राजेश खन्ना
"काला मांजा व पतंग"
दि.१८ जुलै ही श्री.जतीन उर्फ राजेश खन्ना उर्फ "काला मांजा" या बाॅलीवूडमधील सुपरस्टारची पुण्यतिथी ! दि.२९ डिसेंबर, १९४२ रोजी अमृतसर,पंजाब येथे जन्मलेला हा सुपरस्टार मला भेटला तो मी PD ला शिकत असताना १९७१ साली !
माना वेळावणारा,विशिष्ट हातवारे करणारा,केसांचा मध्यावर भांग पाडणारा व सतत "गुरूशर्ट" घालणारा हा "प्रेमवीर" माझ्या पनवेल शहरात "अजनबी" या सिनेमातील "हम दोनो दो प्रेमी दुनिया छोड चले" या गीताचे चित्रीकरण करण्यासाठी झीनत अमान समवेत दिवसभर थांबला होता व त्यामुळे सर्व शाळा व काॅलेजला "अघोषित सुटी" मिळाली होती व मी देखील अभ्यास सोडून या "काला मांजा" समवेत "पतंगा" सारखा संपूर्ण दिवस भरकटला गेलो होतो.
महाविद्यालयीन जीवनात स्नेहसंमेलने गाजविणारा हा कलाकार त्यावेळी लोकप्रियतेच्या अत्युच्च शिखरावर होता. संपूर्ण चित्रपटसृष्टी त्यांनी व्यापून टाकली होती.
दो रास्ते,आराधना,हाथी मेरे साथी,बावर्ची,सफर, खामोशी इ.चित्रपटांनी हैदोस घातलेला होता.त्यांच्या चित्रपटांच्या कथा,संगीत,गाणी हे सर्वच अप्रतिम होते."आनंद" व "अमर प्रेम" हे विशेष उल्लेखनीय चित्रपट !
सुपरस्टार राजेश खन्ना म्हणजे हिंदी चित्रपट सृष्टितील एक चमत्कार होता.त्यांच्या एवढे अभूतपूर्व यश,लोकप्रियता व झपाटलेला प्रेक्षक वर्ग त्यांच्या आधी व नंतर कुठल्याहि स्टारला मिळालेले नाहि. लोक त्यांच्या पायाची माती कपाळाला लावायचे.व तरूणी स्वतच्या रक्ताने त्याना पत्र लिहायच्या.खन्नाच्या फोटो सोबती असंख्य तरूणींनी लग्न लावले होते.त्यांची कार तरूणींच्या लिपस्टिकच्या खुणांनी भरून जायची.लोकप्रियतेची एवढी ऊंची आजपर्यंत इतर कुठलाहि स्टार गाठु शकलेला नाही.
फिल्म इंडस्ट्रीने देखील त्यांच्या या लोकप्रियतेची योग्य ती दखल घेऊन त्यांना फिल्म फेअर पुरस्कार (१९७१)-उत्कृष्ट अभिनेता,फिल्म फेअर पुरस्कार (१९७२)-उत्कृष्ट अभिनेता,फिल्म फेअर पुरस्कार (१९७५)-उत्कृष्ट अभिनेता,फिल्म फेअर जीवन गौरव पुरस्कार (२००५) देऊन त्यांना तब्बल १४ वेळा सन्मानित केले होते.राजेश खन्ना चे ’एकमेव सुपरस्टार’ नावाचे मराठी चरित्र संजीव पाध्ये यांनी लिहिले आहे.डिंपल व त्यांचा विवाह, नंतरचे सहजीवन व दुरावा, त्याच्या 'आशीर्वाद ' बंगल्याची कहाणी ही सर्व या पुस्तकात आहे.
अशा गुणी कलाकारासाठी आयुष्यातील अख्खा दिवस व्यतीत झाला याची अजिबात खंत नाही.
Comments