"महाविद्यालयस्य प्रथम दिवसे"
- Aug 30, 2023
- 4 min read
"महाविद्यालयस्य प्रथम दिवसे"
मेधा खांडेकरचे "रसिकांची तू काळजी करूच नकोस
तुझी रसवंती चालू राहू दे" असे उत्साहवर्धक बोल ऐकताच व मंगल जाधवचा "१९७२ बॅचचे रियुनियन" हा लेख वाचताच मला माझा "महाविद्यालयस्य प्रथम दिवसे" हा जुना लेख आठवला. माझ्या "१९७३ बॅचचे सुवर्णमहोत्सवी रियुनियन" २५,२६ नोव्हेंबर,२०२३ रोजी "Upper Deck Resort, Lonawala" येथे संपन्न व्हायचे आहे.त्याचा "धूमधडाका" सध्या आमच्या गटावर चालू आहे.जवळ जवळ ३० वर्गमित्र "दिवंगत" झालेले असून देखील त्यांचे १९७३ सालचे फोटो मिळवण्यात आम्ही यशस्वी व्हायच्या मार्गावर असून या निमित्ताने एक परीपूर्ण "eDirectory" तयार व्हायच्या मार्गावर आहे.या प्रसंगाच्या निमित्ताने लिहिलेला "महाविद्यालयस्य प्रथम दिवसे" हा लेख गंमत म्हणून या गटावर पण सादर करतो.पहा भावतो का ते !
"महाविद्यालयस्य प्रथम दिवसे"
बरोब्बर "पन्नास वर्षांपूर्वी" आपण बी.जे.वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रागंणात प्रवेश घेण्यासाठीच्या रांगेत उभे होतो.आठवते ?
माझ्यासाठी पुणे म्हणजे शेकड्यांनी "पप्पव्वा" असा हाॅर्न मारीत आजूबाजूला सुळकांड्या मारणार्या तीन पायांच्या रिक्षांचे शहर ! तर माझे पनवेल हे टांग्यांचे शहर ! ओ.पी. नय्यरच्या तालावर "टपटप" दौडणारे टांग्यांचे घोडे व डोक्यावरील माशांच्या व भाजीच्या टोपल्यांच्या भारामुळे घोड्यासारखीच "दुडक्या" चालीवर लगबगीने मार्केटची वाट चालणारी पनवेलच्या जवळपासच्या गावांमधली "ठाकर" बाया माणसे ! या पार्श्वभूमीवर "आमचे पुणे" काही सुरूवातीला मला "माझे पुणे" वाटलेच नाही.असो.
माझे तीर्थरूप पनवेलच्या B.Ed.काॅलेजचे प्राचार्य ! त्यांना पोराच्या बी.जे.वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशाचे काही विशेष कौतुक नव्हते. कारण त्यांना माझे पाय "पाळण्या" तच दिसले असावेत. AFMC च्या प्रवेशयादीत माझे नाव का नाही ? म्हणून जरा गुश्श्यातच होते. त्यामुळे पहाटेची ST धर व खुशाल एकटाच जा म्हणाले बी.जे.वैद्यकीय महाविद्यालयाला ! पुणे ST Stand च्या समोरच तर आहे असे वर म्हणाले !
मग आईलाच माझी दया आली.रात्री पोटभर जेवू घातले, वर डबा बांधून दिला व म्हणाली जा आत्ताच तुझ्या ताईकडे पुण्याला ! जावईबापू येतील तुझ्या बरोबर बी.जे.वैद्यकीय महाविद्यालयात ! पण काय सांगायचे ? जसा सासरा तसाच त्यांचा जावई ! ऑफिसला दांडी मारायची देखील तयारी नाही. सरळ कागदावर पुणे स्टेशनचा नकाशा रेखाटला व पिटाळले की मला बी.जे.वैद्यकीय महाविद्यालयात ! तेवढ्यात माझा पुण्यातील मामेभाऊ माझे अभिनंदन करायला आला व माझ्याबरोबर बी.जे.वैद्यकीय महाविद्यालय दाखवायला येतो म्हणाला.कारण ते त्याचे पुढच्या वर्षीचे "ध्येय" होते. म्हणून त्यालाच एकट्याला माझे "कौतुक" होते.असो.
बहिणीच्या घराच्या दारातूनच आम्ही "चार नंबरची बस" पकडली. कंडक्टरला मोठ्या ऐटीत बी.जे.वैद्यकीय महाविद्यालयाचे तिकीट मागीतले.त्याचा "प्रश्नार्थक" चेहरा पाहून मलाच "प्रश्न" पडला ! "हेची फल काय मम तमाला" ? शेवटी भावानेच "सारवासारव" केली व "दोन ससून" असे म्हटले. तेव्हा कुठे कंडक्टरच्या डोक्यात "प्रकाश" पडला व माझ्याही डोक्यात "ट्युब" पेटली ! आपण समजतो तेवढे काही बी.जे.वैद्यकीय महाविद्यालय भारी नाही.साधे कंडक्टरला देखील माहित नव्हते.असो.
पनवेलला तेव्हा "सिटी बस" नव्हती.माशांच्या किंवा फणसाच्या सुगंधाने दरवळणारी ST हेच आमचे प्रवासाचे साधन ! त्यामुळे टापटिपीतल्या पुणेकरांनी खचाखच भरलेली ही "टिपटाॅप बस" माझ्यासाठी मोठेच "अप्रूप" होती. शेजारीच बसलेल्या बंधूराजांची सतत पुणे शहराची "रनिंग काॅमेंट्री" चालूच होती.SP College म्हणजे "सुंदर पोरींचे काॅलेज" असे सांगेपर्यंत पुढचा चौक आला.ही "अलका" ! असे त्याने म्हणताच चौकातील "मछलीवाली" च्या "कमनीय" पुतळ्याकडे माझे लक्ष गेले.पनवेलच्या हाडामासाच्या "मछलीवाल्यां" कडे माझे कधीच लक्ष वेधले गेले नाही.पण या सिमेंट काॅंक्रिटच्या पुतळ्याने मात्र माझे लक्ष वेधून घेतले. तेवढ्यात बंधूराजांनी कोपर ढोसून मला दुसर्या बाजूला असलेली "अलका टाॅकिज" दाखवली. न हलणार्या या पुतळ्यानेच मला एवढे मोहात टाकले की नंतर बसमधले व बसबाहेरचे जिवंत "कमनीय" पुतळे निरखता निरखता कधी "ससून" आले ते कळलेच नाही.बरे तर बरे कंडक्टरने वेळे आधीच "सस्स्सून" अशी "डरकाळी" फोडली !
"ससून" चा बसस्टाॅप एकदम भंगार ! बसमधून उतरल्यावर ना काॅलेजच्या भव्य-दिव्य इमारतीचे दर्शन होते ना ससूनच्या विशालतेचा अंदाज येतो. झाडीत लपलेली "मनोरे" वाली एक छोटीशी पण देखणी इमारतच काय ती नजरेस पडली. त्यामुळे मनातून जरासा "खट्टू" झालो.तेवढ्यात "बगळ्यांची माळ फुले अजून अंबरात" या गाण्याची आठवण करून देणारे एक "मनोहारी" दृश्य दिसले.सांगतो.
पनवेलला रूग्णालये दोन ! एक नगरपालिकेचे व दुसरे धूतपापेश्वरचे ! तेथे जायचा योग कधीच आलेला नव्हता. त्यामुळे पांढर्या टोप्या,स्कर्ट,पायमोजे,बूट घालून ठुमकणार्या "नर्सेस" सिनेमा सोडून वास्तव जीवनात कधीच पाहिलेल्या नव्हत्या ! इथे तर रिक्षांसारखेच त्यांचे देखील "पेव" फुटलेले. "दिलके टुकडे हजार हुवे,कोई यहाॅं गिरा कोई वहाॅं !" तेवढ्यात परत एकदा पोटात भावाची जोराची "कोपरखळी" बसली व पाऊले आपोआपच "पंढरीची वाट" चालू लागली.
मुलाखतीला अजून अर्धा तास अवकाश होता. त्यामुळे रमत-गमत ससूनचा "पिछवाडा" निरखत निरखत "आघाडी" ला पोहोचलो अन् डोळेच दिपून गेले. "अशोकस्तंभ" आठवेल असे ते अजस्त्र हत्ती असलेले "स्वागतस्तंभ" पाहून पहिल्यांदाच मला "सम्राट अशोक" झाल्यासारखे वाटले. राजकपूरचे "होंगे राजे-राजवडे हम अपने दिल शहजादे" हे गाणे गुणगुणतच काॅलेजच्या विशाल पायर्यांवरून "राज्यारोहण" केले.समोरचा "बैरामजी जीजीभाय" चा पुतळा पहाताच तत्क्षणी "नतमस्तक" झालो.
माझे डोळे "अर्धोन्मिलित" झालेले पहाताच बंधूराजांनी त्यांच्या "फर्गसन" मधील "पुणेरी" विद्यार्थी मित्रांचे कोंडाळे गाठले.ती "गोरी-घारी" पोरे पाहून मी तर एकदम बुजूनच गेलो. पनवेल शहरात रहाणारी दोन-चार टाळकी सोडली तर माझ्या वर्गात सगळी बहुजन समाजाचीच मुले ! बहुसंख्या मुले कोळ्यांची ! त्यामुळे कानावर सतत "कोकणी हेल" ऐकू यायचे.त्यामुळे हे "फर्गसन" वाले तर मला अकरावीतल्या "उच्च मराठी पाठ्यपुस्तका" सारखेच वाटू लागले.मी आपला भाबडेपणाने त्यांना "अहो-जाहो" करू लागलो तर त्यांनी माझ्याकडे "झुरळा" कडे पहावे तसे पहायला सुरूवात केली. माझा सिनेमातला "गोविंदा" च केला त्यांनी ! मग मी मुकाट्याने रांगेत उभा राहिलो. रांगेत भेटला वाचासुंदर ! हाडाचा स्वयंसेवक ! त्याने मला क्षणात आपलेसे केले ते आजतागायत !
यथावकाश कागदपत्र तपासणी व जुजबी मुलाखत झाली आणि "जॅाइन व्हा" अशी डीन साहेबांची "आकाशवाणी" झाली. पण रहायचे कुठे ? खायचे काय ? या बद्दल कोणी काहीच सांगेना.माझ्या "वाणी" आडनावाचे ज्येष्ठ विद्यार्थी मात्र जातीने मला शोधत आले.त्यांनी वसतीगृह केव्हा व कसे मिळेल याबद्दल मार्गदर्शन केले व मेसमधे माझी पोटापाण्याची सोय लावून दिली.तोपर्यंत मी बहिणीच्या संसारातच "अनाहूत पाहुणा" म्हणून मुक्काम ठोकला.
सर्वांकडेच "महाविद्यालयस्य प्रथम दिवसे" या दिवसाचे असेच "अनुभवांचे भांडार" असेल.लुटा ते भांडार या गटावर !
तुम्ही बोलत रहा,मग मला आठवत राहील ! तुम अगर साथ देनेका वादा करो तो मैं युॅंही मस्त नगमें सुनाता रहूॅं !
Comments