोवा महामार्गाच्या उंचवट्यामुळे पाण्याच्या प्रवाहाला निर्माण झालेला मोठाच कृत्रिम अडथळा ! त्यामुळे पावसाळ्यात पूराचे पाणी शहरात शिरणे,समुद्र वादळांना तोंड देणे,मुसळधार पावसाच्या धारा झेलणे या गोष्टी या शहराला नवीन नाहीत.या नैसर्गिक तसेच मानव निर्मित अडचणींना तोंड देत जनकल्याण रक्तपेढी, महाड गेली अनेक वर्षे "अहर्निश सेवामहे" या बाण्याने समस्त कोकणवासीयांना अखंड "रक्तसेवा" पुरवित आहे.याला अपवाद फक्त जुलै २२,२०२१ ते आॅगस्ट ४,२०२१ या महापूराच्या "भयावह" काळाचा !
या सर्व संभाव्य आपत्तींचा विचार करूनच जनकल्याण रक्तपेढी,महाडची वास्तुरचना केलेली आहे.विनामूल्य मिळालेला सखल भागातला भूखंड विस्तीर्ण पार्किंग संपूर्णपणे मोकळे ठेवून पहिल्या व दुसर्या मजल्यावर रक्तपेढी वसवलेली आहे.पार्किंगमधला जनरेटरसुध्दा नेहमी साठणार्या पाण्याच्या पातळीच्या वरच राहिल असा पाच फुट उंचीच्या कट्ट्यावर स्थानापन्न झालेला आहे.रक्त संकलनाची किमती व्हॅन(रू.३२ लाख) देखील पावसाळ्याच्या दिवसात आपले रोजचे पार्किंग सोडून उंचावरील मोकळ्या जागेत ठेवायची काळजी घेतली जाते. पण एवढी काळजी घेऊन देखील "अस्मानीको कौन क्या कर सकता हैं ?" असे म्हणायची वेळ या वेळच्या महापुराने आणली आहे.हे मात्र खरे ! उंचावरील जागाच काय तर अख्खे शहरच या महापुराने १७-१८ फुट खोल पाण्यात बुडवून टाकलेले आहे.
कालच्या माझ्या भेटीत नदीकाठच्या उंच झाडांवर अडकून पडलेले नागरिकांचे कपडे,चादरी,प्लॅस्टिकच्या पिशव्या व अन्य गृहोपयोगी साहित्य याची मूकपणे व असहाय्यपणे साक्ष देत होते.जागोजागी साठलेले या वस्तूंचे ढीग मन अक्षरश: हेलावून सोडत होते.
Comments