माधुरी आपटे
- dileepbw
- Aug 10, 2021
- 2 min read
"BJMC मधील अनेक ज्ञात व अज्ञात "सुदामा-श्रीकृष्ण जोड्यांपैकी एक माधुरी आपटे"
वैयक्तिक संपर्कातून पूरग्रस्त जनकल्याण रक्तपेढी,महाड साठी "निधी संकलन" करताना BJMC मधील अनेक "अज्ञात सुदामा" व अनेक "अज्ञात श्रीकृष्ण" यांचा परीचय झाला. त्या सर्वांना त्रिवार वंदन !
अनेक श्रीकृष्णांनी या सुदाम्याच्या सांदीपनी रूषींच्या आश्रमातील काही स्मृती देखील या निमित्ताने जागविल्या. त्यामुळे आपत्तीचे एका अर्थाने इष्टापत्तीत रुपांतर झाल्याचा मलापण आनंद मिळाला.या प्रसंगी माधुरी आपटेने जागृत केलेली "रायचूर सरां" ची एक आठवण सर्वांना सांगतो.
आपल्या एका गॅदरिंगला "सुहाना सफर और ये मौसम हँसी" हे गाणे आँक्रेस्ट्रासह "संस्कृत" भाषेत ऐकवणारा प्रमोद जोग काही जणांना आठवतच असेल.नंतर तो बालरोगतज्ञ झाला. त्यावेळचा त्याचा हा त्याच्या बापासारखाच इरसाल "पुणेरी" किस्सा आहे.एकदा या पठ्ठ्याने बाप प्र.बा.जोग यांच्या सारखाच इरसाल टारगटपणा करून माधुरी आपटेची रात्रपाळी असताना CSF म्हणून चक्क "नळाचे पाणी" पाठविले. बालरोग विभागातून एका पाठोपठ एक "CSF" चा दणका सुरू झाला. त्यातच "डेड हाऊस" मधून "VVIP" calls सुरू झालेले.रक्तपेढीने बदली रक्तदाते मागताच पळून जाणारे सर्व नातेवाईक "डेड हाऊस" ला मात्र एवढ्या मोठ्या संख्येने कसे काय जमा होतात हे मला अजूनही न उलगडलेले कोडेच आहे.रक्तपेढीत आटलेले "प्रेमाचे झरे"
अचानकपणे "डेड हाऊस" ला कारंजासारखे का बरे "थुई थुई" नाचत असावेत ?
या "प्रेमाच्या झर्या" ला बळी पडून बिचार्या माधुरी आपटेने झटापट शेवटचे "पाणीदार CSF" आटोपले व प्रथे प्रमाणे "एक लिंफोसाईट" दिसली असा शेरा मारून "डेड हाऊस" ला प्रेमाच्या कारंज्यात न्हायला प्रयाण केले.CSF चा "पाणीदारपणा" नंतर बायोकेमिस्ट्री करताना यथावकाश उघडकीस आलाच होता. पण माधुरीने सवयी प्रमाणे "एक लिंफोसाईट" पाहिल्याचा शेरा आधीच मारलेला असल्याने रिपोर्ट तसाच बालरोग विभागाकडे वितरीत झाला होता.
xxx च्या हातात आयतेच कोलीत मिळालेले होते.त्याने "लंका दहन" करायला सुरूवात केलेलीच होती.होता होता धग पॅथाॅलाॅजी विभागात पोहोचली.आगरवाल सरांनी नेहेमी प्रमाणेच स्वत:च्या डोक्यावरचे केस उपटत थयथयाट सुरू केला. पण रायचूर सर मात्र स्थितप्रज्ञा सारखे शांत होते.त्यांनी माधुरी कडून काय व कसे झाले ते समजावून घेतले.बायोकेमिस्ट्री न पहाताच सेल्स पाहिल्याबद्दल आधी तिची "खरडपट्टी" काढली.पण डीनकडे मात्र तिची "भलावण" च केली.आधीच्या CSF मधील लिंफोसाईट न्यूबार चेंबर स्वच्छ न धुतल्यामुळे तशीच राहिली असा खुलासा करून वर आता रात्रपाळीला दोन न्यूबार चेंबर पुरवण्यात आल्या आहेत असा खुलासा देखील करून आले.एवढेच नव्हे तर CSF ऐवजी "पाणी" पाठविण्याचे "स्टिंग आपरेशन" करायचा अधिकार तुला कुणी दिला म्हणून सबंधितांची खरडपट्टी करून "बिनपाण्याची हजामत" देखील करून आले.असे हे भयत्राता भीमसेन" !




Comments