जनकल्याण रक्तपेढी,महाडच्या दुर्दशेतून घेतलेला धडा
- Aug 5, 2021
- 2 min read
"जनकल्याण रक्तपेढी,महाडच्या दुर्दशेतून घेतलेला धडा"
"महाड" हे सह्याद्री रांगांनी घेरलेले सावित्री,काळ आणि गांधारी नद्यांच्या काठावर संगमांजवळ वसलेले शहर ! त्यामुळे पावसाळ्यात पूराचे पाणी शहरात शिरणे,समुद्र वादळांना तोंड देणे, मुसळधार पावसाच्या धारा झेलणे या गोष्टी या शहराला नवीन नाहीत.या नैसर्गिक तसेच मानव निर्मित अडचणींना तोंड देत जनकल्याण रक्तपेढी, महाड गेली अनेक वर्षे "अहर्निश सेवामहे" या बाण्याने समस्त कोकणवासीयांना अखंड "रक्तसेवा" पुरवित आहे. याला अपवाद फक्त जुलै २२,२०२१ ते आॅगस्ट ४,२०२१ या महापूराच्या "भयावह" काळाचा ! या हानीचा अंदाज घेण्यासाठी काल महाड शहराला भेट दिली.काय अनुभवले ?
मुंबई-गोवा महामार्गाने महाड फाट्याला पोहोचताच मदत घेऊन आलेल्या वाहनांचा व व्यक्तींचा ताफा दृष्टीस पडला. शहरात शिरायला कोणी फारसे उत्सुक नव्हते.घाबरत होते. त्यामुळे जो मागेल त्याला महामार्गावरच मदत सुरू होती. तो खरा गरजवंत आहे की नाही याची खात्री न करताच ! कुणाला काय मदत करायची आहे हे आमचे नियोजन निश्चित असल्याने आम्ही थेट शहरातच शिरलो.आमच्या गाडीत कपडे व खाद्य पदार्थ नसून फक्त "रक्त" आहे हे समजातच ही मंडळी तत्काळ पसार झाली.आपत्तीच्या वेळी सुध्दा दुर्जनांना शहाणपणा येत नाही.तर ती त्यांना "सुवर्णसंधी" वाटते.हे अनुभवायला मिळाले.
शहरात शिरलो तेच मुळी सावित्री मातेच्या काठाकाठाने ! नदीकाठच्या उंचचउंच झाडांवर सुमारे १७-१८ फुट उंचीवर लोकांचे कपडे,आंथरूणे,पांघरूणे,गृहपयोगी वस्तू झालेल्या विनाशाच्या पताका फडकावीत "दैन्याची लक्तरे" आसमंताला व पाहुण्यांना दाखवित होती.जागोजागी शहरातून जमा झालेला "मलबा" म्लानमुखाने आमचे स्वागत करीत होता.विषण्णमनाने नाक्यावरून वळालो व थेट रक्तपेढीकडे निघालो.शहरात सर्वत्र सफाई कामगार,बुल डोझर,जेसीबी व अन्य यंत्रे कार्यरत होती.पंधरा दिवसात बहुतेक सर्व रस्ते स्वच्छ झालेले दिसत होते.पण चौकाचौकात "मलबा" ढीग स्वरूपात साठलेला होता.शहर पुरते स्वच्छ व्हायला अजून काही काळ जाईल याची "साक्ष" देत होता.
मलब्याच्या या ढिगार्यांमधून वाट काढत रक्तपेढीमधे पोहोचलो तेव्हा विषण्ण मनाने पण आतुरतेव मदतीची वाट पहाणार्या सर्व कमचार्यांनी "साश्रू नयनां" नीच आमचे स्वागत केले.फक्त एका वाक्यात त्यांचे सांत्वन केले.केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देश तुमच्या पाठीशी उभा आहे.आम्ही सर्वांकडून तुमच्यासाठी मदत आणली आहे.उद्यापासूनच "रक्तसेवे" च्या कामाला लागायचे आहे.त्यांना बराच धीर आला.पण जेव्हा त्यांच्या घरा-दाराची चौकशी सुरू केली तेव्हा मात्र त्यांना "दु:खाचा उमाळा" आवरेना.महाडच्या वाहनचालकाचे घर संपूर्ण वाहून गेल्याचे ऐकून क्षणभर मलाही काय बोलावे हेच सुचेना !
क्षणाचाही वेळ वाया न घालविता व पाण्याचा थेंबही तोंडात न टाकता आम्ही सर्वात मोठी हानी झालेल्या बेसमेंटमधील जनरेटर,गाडी,शवपेटी व रूग्णोपयोगी साहित्य यांची पहाणी व नोंदणी सुरू केली.त्याचा गोषवारा तुम्हाला क्रमाने सांगणारच आहे.तो पहा व आपणच ठरवा.काय आर्थिक मदत करायची ते !
Comments