परदेश गमन
- dileepbw
- Aug 11, 2021
- 2 min read
"परदेश गमन"
माझ्या मोठ्या बहिणीची दोन्ही मुले गेली २५ वर्षे अमेरिकेत स्थायिक झालेली आहेत.माझा मुलगा गेली पाच वर्षे झाली इंग्लंडला स्थायिक झाला आहे.शिकायला म्हणून आँस्ट्रेलियात गेलेला पुतण्या तेथलीच मुलगी पसंत करून आता तेथेच स्थायिक झाला आहे.तर धाकटा पुतण्या शिकायला म्हणून अमेरिकेत जातानाच सांगून गेला आहे की मी काही आता परत येणार नाही ! काल सालीबाईच्या मुलाने श्री.पियुष प्रवीण मालपुरे याने देखील Robotics शिकण्याचे कारण सांगून अमेरिकेला प्रयाण केले आहे. परत येईल असे काही वाटत नाही.
वरकरणी आनंद देणार्या या बातम्या मनात कुठेतरी खोलवर "सल" निर्माण करणार्या आहेत.सर्वांनीच गांभीर्याने विचार करायला हवा !
या प्रसंगी अमृता प्रीतम या सुप्रसिध्द कवियित्री
च्या "हे माझे मृत्यूपत्र" या कवितेचे श्री.अनंत घोटगाळकर यांनी केलेले भाषांतर आठवले.
"हे माझे मृत्यूपत्र"
(अमृता प्रीतम)
पूर्ण शुद्धीत, नशा पाणी न करता
लिहीते आहे मी आज
हे माझे मृत्युपत्र
मी मेल्यावर
खोली धुंडाळा माझी
उलथंपालथं करा सगळं घर
कडीकुलुप नाहीच कशाला
सगळं अस्ताव्यस्त पसरलंय
देऊन टाका कुणाकुणाला
माझी स्वप्ने देऊन टाका
चूलमूल आणि शेजसंगत
यातच मिटून गेलेल्या
तमाम बायकांना
आपल्याच जगात हरवल्यात बिचाऱ्या
युगे झाली विसरुन गेल्यात स्वप्न पहायला
वाटून टाका
माझं खळाळतं हास्य
वृद्धाश्रमातल्या म्हाताऱ्यांना
अमेरिकेतल्या झगमगाटी शहरात
मुलं हरवलीत त्यांची
टेबलावर बघा
काही रंग दिसतील
त्या रंगांनी रंगवा
त्या विधवा पत्नीची साडी
जिच्या पतीच्या रक्ताने
देशाची सीमा रंगलीय
तिरंग्यात लपेटून
काल झोपी गेलाय तो
माझे अश्रू आहेत ना
ते त्या सगळ्या कविजनांना द्या
एकेका थेंबाची होईल एकेक गजल
गळ्याशप्पथ
माझा सन्मान , माझी प्रतिष्ठा
त्या वेश्येसाठी राखून ठेवलीय
मुलीला शिकवता यावं म्हणून
तिने देहाचा बाजार मांडलाय
या देशातील सगळे तरुण
पकडा एकेक करुन
प्रत्येकाच्या दंडात टोचा
माझा आक्रोश
क्रांतीचा एल्गार होईल तेव्हा
त्यांना गरज पडेल त्याची
आणि हे माझं वेडेपण आहे ना
ते त्या सूफीच्या वाट्याचं
घरदार सोडून निघालाय तो
ईश्वराच्या शोधात
बस्स एव्हढंच.
बाकी उरेल
माझी असूया
माझी लालसा
माझा संताप
माझं खोटेपण
माझा स्वार्थ
असं करा
जाळून टाका ते सारं
माझ्याबरोबरच




Comments