top of page

"फॅरेडेंचा स्मृतीदिन"

  • Sep 6, 2022
  • 4 min read

"फॅरेडेंचा स्मृतीदिन"


उदयला आवडेल असा हा "अज्ञात शक्ती(फोर्स फील्ड’)" चा शोध घेणारा लेख आहे.आज फॅरेडेंचा स्मृतीदिन.विनम्र अभिवादन.ही पोस्ट माझी नाही.आवडली.माहिती पूर्ण वाटली.म्हणून पुढे पाठवली आहे. ज्याने कोणी लिहिली आहे खूप छान अभ्यास पूर्ण लेखन केले आहे.माझी "शक्ती" चे वर्णन करणारी "श्री देवी महात्म्य" ही लेखमाला काही उदयला आवडली नव्हती व मला त्याने "टीकेचा धनी" बनविले होते.निदान ही "विज्ञानकथा" तरी त्याला आवडेल अशी आशा करतो.

खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्टये..एका जगप्रसिद्ध लॅबमध्ये काम करण्याचं स्वप्न घेऊन एक तरुण ‘त्या’ लॅबमध्ये गेला..

लॅबच्या बाहेर कळकट्ट कपडे आणि डोईवरचे सगळे केस पांढरे असलेला एक वयोवृद्ध इसम त्याला दिसला..

तरूणानं वयोवृद्धाला विचारलं,”बरीच वर्षे झालीत तुम्ही इथं काम करताय वाटतं?”

“हो..बरीच वर्षे झालीत”वृद्ध उत्तरला..

“झाडूकाम करता का इथं?”

“हो..तसंच काही..”

“पगार होतो का वेळच्या वेळी?”

“होतो की..पण थोडा वाढून मिळाला तर बरंच होईल”

वृद्ध पुटपूटला..

“बरं बाबा..तुमचं नाव काये हो?”

‘मायकेल फॅरेडे’ वृद्ध उत्तरला..

ती लॅब त्या वृद्धाचीच होती आणि तो विनम्र वयोवृद्ध व्यक्ती होते दस्तूरखुद्द ‘द मायकल फॅरेडे’..

विज्ञानविश्वातलं एक अत्यंत उत्तुंग व्यक्तिमत्व..

२२ सप्टेंबर १७९१ या दिवशी लंडन जवळ एका अतिशय दरिद्री कुटुंबात मायकेल फॅरेडेंचा जन्म झाला..

गरीबीमुळं एका पावाच्या तुकड्यात दोन्ही भावांसोबत त्यांना एकेक आठवडा काढावा लागायचा..

बालपणी तोतरे बोलणारे फॅरेडे स्वत:चं आडनाव ‘फॅवाडे’ असं उच्चारायचे,त्यामुळं शाळेतले सगळे मित्र त्यांची खिल्ली उडवायचे..शिक्षकांकडंही यावर काही एक उपाय नव्हता..

आईच्या आदेशावरून वयाच्या बाराव्या वर्षी अत्यंत नाईलाजानं त्यांना शाळा सोडावी लागली..औपचारिक शिक्षण तिथंच थांबलं..

बालमजूर म्हणून इकडंतिकडं मिळेल ते काम करतांना त्यांचा पुन्हा एकदा पुस्तकांशी संबंध आला..काम होतं बूक बाईंडिगचं..

१८१२ साली एके दिवशी मित्रानं भेट दिलेलं तिकीट घेऊन त्यांनी लंडनचं रॉयल इन्स्टिट्यूट गाठलं..

निमित्त होतं एका व्याख्यानाचं आणि व्याख्याते होते प्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ सर हम्फ्री डेव्ही..

आयुष्यात काही गोष्टी जुळून याव्या लागतात..संधी मिळाली होती..या संधीचं फॅरेडेनं अक्षरश: सोनं केलं..

विषय होता ‘आकाशस्थ विजेवरील संशोधन’

हे व्याख्यान ऐकून प्रचंड प्रभावित झालेल्या फॅरेडेंनी त्या व्याख्यानाची टिपणं काढली,त्यांचा अभ्यास केला आणि या सगळ्याची मुद्देसुद बांधणी करून त्याचं एक पुस्तकच तयार केलं..

फक्त पुस्तक तयार करून फॅरेडे थांबले नाही त्यांनी ते डेव्हींना भेट म्हणून पाठवलं आणि त्याचबरोबर “त्यांच्या हाताखाली ‘रॉयल इन्स्टिट्यूशन’मध्ये काम करायची संधी मिळेल का?”

असा विनंती अर्जही पाठवला..

हे सगळं पाठवल्यानंतर फॅरेडे इकडं ‘शास्त्रज्ञ’ बनायचे स्वप्न रंगवायला लागले तरी तिकडं डेव्हींकडं फॅरेडेसाठी काहीही काम नव्हतं..

इच्छा असली की मार्ग निघतो..काही दिवसांतच डेव्हींच्या लॅबमध्ये प्रयोगासाठी लागणाऱ्या बाटल्या धुण्याचं काम करणाऱ्या माणसाचं डेव्हींशी कश्यावरून तरी खटकलं..

तिकडं टेबलवर फॅरेडेंचं पत्र पडलं होतं..

डेव्हींनी तिरिमिरीत त्या इसमाला कामावरून बडतर्फ केलं आणि फॅरेडेला “बाटल्या धुण्याचं काम करणार का?” अशी विचारणा केली..

‘मरता क्या न करता?’ फॅरेडे पळत्या फळाची आज्ञा मानत तातडीनं डेव्हींच्या लॅबमध्ये रुजू झाले..

डेव्ही नेहमीप्रमाणं निरनिराळ्या प्रयोगात व्यस्त असत आणि फॅरेडे इमानेइतबारे बाटल्या धुण्याचं काम करत..

दरम्यानच्या काळात डेव्ही ‘विल्यम वॉलस्टॉन’ नामक सहकाऱ्यासोबत ‘विद्युतचुंबकतत्त्वावर’ प्रायोगिक संशोधन करत होते..

यावेळी ‘विद्युतप्रवाह सोडलेली तार चुंबकाप्रमाणं कार्य का करते?’ याचा उहापोह ते करत होते..

एका पाठोपाठ एकेक दिवस चालले होते मात्र उत्तर त्यांना काही सापडत नव्हतं..

साफसफाई करता करता फॅरेडे हे सगळं डोळ्यांच्या कोपऱ्यातून बघत असायचे..

तासनतास निरिक्षणात जात होते पण निष्कर्ष काही निघत नव्हता..

त्यात आपलं हे अपयश बघून जणू मनातल्या मनात हसणारा साधा सफाई कामगार डेव्हींना आताशा खटकायला लागला होता..

एक दिवस वैतागून डेव्हींनी फॅरेडेलाच विनंती केली,”अरे एऽऽ झाडू मारून झाला की तुझाही या प्रयोगाला जरा हात लागू दे बरं”

डेव्हींची ही उपरोधिक विनंती त्यांच्याच अंगाशी आली..

काही दिवसांतच या झाडूवाल्या फॅरेडेनं डेव्हींच्या या प्रश्नाचं उत्तर शोधलं आणि नुसतं शोधलं असं नाही,तो या प्रश्नाच्या एक पाऊल पुढं गेला..

‘कारण यांत्रिकी ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर होतं’ या उत्तरासोबतच या तत्त्वावर आधारीत पहिली ‘इंडक्शन मोटर’ फॅरेडेंनी तयार केली..

होय तिच इंडक्शन मोटर जी ‘ब्रुऽऽऽम’ करत सुरू होते असं थ्री इडियट्समध्ये राजू रस्तोगीनं विरू सहस्त्रबुद्धेंना सांगितलं होतं😅

जोक्स अपार्ट पण ‘इंडक्शन मोटर’चं हे संशोधन छोटंमोठं नव्हतं..

याच्याच सहाय्यानं पुढं पंखा-शिवणयंत्र ही उपकरणं चालली एवढंच नाही तर चारचाकी-आगगाडी काय थेट विमानही उडलं..

अनावधानानं किंवा उपहासानं दिलेल्या या संधीतून फॅरेडे एवढं मोठं कांड करेल याची डेव्हींना सुतराम कल्पना नव्हती..

१८२१ साली डेव्हींच्याच शिफारशीवरून फॅरेडेंना थेट ‘रॉयल सोसायटी’मध्ये नोकरी मिळाली..

या नोकरीमुळं त्यांना आता स्वतंत्रपणं आपलं स्वत:चं संशोधन करण्याची संधी मिळाली..

ॲम्पियरनं एका धातूच्या पट्टीभोवती तारेचे वेटोळे घातले तर ती पट्टी चक्क चुंबकाप्रमाणं गुणधर्म दाखवते असं दाखवून दिलं होतं..

“त्याच्याच उलट होऊन एखादं चुंबक सध्या वीज नसलेल्या विजेच्या तारेजवळ आणलं तर त्या चुंबकामधून त्या तारेमध्ये वीजप्रवाह गेला पाहिजे” असं फॅरेडेंना वाटलं पण तसं काही झालं नाही..

नक्की काय कारण होतं? खरंच चूक होत होती का?

१८३१ साली एक प्रयोग करत असतांना फॅरेडेंनी एका हातात चुंबक आणि त्याच्या दुसऱ्या हातात एक गोल गोल वेटोळ्यांच्या कॉईलच्या आकाराची तार घेतली..

फॅरेडेंनी चुंबक त्या तारेजवळ नेताच त्या तारेतून ‘वीजप्रवाह’ वाहायला लागला आणि त्यांनी चुंबकाची हालचाल थांबवताच वीजप्रवाह बंद झाला..

त्यांनी पुन्हा चुंबकाची हालचाल केल्यानंतर वीजप्रवाह पुनश्च सुरू झाला..

याचा अर्थ “जितका वेळ फॅरेडे तारेच्या जवळ चुंबक हलवत होते तितका काळ त्या तारेतून वीजप्रवाह जात होता..

आजवरच्या इतिहासात हे कुणाच्याच लक्षात आलं नव्हतं..

फॅरेडेंनी ‘फोर्स फील्ड’ नावाचा प्रकार शोधला होता..

थोडक्यात चुंबकातून काही तरी प्रवास करून तारेत शिरत होतं,म्हणजे त्यासाठी हवेतून ‘काहीतरी’ एकीकडून दुसरीकडे जात होतं आणि त्या ‘काहीतरी’च्या प्रवासासाठी वेगळ्या तारेची गरज नव्हती..हवा हीच त्याची तार किंवा शक्ती होती..

याचा अर्थ आपल्या डोळ्यांना न दिसणाऱ्या या कसल्या तरी शक्ती कायम हवेत होत्या..

त्यांचं अस्तित्व अजूनही कुणाच्या लक्षात आलेलं नव्हतं..

फॅरेडींनी पुढं आपलं लक्ष प्रकाश आणि इलेक्ट्रो-मॅग्नेटिझम यांच्यातल्या संबंधांचा अभ्यास करण्याकडं वळवलं..

इलेक्ट्रोड-ॲनोड-कॅथोड-इलेक्ट्रोलाईट-आयन वगैरे अनेक शब्द त्यांनी शब्दकोषात आणले..

अनेक वर्षांचं अथक संशोधनं-नोंदी-निरिक्षणं-लेखन यांचा फॅरेडेंच्या शरीरावर विपरीत परिणाम झाला..

त्यांना वारंवार थकवा आणि चक्कर यांचा त्रास व्हायला लागला..

त्यांची स्मृती क्षीण होत गेली आणि १८४० साली वयाची पन्नाशी गाठायच्या आतच फॅरेडेंना नर्व्हस ब्रेकडाऊन झाला..

या सगळया शारिरीक आपत्तीमुळं पुढची चार वर्षं फॅरेडेंना फक्त आराम करण्यात घालवावी लागली आणि १८६७ साली आजच्याच दिवशी व्हिक्टोरिया राणीनं भेट दिलेल्या घरात फॅरेडेंचं देहावसान झालं..

एकेकाळी आपल्याकडं झाडू मारणारा शिष्य आपल्याही पुढं निघून गेल्यानं मनानं थोडं दुरावलेले डेव्ही एक वाक्य मात्र नेहमी म्हणत असत,”माझा सर्वात महत्वाचा शोध म्हणजे मायकेल फॅरेडे”.

‘वीज नक्की काय आहे?’ हे देखील माहीत नसणाऱ्या त्या काळात ती फारशी साठवता येत नव्हती आणि मोठ्या प्रमाणात निर्माणही करता येत नव्हती पण फॅरेडेंनी जगाला थेट ‘वीज’ निर्माण करण्याचं तंत्रच शिकवलं..

आजही अनेक नशिबाचं रडगाणं गातात..फॅरेडेंकडं खायला साधा आख्खा पावही नव्हता पण ते रडले नाहीत,पावाच्या पाव तुकड्यावर गुजराण करत औपचारिक शिक्षण नसतांनाही आख्खं जग बदलवून टाकलं..

आपण योग्य संधीची वाट बघत बसतो फॅरेडेंनी मिळेल त्या संधीलाच योग्य समजलं त्यामुळं तीनशे पानी नोंदवही त्यांच्या शास्त्रज्ञ म्हणून प्रवासात लाॅंचपॅड ठरली..

फ्रिज-एसी-वाॅशिंग मशीन सारखे एक ना अनेक उपकरणं फॅरेडेंच्या मुलभूत संशोधनामुळं अस्तित्वात आले असले तरी फॅरेडे औद्योगिकीकरण-यांत्रिकीकरण यामुळं होणाऱ्या जलवायू प्रदूषणाबाबत संवेदनशील राहिले..

आपण एखाद्या विषयात गती नसली की खचून जातो..

विज्ञानात ‘गणित’ कच्चं असेल तर माणुस जणू अपंग होतो पण हा समजही औपचारिक शिक्षणाअभावी गणितात ‘ढ’ असणाऱ्या फॅरेडेंनी खोटा ठरवला..

आपण न्यूटन-एडिसन-आईन्स्टाईन यांची पारायणं करतो फार झालं तर टेस्लाचंही नाव घेतो पण फॅरेडे या नायकांचेही नायक होते..

आईन्स्टाईनच्या घरात तर फॅरेडेंचा मोठा फोटोच लावलेला होता..

आजचं वीजेनं झगमगणारं हे जग म्हणजे फॅरेडेंचं जणू जिवंत स्मारकच पण तरीही फॅरेडे नेहमीच साधेपणानं जगले..

अगदी जातांनाही त्यांनी हा साधेपणा पाळला..

“माझ्या अंत्ययात्रेला उगाचच लोकांनी येऊ नये आणि मला साध्या ठिकाणी पुरण्यात यावं.” त्यांनी सांगूनं ठेवलं होतं.

 
 
 

Recent Posts

See All
"Oppenheimer - Part २०"

"Oppenheimer - Part २०" काल रात्री जावई सागर,कन्या किर्ती,बंधू सुहास,वहिनी प्रतिभा व पत्नीची वहिनी माधवी असा सहकुटुंब सहपरिवार घरबसल्या...

 
 
 
"आपटा रेल्वे स्टेशन"

"आपटा रेल्वे स्टेशन" माझ्या आयुष्यात "पनवेल-आपटा रेल्वे स्टेशन" ला मनोरंजनाच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे. अकरावी,पी.डी.व...

 
 
 
"मृगागड किल्ला, ता.सुधागड,जि.रायगड"

"मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" आपला वर्गमित्र बापू घोडके यांने नुकताच "मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" हा आपल्या सुवर्ण महोत्सवी...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page