जनकल्याण रक्तपेढी,महाडचे पुन:प्रस्थापनेत सर्व धर्मीयांचा सहभाग
- dileepbw
- Aug 25, 2021
- 2 min read
"जनकल्याण रक्तपेढी,महाडचे पुन:प्रस्थापनेत सर्व धर्मीयांचा सहभाग"
जनकल्याण रक्तपेढी,महाडच्या सध्याच्या वास्तूचा पायाभरणी समारंभ डॉ.आंबेडकर राष्ट्रीय स्मारक,महाड या भव्य वास्तूमधे झाला होता.त्यावेळी तेथील चवदार तळ्याला भेट दिली होती.तेथे दि.२० मार्च १९२७ रोजी मा.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यांना तळ्यातून पाणी घेता यावे म्हणून सत्याग्रह केला होता.हा दिवस "सामाजिक सबलीकरण दिन" म्हणून भारतात साजरा केला जातो.ही आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली लोकांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन केलेली पहिली सामायिक कृती होती.या सत्याग्रहास महाडचा सत्याग्रह, चवदार तळ्याचा सत्याग्रह, महाडचा मुक्तिसंग्राम किंवा महाडची सामाजिक क्रांती म्हणूनही ओळखले जाते.असा गौरवशाली इतिहास असलेल्या महाडकरांना जनकल्याण रक्तपेढी,महाडच्या पुन:प्रस्थापनेत कसे सहभागी करून घेता येईल याचा विचार करताना हाती लागलेली माहिती सर्वांना सादर करतो.आपले बहुमूल्य मत अवश्य प्रदर्शित करावे.
बौद्ध धर्म हा स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, करुणा, मैत्री (प्रेम), प्रज्ञा, मानवी मूल्ये, विज्ञानवाद या तत्त्वांचा पुरस्कर्ता आहे. आधुनिक विज्ञान आणि मानवी मूल्यांचे समर्थन करणारा धर्म म्हणून बौद्ध धर्माला एक वेगळी ओळख मिळालेली आहे.या विचारांना
जनकल्याण रक्तपेढी,महाडच्या पुन:प्रस्थापनेत कसे स्थान द्यावे ?
जगभरातील अनेक मानवतावादी विज्ञानवादी लोकांनी बौद्ध धर्माचे अनुयायित्व पत्करले आहे.त्यामुळे बौद्ध धर्म हा जगातील सर्वाधिक अनुयायी असलेला धर्म ठरतो."शील मार्ग" अनुसरण्यासाठी या धर्माने सांगीतलेल्या "दहा पारमिता" मधे "दान" ही एक महत्वाची संकल्पना सांगीतलेली आहे.स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करता दुसऱ्याच्या भल्यासाठी स्वतःची मालमत्ता, रक्त, देह अर्पण करणे असे बौध्द धर्म सांगतो.रक्तपेढीचे काम हे या विचारांचेच मूर्तीमंत रूप आहे.असे मला वाटते.आपल्याला काय वाटते ? जनकल्याण रक्तपेढी,महाडची पुन:प्रस्थापना ही मला "उपेक्षा(निरपेक्षतेने सतत प्रयत्न करीत राहणे.),
वीर्य(हाती घेतलेले काम यत्किंचितही माघार न घेता अंगी असलेल्या सर्व सामर्थ्यानिशी पूर्ण करणे.),अधिष्ठान(ध्येय गाठण्याचा दृढ निश्चय.),करुणा(सर्व प्राणिमात्र, मानवाविषयीची प्रेमपूर्ण दयाशीलता.),मैत्री(मैत्री म्हणजे सर्व प्राणी, मित्र, शत्रूविषयी देखील नव्हे तर सर्व जीवनमात्रांविषयी बंधुभाव बाळगणे.) या "पारमितां" चा अवलंब केल्यास जनकल्याण रक्तपेढी,महाडची पुन:प्रस्थापना करणे सहज सुलभ होईल.आपल्याला काय वाटते ?
प्रत्येक गोष्टीला कारण असते, आपोआप कुठलीही गोष्ट होत नाही असा विज्ञानाचा सिद्धान्त आहे. त्यामुळे हा महापूर म्हणजे निसर्गाने दाखविलेला चमत्कार,अद्भुत शक्ती, मंत्र इत्यादी मानण्याचे कारण नाही.कारण असे काही अस्तित्वात नाही हाच सिद्धान्त भगवान बुद्धांनी "प्रतित्य समुपाद" या नावाने मांडला. त्यात बुद्धांनी सांगितले की, प्रत्येक गोष्टीला कारण असते. कारणाशिवाय काहीही होत नाही. यालाच धम्मात "कार्यकारणभाव सिद्धान्त" म्हणतात. बौद्ध धर्माचा प्रत्येक सिद्धान्त विज्ञानाच्या कसोटीला उतरतो. जगाच्या पाठीवर घडणारी प्रत्येक घटना ही ही कुठल्या ना कुठल्या कारणामुळे घडत असते हे सांगत असतानाच गौतम बुद्धांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून या जगातील सर्व गोष्टींचा विचार केलेला दिसतो. कुठली गोष्ट नित्य नाही व ती कायम टिकणारी नाही. जी प्रत्येक गोष्ट जगामध्ये निर्माण होते ती अनित्य असून तिचा नाश होतो त्यामुळे सम्यक दृष्टिकोन ठेवून आपण प्रत्येक गोष्टीकडे पाहिले पाहिजे.निसर्गाचे चक्र हे कायम असून माणसाची "आसक्ती" हे त्याच्या दुःखाचे मूळ कारण आहे असे प्रतिपादन गौतम बुद्धांनी केले.या महापूराची कारण मीमांसा देखील याच सिध्दांताच्या निकषावर शोधली पाहिजे.
जेव्हा आम्ही निसर्गाचा ग्रंथ उघडतो, तेव्हा कोट्यवधी संवत्सरांतील रक्त आणि अश्रूंनी लिहिलेली उत्क्रांतीची गाथा वाचतो, जेव्हा जीवन नियंत्रणाचे नियम आणि विकासाच्या उत्पत्तीस कारणीभूत होणारे नियम आपण अभ्यासतो, तेव्हा ईश्वर प्रेमरूप आहे हे मत किती फसवे आहे याची जाणीव होते.नाही तर हा "महापुर" आला असता का ?
महाड व पोलादपूर तालुक्यात २२ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे जी पूरपरिस्थिती निर्माण झाली त्यामुळे आरोग्य, साफसफाई, पाणीपुरवठा इत्यादी अत्यावश्यक बाबींबर तात्काळ उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.त्यासाठी महाड व पोलादपूर नगरपरिषदेस वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत शासनाच्या नगर विकास विभागाच्या २६ जुलैच्या शासन निर्णयान्वये महाड नगरपरिषदेसाठी रक्कम रु. ५० लाख देण्यात आले आहेत.या कामावर लक्ष ठेवण्राचे महत्वपूर्ण कार्य आपल्याला करावे लागणार आहे.आपण काय प्रकारची मदत करू शकाल ?




Comments