पूरग्रस्त जनकल्याण रक्तपेढी,महाडसाठी निधी संकलन करताना आलेले अनुभव - अन्य शाखांची मदत
"पूरग्रस्त जनकल्याण रक्तपेढी,महाडसाठी निधी संकलन करताना आलेले अनुभव - अन्य शाखांची मदत"
दि.२२ जुलै,२०२१ रोजी संपूर्ण महाड शहर महापूराच्या पाण्यात बुडाल्याचे वृत्त बातम्यांमधे वाचले आणि जीवाचा एकच थरकाप उडाला.दोनच महिन्यापूर्वी दि.१४ मे,२०२१ रोजी मला रक्त घटक प्रयोगशाळेच्या(Blood Component Laboratory) उद्धाटनासाठी या असे आंमत्रण होते.करोना परिस्थितीमुळे मी त्यांना उद्धाटनाचा घाट न घालता प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्याबाबत सुचविले होते.त्याप्रमाणे स्थानिक लोकप्रतिनिधींच्या प्रत्यक्ष जागे वरील उपस्थितीत आनलाईन उद्धाटन करून कार्याचा शुभारंभ करण्यात आला.दोनच महिन्यात या रक्त घटक प्रयोगशाळेच्या कार्याने चांगलीच गती पकडली व संपूर्ण कोकणाला माणगाव व खेड येथील रक्त वितरण केंद्रांच्या माध्यमातून रक्त घटकांचा पुरवठा सुरू झाला. "ताजे रक्त(Fresh Blood)" व "संपूर्ण रक्त(Whole Blood)" या भ्रामक कल्पनां मधून कोकणातील सर्व डाॅक्टर्स बाहेर पडले व मोठ्या विश्वासाने रक्त घटकांचा वापर करू लागले.
अशातच ही महापूराची नैसर्गिक आपत्ती कोसळली व सुमारे ७५ लाख रुपयांच्या लोक सहभागातून उभारलेली ही आधुनिक रक्तसेवा वीजे अभावी जवळ जवळ पंधरा दिवसा करता बंद पडली.रक्तपेढीचे रक्त संकलनाचे वाहन,जनरेटर,तीन फ्रिज,शंभर पेक्षा जास्त युनिटस रक्त, महिनाभराचा महागडा कच्चा माल अक्षरश: पाण्यात गेला. संपर्क व्यवस्था व दळण-वळण तुटल्यामुळे हे वृत्त जनकल्याण रक्तपेढीच्या भारतातील सर्व शाखांना कळायला काही दिवस गेले.झालेल्या नुकसानीचा अंदाज घेण्यात आणखी काही दिवस गेले.तोपर्यंत अनेक ठिकाणांहून मदतीचा ओघ सुरू झाला.कुणी रक्त आणले, कुणी वाहन व उपकरणे ! तर कुणी जनरेटर व केमिकल्स ! काही शाखांनी आर्थिक मदतीचा हात दिला आणि पहाता पहाता जनकल्याण रक्तपेढी,महाडचे काम अन्य शाखांच्या उपकरणांच्या सहाय्याने सुरू झाले. नजीकच्या भविष्य काळात ही उपकरणे परत करावी लागतील व जनकल्याण रक्तपेढी,महाडला पुन्हा स्वबळावर उभे रहावे लागेल. त्यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्नशील रहाणे आवश्यक आहे.
Comments