धन्य ते शिल्पकार श्री.बी.आर.उर्फ अप्पासाहेब खेडकर
- dileepbw
- Nov 24, 2021
- 2 min read
"धन्य ते शिल्पकार श्री.बी.आर.उर्फ अप्पासाहेब
खेडकर"
आज दि.५ ऑगस्टला "मुग़ल-ए-आज़म" चित्रपटाला ६१ वर्षे पूर्ण होत आहेत.त्या निमित्त मकरंद करंदीकर यांनी दिलेली काही नवीन माहिती पुन:प्रसृत करतो.
"मोहे पनघटपे" या गाण्याच्या चित्रीकरणासाठी श्रीकृष्णाची, खऱ्या सोन्याची मूर्ती वापरली गेली. सव्वातीन तासाच्या चित्रपटात सर्व गाणीच मुळी, सुमारे १ तासाची होती. "प्यार किया तो डरना क्या " या गाण्याच्या चित्रीकरणासाठी १५० फूट लांब, ८० फूट रुंद आणि ३५ फूट उंच असा खराखुरा शिशमहाल त्यावेळचे दीड कोटी रुपये खर्चून उभारला होता.
या चित्रपटाचा शुभारंभ ( प्रिमियर ) ५ ऑगष्ट १९६० रोजी मुंबईतील मराठा मंदिर या चित्रपटगृहात झाला. चित्रपटाची सर्व रिळे हत्तीच्या पाठीवरून चित्रपटगृहात आणण्यात आली. चित्रपटगृहाबाहेर शीशमहालचा सेट आणून पुन्हा उभारण्यात आला होता.येत्या ५ ऑगस्ट २०२० ला या चित्रपटाला चक्क ६० वर्षे पूर्ण होत आहेत.
या चित्रपटाच्या यशामध्ये एका पुणेकराचा अत्यंत महत्वाचा वाटा आहे. हा किस्सादेखील या चित्रपटासारखाच आगळावेगळा आहे.यातील नायिकेचे काम करणारी "मधुबाला" ही उत्तम नर्तिका होती पण या नृत्यामधील अनेक पदन्यास तिला जमत नव्हते. "प्यार किया तो डरना क्या" या गीताच्या सुरुवातीलाच असंख्य गिरक्या आहेत. तेथे दिग्दर्शक के.असिफ यांना मधुबालाकडून पाहिजे तसा परिणाम मिळत नव्हता.शेवटी तेथे "लक्ष्मी नारायण" या पुरुष नर्तकाला मधुबालाच्या वेषभूषेसह नृत्यासाठी तयार केले. त्याला पूर्ण मेकअप करूनही,वेगाने गिरक्या घेतांना लॉंगशॉटमध्ये दिसणारा त्याचा चेहरा असिफ यांना मान्य नव्हता.या चित्रपटाचे अनेक भव्य आणि दिमाखदार सेट्स पुण्याच्या निष्णात शिल्पकार श्री.बी.आर.उर्फ अप्पासाहेब खेडकर यांनी बनविले होते.कला दिग्दर्शक सय्यद काद्री यांनी खेडकर यांना पाचारण केले.हे खेडकर अत्यंत प्रतिभावंत शिल्पकार होते.कुठलेही रीतसर शिक्षण न घेता त्यांनी देशभरात छत्रपती शिवाजी महाराजांचे ९ फुटपासून ते १९ फुटांपर्यंत ३४ अश्वारूढ पुतळे बनविले होते.बाजीराव पेशवे, राणी चैनम्मा, कर्मवीर भाऊराव पाटील, संत गगनगिरी महाराज अशा अनेक दिग्गजांचे पुतळे त्यांनी बनविले.या खेडेकरांनी एक वेगळीच शक्कल लढविली. त्यांनी केवळ फोटोंवरून मधुबालाच्या चेहेऱ्याचा एक हुबेहूब पुतळा तयार केला.तरीही अचूकतेसाठी प्रत्यक्ष मधुबालाने समोर येऊन बसणे आवश्यक होते. त्यासाठी मधुबाला तयार झाली. तिला तिचाच हुबेहूब पुतळा पाहून आनंद झाला.नंतर हा पुतळा घेऊन खेडकर त्यांच्या घराजवळच असलेल्या एका रबरी फुग्यांचा कारखान्यात गेले.तेथे विनंती करून त्यांनी या पुतळ्यावर रबराचा जाडसर द्रव ओतून एक सुंदर मुखवटा बनविला. ६० वर्षांपूर्वी आपल्याकडे फारसे तंत्रज्ञान उपलब्ध नसतांना, पुण्यातील या महान शिल्पकाराने भारतातील हा पहिलावहिला मुखवटा बनविला ! हा मुखवटा घालून आणि पूर्ण वेशभूषा,मेकअपसह जेव्हा पुरुष नर्तक लक्ष्मी नारायण सज्ज झाला तेव्हा त्याला पाहून दिग्दर्शक के.असिफ खुश झाले. ते खेडेकरांना म्हणाले " अरे खेडकर, क्या अच्छा काम किया है "! या नंतर संपूर्ण नृत्याचे सर्व टेक ओके होत गेले. या गाण्याच्या सुरुवातीच्या गिरक्या किती उत्तम वाटतात हे कळण्यासाठी या चित्रपटाची क्लिप जरूर पाहा.
त्यानंतर खेडेकरांनी असाच दिलीपकुमारचा एक मुखवटा बनविला.तो मुखवटा घातलेल्या एका कलावंताला खुद्द के.असिफ यांनी पाहिल्यावर ते म्हणाले, अरे आज दिलीपसाब यहाँ कैसे ? उनकी आज कोई शूटिंग नाही है. जेव्हा त्यांना कळले की खेडेकरांनी बनविलेला हा मुखवटा आहे. त्यावर त्यांनी खेडकरांची मुक्तकंठाने स्तुती केली.
"मुघल ए आझम" हा चित्रपट येत्या ५ ऑगस्ट २०२१ ला ६१ वर्षे पूर्ण करीत आहे. हा चित्रपट आणि " प्यार किया तो डरना क्या" हे त्यातील गीत अजरामर झाले.या अभूतपूर्व यशामध्ये श्री.अप्पासाहेब खेडकरांच्या आगळ्यावेगळ्या आणि खूप महत्वाच्या योगदानाबद्दल त्यांना अभिवादन करू या !




Comments