"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग २०"
- dileepbw
- Aug 30, 2023
- 1 min read
"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग २०"
माझे "पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती" हे "स्मृतीरंजन" चालू असताना संजय पाटील पण "फ्लॅश बॅक" मधे गेला व एक चांगले गीत गात गात त्याने त्याचा सगळा "जीवनपट" च उलगडून दाखवला.हा "आठवणींचा खजिना" "दहीहंडी" सारखाच असतो.सर्व गोपाळांनी मिळून ही हंडी फोडल्याशिवाय त्यातील "गोपाळकाला" बाहेर पडत नाही. सर्वांनीच संजय पाटीलसारखी "दहीहंडी" फोडावी.हे विनम्र आवाहन !
आजच्या "दहीहंडी" मधे "ऑटोमेशन" हा "बत्तासा" बाहेर पडला आहे.त्यामुळे या लेखात "ऑटोमेशन" च्या "गमती-जमती" सांगतो.ऐका.
पुण्यात "ऑटोमेशन" कुणी सुरू केलं यावर जोरदार चर्चा चालू असताना तो "राजू राणे" च असणार याची मंगलला खात्री होती.कारण राजू राणे हा विद्यार्थी दशेपासूनच खूप हुशार व अभ्यासू होता.माझ्या माहितीप्रमाणे राजू राणे हा "संगणक विज्ञान" शिकलेला सर्वात पहिला पॅथॉलॉजीस्ट ! त्याच्या उमेदवारीच्या काळात त्याने जोडधंदा म्हणून "मेडीनोव्हा" या Corporate Laboratory चा पॅथॉलॉजीस्ट म्हणून जबाबदारी स्विकारली.
"मेडीनोव्हा" हे मुंबईच्या सिंधी व गुजराती धनवान लोकांचे अपत्य ! त्यामुळे त्यांना पैशाची काहीच कमी नव्हती ! जंगली महाराज रोडवरील त्यांची चार मजली भव्य व देखणी वास्तू पाहूनच आम्हाला चांगलेच दडपण आले होते.पोरसाचे "हत्ती"
पाहून सिकंदराच्या सैन्याच्या पोटात जसा गोळा आला होता तशीच आमची अवस्था झाली होती.
कामाचा अजस्र आवाका असलेल्या या उपकरणांना ते महागडे असल्याने आम्ही गमतीने "पांढरे हत्ती" असे नाव दिले होते.पण या पांढर्या हत्तींना पोसण्या इतका "मोत्यांचा चारा" काही "मेडीनोव्हा" जमा करू शकला नाही व त्यांना यथावकाश आपला "गाशा" गुंडाळावा लागला होता.हा आमच्यासाठी "मोठा धडा" होता.तो आम्ही कसा गिरवला ते पुढील लेखात सांगेन.
Comments