दादा कोंडके
- Aug 8, 2021
- 4 min read
आज दि.८ आगस्ट हा द्विअर्थी व विनोदी ढंगातील संवादफेकीमुळे अत्यंत लोकप्रिय झालेले मराठी अभिनेते श्री.कृष्णा खंडेराव कोंडके ऊर्फ दादा कोंडके यांचा जन्मदिन ! विनोदाच्या या बादशहाला त्रिवार सलाम !
"विच्छा माझी पुरी करा" या वसंत सबनीस-लिखित वगनाट्यामुळे दादा कोंडके अभिनेता म्हणून प्रसिद्धीस आले. इ.स. १९६९ साली भालजी पेंढारकरांच्या "तांबडी माती " या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले.सोंगाड्या (इ.स. १९७१), आंधळा मारतो डोळा (इ.स. १९७३), पांडू हवालदार (इ.स. १९७५), राम राम गंगाराम (इ.स. १९७७), बोट लावीन तिथे गुदगुल्या (इ.स. १९७८) हे त्यांचे विशेष गाजलेले चित्रपट होते.
माझ्या सारख्या "व्हाईट कॉलर्ड(पांढरपेशा)" रसिकाला देखील दादांनी मोहित केले हे मात्र खरे ! मराठी भाषा किती लवचिक आहे ते या पठ्ठ्याने मला शिकविले. चित्रपटातल्या तारिकेशी पडद्यावरची नको तितकी घसट व ह्या सर्वामुळे सतत सेन्सॉर बोर्डाशी उडणारे खटके/वादंग ह्यांनी त्यांच्या चित्रपटांना सतत निगेटिव्ह प्रसिद्धी मिळत राहिली. पिटातल्या प्रेक्षकांना ह्या सर्वाशी काही देणे घेणे नव्हते. दादांचा प्रेक्षक वर्ग ठरलेला असे. दूरदर्शन अस्तित्वात नसलेल्या काळात - दिवसभर घाम गाळून विरंगुळ्याच्या चार क्षणांसाठी पिटात शिट्या वाजवत 'गंगू' च्या तंगड्यांची चर्चा करणारा वर्ग हा त्यांच्या चित्रपटांचा 'मायबाप' होता.
बॅंड पथकातून सुरुवात करून हळूहळू वगनाट्ये, नाटके ह्यांनी सुरुवात केलेल्या दादांचे चित्रपट जीवन मेहनतीने साकारले गेले. नाटकांच्या निमित्ताने केलेल्या राज्यभराच्या दौऱ्यांनी दादांना सर्वसामान्यांसाठी करमणुकीचे महत्त्व व कोसा-कोसांवर बदलत जाणारी रसिकता कळली व हेच पुढे त्यांच्या यशाचे गमक सिद्ध झाले.मी शाळेत असताना पनवेलला त्यांचे मा.श्री.बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेतील भाषण ऐकले होते.एवढी गर्दी दादांमुळे जमली का बाळासाहेबांमुळे हा प्रश्न मला त्यावेळी पडला होता.
सबनिसांनी लिहिलेल्या "विच्छा माझी पुरी करा" ह्या नाटकाने दादांना सुपरस्टार रंगकर्मी बनवले. १५०० च्या वर प्रयोग झालेल्या ह्या नाटकामुळे दादांना भालजींच्या चित्रपटात काम करण्याची संधी प्राप्त झाली. आशा भोसले 'विच्छा.... ' चा मुंबईतला एकही प्रयोग सोडीत नसत. त्यांनीच दादांना भालजींकडे पाठवले. दादांचे शब्दोच्चार एके ५६ रायफलमधून सुटणाऱ्या गोळ्यांसारखे सुसाट असायचे, पण नेमक्या ठिकाणी पॉज घेतल्याने प्रेक्षक अख्खे थिएटर (मग ते नाटकाचे असो की सिनेमाचे) डोक्यावर घ्यायचे.'सोंगाड्या' ही त्यांची प्रथम निर्मिती. वसंत सबनिसांनी लिहिलेल्या ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन गोविंद कुळकर्णींनी केले होते. बॉक्स ऑफिस वर सुपर डुपर हिट ठरलेल्या ह्या चित्रपटानंतर एकामागोमाग एक हिट चित्रपटांची लाईन लावून दिली. स्वतःच्या "कामाक्षी प्रॉडक्शन" ह्या चित्रपट निर्मिती कंपनीतर्फे १६ चित्रपट प्रकाशित करणाऱ्या दादांनी ४ हिंदी व १ गुजराती चित्रपट प्रदर्शित केले.
१९७२ - एकटा जीव सदाशिव, १९७३ - आंधळा मारतो डोळा, १९७५- पांडू हवालदार, १९७६ - तुमचं आमचं जमलं, १९७७ - राम राम गंगाराम, १९७८- बोटं लावीन तेथे गुदगुल्या, १९८०- ह्योच नवरा पाहिजे, १९८७ - आली अंगावर, १९८८- मुका घ्या मुका, १९९०-पळवा पळवी, १९९२- येऊ का घरात व १९९४- सासरचे धोतर हे चित्रपट त्यांच्या कामाक्षी प्रॉडक्शन ने प्रकाशित केले. १९८१ साली 'गनिमी कावा' त्यांनी दुसर्या बॅनरखाली केला.
एखाद्यावर पूर्ण विश्वास कसा टाकावा हे दादांकडून शिकावे..... कामाक्षी प्रॉडक्शनची टीम वर्षानुवर्षे कायम राहिली..... त्यात उषा चव्हाण ही अभिनेत्री, राम लक्ष्मण ह्यांचे संगीत, महेंद्र कपूर व उषा मंगेशकर - पार्श्वगायनासाठी तर 'बाळ मोहिते' प्रमुख दिग्दर्शन साहाय्यक..... कुठल्याही 'क्विझ' कार्यक्रमात हा प्रश्न विचारल्यास बेधडक उत्तरे हीच द्यावीत ! लागोपाठ ९ मराठी चित्रपटांच्या रौप्यमहोत्सवी आठवड्यांचे 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' त्यांनी केले.
हिंदीतून - तेरे मेरे बीच में (१९८४); अंधेरी रात में दिया तेरे हात में (१९८५), खोल दे मेरी जुबान (१९८६), आगे की सोच (१९८९) ह्या चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली. १९७७ साली पांडू हवालदार ह्या मराठी चित्रपटाच्या धर्तीवर "चंदू जमादार" हा गुजराती चित्रपट काढला.
सोंगाड्या चित्रपटात त्यांनी नाम्याची भूमिका केली व तीच त्यांच्या जीवनाचा 'टर्निंग पॉंईंट' ठरला. नाम्या कलावतीच्या तमाशाला जातो व त्याला तमाशाची चटक लागते हे त्याच्या 'आये' ला आवडत नाही. ती त्याला घराबाहेर काढते व तो कलावतीच्या आश्रयाला जातो व तेथे तो तमाशात नावांरूपाला येतो असे हे कथानक आहे. ह्या भोळ्या 'नाम्या' ने दादांना एका रात्रीत यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले. पण उभ्या आयुष्यात त्याच 'नाम्या' सारखे दादा साधेपणाने वावरले. ताडदेवच्या कामाक्षीच्या कार्यालयात त्यांना भेटायला त्यांचे चाहते महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यांतून यायचे व दादांनी त्यांना कधीच निराश परत जाऊ दिले नाही. चाहत्यांबरोबर फोटो सेशन हा त्यांचा वेगळा दैनिक कार्यक्रम असे.. चाहत्यांकडून स्वतःच्या चित्रपटातले संवाद, क्षण वगैरे ते त्यांच्यात समरसून ऐकून घेत..कुणी त्यांना आपल्या मुला-बाळांच्या विवाहाचे निमंत्रण देण्यास येई तर कुणी दुकानांच्या उद्घाटनाचे.. पण 'तांबडी माती' हा पहिला चित्रपट केलेल्या ह्या साध्या भोळ्या नटसम्राटाने स्वतःचे पाय त्याच मातीवर घट्ट रोवून ठेवले होते ! त्यांच्या सारखा खरोखरचा 'डाउन टू अर्थ' नट मिळणे असंभव !
वादग्रस्त दादांच्या यशस्वी कारकिर्दीची सुरुवातही वादग्रस्तच असायला हवी, असाच विधिसंकेत असावा..... कोहिनूर सिनेमाच्या मालकांनी दादांच्या 'सोंगाड्या' चित्रपटाच्या आगाऊ आरक्षणाला बगल देऊन देवानंदचा 'तीन देवियॉं' हा चित्रपट प्रदर्शित करण्याचे ठरवले. दादांनी बाळासाहेब ठाकरेंना साकडे घातले. मग काय विचारता? शिवसैनिकांनी कोहिनूरबाहेर "राडा" घातला! कोहिनूरच्या मालकांना सेनेचा दणका मिळताच 'सोंगाड्या' प्रदर्शित करावयाचे सोंग आणावे लागले.. पण सोंगाड्या सुपर डुपर हिट्ट ठरला व मरगळलेल्या मराठी चित्रपटसृष्टीत खळबळ माजली.
१९७२ साली 'एकटा जीव सदाशिव' प्रदर्शित झाला. या चित्रपटाची हाईप इतकी झाली होती, की खुद्द राज कपूरने आपल्या पोराला लॉंच करताना चित्रपटाची तारीख पुढे ढकलली, आणि 'बॉबी' पाच महिने उशिरा प्रदर्शित झाला. असे म्हणतात की बॉबी प्रदर्शित करताना राज कपूरला सिनेमागृहांना 'एकटा जीव सदाशिव' उतरवण्याची विनंती करायला लागली होती. बॉबी गाजलाच, पण त्यामागोमाग आलेल्या 'आंधळा मारतो डोळा'ने लाईम-लाईट पुन्हा दादा कोंडकेंवर आणला.
१९७५ मध्ये पांडू हवालदारच्या रुपात दादा पुन्हा पडद्यावर आले. 'पांडू हवालदार'मध्ये दादांनी 'अशोक सराफ' या उमद्या कलावंताला संधी दिली. यातूनच दादांची दूरदृष्टी दिसून येते. मुंबई पोलिसांचा हा हवालदार तिकीटबारीवर MI6 च्या एजंटला भारी पडला. पांडू हवालदारमुळे मुंबईत MGM ला The Man With The Golden Gun लावायला सिनेमागृहे मिळेनात. कधी नव्हे ते जेम्स बॉंडचा सिनेमा महाराष्ट्रात फ्लॉप गेला. त्याचबरोबर दादांचा आलेख मात्र चढत गेला.
दादांची अवघी कारकीर्द वादग्रस्त होती.. सेन्सॉर च्या दंडेलीपुढे नमते न घेण्याची प्रवृत्ती किंवा नियमाविरुद्ध जाण्याची खुमखुमी; त्यांची शिवसेनेशी बांधीलकी; त्यांचे प्रणय; त्यांचे व्यक्तिगत आयुष्य ते मृत्यूनंतर उठलेले वाद हे एका वादग्रस्त चरित्राचे पैलू असावेत. कायद्याने ते विवाहित होते व तेजस्विनी नावाची त्यांना कन्या होती. पण जनमानसांत ते अविवाहित म्हणून वावरले.
Comments