"बहिणाबाईंचा स्मृतीदिन"
- dileepbw
- Dec 11, 2022
- 4 min read
आज दि.३ डिसेंबर हा माझ्या गाववाल्या कवयित्री बहिणाबाई यांचा स्मृतीदिन ! माझे मूळगाव जळगाव जिल्ह्यातील भडगाव ! तर बहिणाबाई जळगावापासून अंदाजे ६ कि.मी. अंतरावरील असोदे या गावच्या !
जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असे "बावनकशी सोन्या" प्रमाणे बहिणाबाईंचे काव्य आहे. हा तर "मोहरांचा हंडा" आहे,अशा शब्दांत आचार्य अत्रे यांनी बहिणाबाईंच्या काव्याविषयी अभिप्राय दिला होता.
बहिणाबाईंना लिहिता येत नव्हते,त्यामुळे त्यांनी केलेल्या अनेक कविता कुणी लिहून न ठेवल्यामुळे काळाच्या ओघात नष्ट झाल्या व संपूर्ण मराठी साहित्य "बावनकशी सोन्या" ला काही प्रमाणात मुकले आहे.नशीब बहिणाबाईंच्या उरल्या सुरल्या काव्याचा इंग्रजी अनुवाद ’फ्रॅग्रन्स ऑफ दि अर्थ’ या कविता संग्रहाच्या रूपाने प्रकाशित झाला आहे."फ्रॅग्रन्स ऑफ दि अर्थ (Petrichor)" म्हाणजे काय ? It is the earthy scent produced when rain falls on dry soil. The word is constructed from Ancient Greek "pétra(rock/stone) and "ikhṓr" means the "ethereal fluid" that is the "blood of the gods" in Greek mythology. अशी ही देवतांच्या रक्तासमान असलेली व मृद्गंधाने डवरलेली बहिणाबाईंची कविता ! एखाद्या मोठ्या ग्रंथाचा विषय असणारे "जीवनाचे तत्त्वज्ञान" त्या साध्या,सोप्या,आणि कमी शब्दांत सहजपणे सांगून गेल्या आहेत.धन्य या माऊलीची !
त्यांच्या कवितांचे विषय माहेर,संसार,शेतीची साधने,कापणी,मळणी इ.कृषिजीवनातील विविध प्रसंग; अक्षय्य तृतीया,पोळा,पाडवा इ.सणसोहळे; काही ओळखीची माणसे,असे आहेत.तल्लख स्मरणशक्ती,सूक्ष्म निरीक्षण,उपजत विनोदबुद्धी, जीवनातील सुखदुःखांकडे समभावाने पाहू शकणारे शहाणपण आणि जगण्यातून कळलेले तत्त्वज्ञान ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये होती. किमान शब्दात अर्थाची कमाल गाठणारे शब्द असायचे.त्या निरक्षर होत्या; तथापि त्यांच्याकडे जिवंत काव्यरचनेची निसर्गदत्त प्रतिभा होती. शेतकाम आणि घरकाम करता करता उत्स्फूर्तपणे "लेवा गणबोली" तील ओव्या व कविता रचून त्या गात असत.त्यांचे चिरंजीव सोपानदेव चौधरी आणि त्यांचे एक आप्त ह्यांनी जमेल तेव्हा त्या वेळोवेळी कविता तेथल्या तेथे उतरून घेतल्या आणि जपल्या.
बहिणाबाईंनी ज्या वस्तूंवर काम करता करता ह्या कविता लिहिल्या आहेत,त्यातल्या काही वस्तू तसेच त्यांचे घर बहिणाबाईचा मुलगा(ओंकार चौधरी) यांच्या सुनबाई श्रीमती पद्माबाई पांडुरंग चौधरी (बहिणाबाईंच्या नातसून) यांनी जिवापाड जतन करून ठेवलेल्या आहेत. जळगावच्या चौधरी वाड्यातील बहिणाबाईंच्या घराचे रूपांतर संग्रहालयात झालेले आहे. त्याला "बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट" असे नाव देण्यात आले आहे.आज बहिणाबाईंच्या रोजच्या वापरातली शेतीची अवजारे, स्वंयपाकाच्या वस्तू, भांडी, पूजेचे साहित्य ह्यांची जपणूक होत आहे. हा अलौकिक ठेवा पुढील पिढीला पाहता येणार आहे. "अरे संसार संसार" म्हणत संसारातील सुख दुःखांच्या साक्षीदार असलेल्या अनेक गोष्टी या संग्रहालयात बघायला मिळतात.हे संग्रहालय फक्त बहिणाबाईंच्या वस्तूंचे, आठवणींचेच संग्रहालय नाही तर या भागातील कृषीजन संस्कृतीत राबणाऱ्या, कष्टकरी महिलांच्या आठवणींचा, श्रमाचा हा ठेवा आहे. जळगावात जेव्हा लेखक कवी येतात तेव्हा ते आवर्जून ह्या वाड्याचे दर्शन घेतात. बहिणाबाईंच्या घराच्या उंबरठ्यावर डोकं टेकवतात, धन्य होतात आणि मनोमन बहिणाईशी नाते जोडतात. त्यांच्या याच आठवणी चिरकाल टिकतील हेच महत्त्वाचे आहे. प्रत्येकाने पहावे असं हे बहिणाबाईंचे संग्रहालय आहे.
आचार्य प्र.के.अत्रे यांच्यामुळे बहिणाबाईंचे विचारधन लोंकांच्या समोर आले.१९५० सालच्या जुलै आगस्ट मध्ये बहिणाबाईंचे चिरंजीव सोपानदेव चौधरी अत्रे यांच्याकडे आले. त्यांच्या हातात कवितांचे बाड होते .बहिणाबाईंच्या कविता सोपान देव आणि त्यांच्या एका भावाने लिहिल्या. कारण बहिणाबाईंना लिहिता वाचता येत नव्हते. बहिणाबाईंच्या मृत्यू नंतर त्यांच्या साहित्याची विल्हेवाट लावताना त्यांना ही वही सापडली होती. कविता चाळलया बरोबर अत्रे उद्गारले 'हे तर शंभर नंबरी सोन आहे. महाराष्ट्रापासून हे विचारधन लपवले तर ते पाप ठरेल!'
बहिणाबाई कष्टाळू होत्या. स्वतःच्या सामर्थ्यावर त्यांचा विश्वास होता. दैववादा पेक्षा प्रयत्नवाद श्रेष्ठ आहे, अशी त्यांची धारणा होती. त्या रडत बसल्या नाही, कि कोणाला दोष देत बसल्या नाही. उलट त्या धीराने जीवनाला सामोरे गेल्या. हेच त्यांचे जीवनविषयक तत्त्वज्ञानचे वेगळेपण आहे. त्यांचे तवज्ञान हे शक्तिशाली स्त्रीचे तत्त्वज्ञान आहे. बहिणाबाई चौधरींच्या नावारूनच जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे नाव कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ असे ठेवण्यात आले आहे.
*"सदा जगाच्या कारणी..."*
अल्बम : *बहिणाबाईंची गाणी.*
गायिका : *उत्तरा केळकर*
संगीतकार : *यशवंत देव*
ओवीकार : *संत बहिणाबाई चौधरी*
*====================*
*[ कृपया Sharad Patwa नावाने प्रचलित असलेल्या माझ्या युट्युब चॅनेलला पसंती देऊन त्याला समर्थन ( Subscribe) करा. ]*
*====================*
आज३ डिसेंबर रोजी बहिणाबाई चौधरी ( २४ ओगस्ट १८८०- ३ डिसेंबर १९५१) यांचा एकाहत्तरवा
पुण्यस्मरण दिवस. शालेय शिक्षण जवळ जवळ नाहीच. लेखन करणंच ठाऊक नाही. पुत्र सोपानदेव चौधरी यांना, आई बहिणाबाई जात्यावर तिनेच रचलेल्या ओव्या गातांना, जसजशा आठवल्या तशा लिहून काढलेल्या. केवळ अद्भूतच ! अशा ह्या अशिक्षित बहिणाबाई पण सुशिक्षित म्हणवणाऱ्या पदवीधरांना ही ज्याचे आकलन नीटसं जे होत नव्हतं त्याचं आकलन बहिणाबाईंना नेमकेपणाने होत होते. *'ढाई अख्खर प्रेम'* का तिनं ख़ुब पढ़ला होता, गुराढोरावर, वृक्षवेलीवर, अणूरेणूवर व चराचरावर तिनं भरपूर प्रेम केलं होतं, माया लावली होती...तिला या सगळ्यासगळ्यांमध्ये देवाचं दर्शन करण्याची नजर लाभली होती...ती म्हणायची देवाला प्रथम तुमच्या अंत:करणात पहा, तिथे जर तुम्हाला तो आढळला तर त्याचे दर्शन तुम्हाला अत्रतत्रसर्वत्र आढळेल. पण स्वतःमध्येच देव पहाण्याची नजर तुमच्याकडे नसेल तर दूरवर कुठेही- अगदी आभाळापर्यंत नजर लावून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करा, सोवळं नेसून लाख अभिषेक(प्रक्षाळ) करा, त्याच्या दर्शनासाठी व आरतीसाठी बोली लावा, तीर्थाटन करा, जंगजंग पछाडा...देव दिसणारच नाही ! आभाळाच्या आरपार नजर लावूनही तुम्ही म्हणत रहाल, देव कुठे ?देव कुठे ?... *देऊळ* चित्रपटात कवी सुधीर मोघे यांनी रास्तपणे विचारले आहे,
*कुठल्या देशी, कुठल्या वेशी, कुठल्या रूपात ?*
*देवा तुला शोधू कुठे ?*
*तेहतीस कोटी रूपे तुझी, तेहतीस कोटी नामे तुझी, परी तू अज्ञात,*
*देवा तुला शोधू कुठे ?*
*कोठे असशी तू आकाशी ? कुठल्या गावी तू वसशी ? कुण्या देवळात ?*
*देवा तुला शोधू कुठे ?*
*भलेबुरे जे दिसते भवती, भलेबुरे जे घडते भवती, तिथे तुझा हाथ,*
*देवा तुला शोधू कुठे ?*
डोके भंजाळून जाईल पण देव गावणारच नाही. आचार्य अत्रेंनी मात्र त्यांच्या *प्रीतीसंगम* या नाटकात मात्र देवाचा नक्की ठावठिकाणा खात्रीशीर सांगून टाकला आहे. ते म्हणतात,
*“देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर”*
बहिणाबाईंनी मात्र देव पाहण्याची सोपी युक्ती प्रस्तुत कवितेच्या पहिल्याच चरणात सांगून टाकली आहे. एखाद्या साधुसंताबरोबर महिनो न महिने तुम्ही सत्संग करुनही जे तत्वज्ञान तुम्हाला प्राप्त होणार नाही, समजणार तर नाहीच नाही; तेच तत्वज्ञान किती सोप्या भाषेत ही शेतात राबराबत गुणगुणणारी बहिणाई अगदी १०- १२ ओळीतच सहज सांगून जायची. साधू संत किंवा कुणा ब्राम्हणाने उच्चारलेल्या मंत्रामुळे शिल्पकाराने कोरलेल्या पाषाणास देवत्व प्राप्त झाले आहे, त्या देवाची प्राणप्रतिष्ठा झाली असल्याचे समजून आपण पुढे पिढ्यानपिढ्या त्याला देव म्हणून पुजतो. स्वत: देवाला देखील अचेत व्यक्तीत प्राण फुंकता आल्याचे एकही उदाहरण, सत्यवानाचा अपवाद वगळता, पुराणातही आढळत नाही. पण विद्यमान युगात ती सिद्धी साधूसंतांच्या मंत्रोच्चारात असल्याचे भाबडेपणाने आपण ते मानतो अन् स्वीकारतोही. किती हास्यास्पद आहे की नाही ! पण एका गोष्टीचे मला समाधान आहे की मी अशा समाजात जन्माला आलो जिथं धर्मचिकित्सा करण्याचं स्वातंत्र्य मला आहे. अन्य समाजात जन्मलो असतो तर ईश-निंदा(Blasphemy) केली म्हणून माझा शिरच्छेद केला असता किंवा मला सुळावर चढवले गेले असते !
ऐकू या, बहिणाबाईने देवांच्या अस्तित्वाची चिकित्सा कशी केली होती ते ! लक्षात घ्या, देवाची चिकित्सा करूनही तमाम जनतेने बहिणाबाईंना रास्तपणे संतपद बहाल केलेलं आहे ! आचार्य अत्रे म्हणत असत,
*"बहिणाबाईंच्या शब्दाशब्दातून तिची प्रतिभा झिरपत असे. त्यांच्या इतकं सरळ आणि सोज्वळ काव्य मराठी भाषेत फार थोडे आहे. जुन्यात चमकेल व नव्यात झळकेल असे बहिणाबाईंच्या काव्याचे तेज आहे. एक निरक्षर आणि अशिक्षित शेतकरी स्त्रीने हे सारे काव्य रचले आहे, हा एक चमत्कार आहे"*
आज त्यांच्या स्मृतीदिनी प्रस्तुत आहे...
*"सदा जगाच्या कारणी..."*




Comments