नवरात्रीतले नऊ रंग"
- Aug 30, 2023
- 3 min read
लाड सका(शाखीय) वाणी समाजातील महिलांना "नवरात्रीतले नऊ रंग" ही धार्मिक संकल्पना आहे का नाही असा प्रश्न कधी पडला आहे का ? तुम्हाला कधी प्रश्न पडलाय, की कोण ठरवतं हे रंग म्हणून? किंवा याच दिवशी हाच रंग घालायचा ही परंपरा कितीशे वर्षांपासून चालत आली आहे म्हणून ?
हो, आम्हाला पडला हा प्रश्न आणि आम्ही त्याचं उत्तरही शोधून काढलं.गंमत म्हणजे आमच्या उत्तराला "क्विंट" चं अनुमोदनही मिळालं. उत्तर आणि त्यामागची कथा मोठी रंजक आहे हो.वाचाच मग आता या रंगांमागचा मार्केटिंग फंडा!
साधारण २००३च्या सुमारास महाराष्ट्र टाईम्सने "श्रावणक्वीन" आणि "नवरात्रीचे नऊ रंग" हा प्रकार चालू केला.पहिले दोन-तीन दिवस मटा पुरवणीमध्ये त्या दिवसाच्या रंगाच्या सुंदरशा साडीमधल्या मॉडेलचे फोटो हे आकर्षण होतं.मग आलं तुमचेही असे ऑफिसमध्ये सगळ्यांनी एकाच रंगाचे कपडे घातल्याचे फोटो पाठवा म्हणून आवाहन.मग काय,बँका,शाळा,अॉफिसेस मधल्या ग्रुप फोटोजनी मटा पुरवणीची मधली दोन आणि कधी कधी शेवटचं पानही खाऊन टाकलं.२००३-०४ साली फक्त जाहिरातींतूनच नाही,तर अशा फोटोजमधूनही बातम्या हुडकून हुडकून वाचाव्या लागत होत्या. बघा, केवढं दिव्य होतं ते!
तर मटाच्या म्हणण्याप्रमाणं त्यांनी केलं काय? तर प्रत्येक दिवस एका देवीचा असे नऊ देव्यांमध्ये नऊ दिवस वाटून टाकले. आणि मग प्रत्येक देवीला एक रंग दिला.म्हणजे असं पाहा,दुर्गेची दुर्गाष्टमी, म्हणून तिचा एक रंग.असा रंगोत्सवाला मस्त धार्मिकतेचा रंग
चढत गेला.खरं असो वा नसो,उत्सवप्रिय भगिनींनी आणि काही बंधुरायांनीही हा सण नवरंगात साजरा करायला सुरूवात केली. हळूहळू दरवर्षी लोक मटाने रंग जाहिर करण्याची वाट पाहू लागले. आता तर काय,रोजचं शेड्यूल व्हॉटसॅप केलं जातं.
पण प्रश्न असा होता, की मटाला असा आचरटपणा का करावासा वाटला? आणि यावर्षी आमच्या हाती आला क्विंंटचा लेख.त्यात त्यांनी २००३ साली मटाचे संपादक असलेल्या भारतकुमार राऊतांनाच या प्रश्नाचं उत्तर द्यायला साद घातली आणि उत्तर जाम खडबडायला लावणारं होतं.ते म्हणाले, यात धार्मिकता वगैरे काही नाही,तर लोकसत्तेच्या तुलनेनं घसरत चाललेला मटाचा खप वाढवण्यासाठी त्यांनी केलेली ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी होती.राऊतांनी हेरला रोज ऑफिसला जाणार्या मध्यमवयीन बायकांचा वाचकवर्ग. आणि त्यांना आकर्षित करण्यासाठी मग फोटोज,छान छान साडीतल्या मॉडेल्स हे सगळं रोजच्या मटाच्या पुरवणीत येऊ लागलं.
ही त्यांची ट्रिक मात्र कमालीची यशस्वी ठरली.आजच्या घडीला ऑफिसमध्ये जाणार्या मध्यमवयीन बायकाच काय,घरी येणारी कामवाली आणि कॉलेजला जाणारी मुलं-मुली देखील हे कलर कोड्स पाळतात.सहज म्हणून सुचलेला हा "मार्केटिंगचा उपाय" आज १३ वर्षांनंतरही तितक्याच यशस्वीपणे चालू राहिलाय.
आजच्या घडीला गणेशोत्सवात मुंबईचे गणपती नाही पाहिले तरी चालतील,पण नवरात्रात मुंबईच्या लोकल्सचे प्लॅटफॉर्म मात्र नक्कीच पाहाण्यासारखे झालेयत.हे सगळं लीलया साधून आणणार्या भारतकुमार राऊतांच्या डोकॅलिटीला "टीम बोभाटा" चा कडक सलाम !
सध्या अमूक दिवशी अमूक रंग वापरलाच पाहिजे अशी जणू "अंधश्रध्दा" निर्माण होताना दिसत आहे.तसं होऊ नये म्हणून मुद्दाम हे सांगावसं वाटलं.ही गोष्ट निव्वळ मनोरंजन म्हणून फाॅलो करा असं सर्व महिलांना विनवावेसे वाटते.या रंगांपेक्षा तुमच्या कर्तृत्वाचे रंग जास्त देखणे आहेत हे नक्की !
याच साठी लाड सका(शाखीय) वाणी समाजातील महिलांना नवरात्रीत आपल्या कर्तृत्वाचा रंग दाखविण्यासाठी खालील कल्पना सुचवावीशी वाटते.पहा आवडते का !
लाड सका(शाखीय) वाणी समाजात प्राबल्याने आढळणार्या "थॅलेसिमिया" या अनुवांशिक रक्त विकाराबाबत "भुलाबाई/गुलाबाई" या कुलदेवता पूजनाच्या "भोंडला" या धार्मिक कार्यक्रमात समस्त महिलांनी जनजागृती केल्यास लाड सका (शाखीय) वाणी समाज "थॅलेसेमियामुक्त समाज" होण्यास वेळ लागणार नाही.
त्यासाठी उपवधू-वरांची "Thalassaemia screenig Test" ही रक्त तपासणी करून ती सकारात्मक आल्यास त्यांना परस्परांशी विवाह करण्यापासून परावृत्त केले पाहिजे.अशांनी ज्यांची तपासणी नकारात्मक आहे अशांशीच विवाह करावा.ही नम्र विनंती.
हा अत्यंत महत्वाचा वैद्यकीय संदेश "भोंडल्याची १६ गाणी " या लोकगीतांमध्ये गुंफण्याचा अवश्य प्रयत्न करावा.ही नम्र विनंती.अशी सोळा गाणी या अभ्यासगटात प्रसृत केली आहेत.
भोंडला,भुलाई,हादगा अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखला जाणारा नवरात्रोत्सव आणि त्यातील लोकगीते काळाच्या ओघात लुप्त होत चालली आहेत.घरातल्या मोठ्या व्यक्ती,आजी यांना ती सारी लोकगीते अगदी तोंडपाठ होती.परंतु त्याची कुठेही नोंद न घेतल्याने संस्कृती व गाणी सारे काही विरून जाते आहे.
अशा या दुर्मिळ लोकगीतांमधे "थॅलेसेमियामुक्ती" सारखे अनेक आधुनिक संदेश गुंफता येतील.ते तरुण वर्गाला निश्चित आवडेल व त्याचा मोठा सामाजिक उपयोग ही करून घेता येईल.लाड सका (शाखीय) वाणी समाजातील कवयत्रींनी त्यावर अवश्य विचार करावा व आपल्या कर्तृत्वाचा रंग दाखवावा.ही नम्र विनंती.
अशी परंपरा जपणारी पण आधुनिक संदेश देणारी गाणी आपल्या स्मार्ट वहीमध्ये अर्थात आपल्या "स्मार्टफोन" मध्ये अवश्य जपून ठेवावी व योग्य प्रसंगी त्याचा वापर करावा.ही नम्र विनंती.
आपली मैत्रीण गावाकडची असो की शहरातील,सर्वांनीच जपावा हा अनमोल ठेवा !
लोकसंस्कृती आपण जपली तरच पुढच्या पिढीत त्याचे संक्रमण होऊ शकते.त्यामुळे आपल्या आई,बहीण,जावा,मैत्रिणी सगळ्यांना सुपूर्त करूयात हा "नवरात्रीचा अमूल्य ठेवा" !
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी
व्यवस्थापक
फेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या - ६९६९)
Comments