"रामाचे मूर्तीकार खानदेशचे श्री.राम सुतार"
- dileepbw
- Aug 30, 2023
- 3 min read
"रामाचे मूर्तीकार खानदेशचे श्री.राम सुतार"
आयोध्या येथील रामाची मूर्ती घडविण्यासाठी नेपाळच्या गंडकी नदीमधून अजस्त्र शाळीग्राम भारतामधे आणण्यात आलेले आहेत.त्या विषयी शाळीग्राम या विषयावर मी एक लेखमाला आपल्या गटावर लिहिली होती.आज या मूर्तींच्या मूर्तिकारावर लिहितो.कारण ते माझे "गाववाले" आहेत. त्यामुळे पहिले वाक्य माझ्या "अहिराणी" या मातृभाषेत सांगतो व नंतर मराठीतून सांगतो.
"खान्देश मायना मुगुटमणी "राम सुतार" नी तुरामा आखों एक हिरा लागी ग्या! सोनाथीन पिव्वी गोट सें गड्या! राम राम भों!"
आता हेच मराठीमधे सांगतो.
राम साम भाऊ ! माझी मातृभूमी खानदेशचा मुगूटमणी असलेले शिल्पकार श्री.राम सुतार यांच्या तुर्यात आज अजून एक "मानाचा हिरा" जडवला गेला आहे.ही "सोन्याहूनही पिवळी" गोष्ट आहे.
माझ्या लाड सका(शाखीय) वाणी समाजाची सांस्कृतिक राजधानी असलेल्या "धुळे" शहराचे शिल्पकार श्री.राम सुतार हे अयोध्येतील राममूर्ती घडविणार आहेत.
प्रभू श्री रामाचं आयुष्य जनकपुरी(नेपाळ), आयोध्या(उत्तरप्रदेश), जनस्थान(खान्देश) आणि श्रीलंका एवढ्या परिसरात गेलं. यातील २०% घटना आयोध्येत घडल्या २०% घटना श्रीलंका आणि इतर प्रदेशात घडल्या तर ६०% घटना केवळ माझ्या खान्देशात घडलेल्या आहेत.
नर्मदा व तापी ओलांडून "दंडाकारण्य" येताचं "शबरी" नी गोडं बोर दिली. ऋषी मुनींनी आश्रय दिला. पंचवटीत निवास दिला. तिथूनच सीता हरण झाले. याच घटनेवर राम रावण युद्ध झालं. या युद्धाची सुरवात गृध्रराज "जटायु" ने यांनी केली, त्यात तो शहीद झाला.तो पंचवटीचा राजा होता. "राम हनुमान भेट" याच मातीत अंजनी पर्वतावर झाली. "सुग्रीव" बरोबर तह इथेच झाला. इथूनच उड्डाणं घेऊन बजरंगबलीने श्रीलंकेतील सीतेचा शोध घेतला. ईथुनचं "किष्किंधा" नगरीच्या फौजानी लंकेकडे कुचं केलं.पुढचं रामायण मग श्रीलंका आणि इतरत्र घडलं.पण उत्तर रामायाणात पुन्हा खान्देशात काही घटना घडल्या. "लव कुश यांचा जन्म" खान्देशातील आहे.
चाळीसगाव येथील "नागझरी" येथे वाल्मिक ऋषींच्या आश्रमात लवकुश जन्माला आले.तिथेच त्यांना वाल्मिक ऋषीनी शस्त्र, अस्त्र, शास्त्र आणि गायन, वादन, नर्तन यांचं शिक्षण दिलं. खुद्द रामायणकार "वाल्मिक ऋषी" यांचा जन्म याच वालझरी गावातील आहे. त्यांची वाटमारी इथलीच आहे. त्यांनी माणसं मारून खड्याचे जे सात रांजण भरले तें ठिकाण म्हणजे आजच "रांजणगाव" इथूनच बाजूला आहें. तिथे सात रांजन आजही अस्तित्व आहेत.
प्रभुराम चंद्राचा एवढा मोठा सहवास खान्देशच्या मातीला मिळाला आहें. आज आयोध्या नगरी राम मंदिरच्या रूपाने जगभरात चर्चेत असताना, तपोभूमी कशी अलिप्त राहील. तापी तें "इगतपुरी" ही पूर्ण तपोभूमी आहे. जनकपुरी राम शिलांच्या माध्यमातून प्रकाशात आली. मंदिराती सर्वात पवित्र अंग म्हणजे मूर्ती. ही मूर्ती नेपाळ येथील गंडकी नदीच्या पात्रातील पवित्र शालिग्राम दगडा पासून बनवायचे ठरले आहे. त्यासाठी ४० टन वजनाच्या दोन शिळा नेपाळ मधून आयोध्येत आणल्या आहेत.खानदेशचे सुपूत्र श्री.राम सुतार हे त्यातील एका शिळेतून "रामलल्ला" ची मूर्ती आणि दुसरीतून "कोदंडधारी राम" घडविणार आहेत. त्यांनी गुजराथ मधील जगातील सर्वांत उंच मूर्ती, सरदार वल्लभभाई पटेल स्टॅचू ऑफ युनिटी बनविला आहे.
मा.राम सुतार यांचा जन्म १९२५ साली धूळे शहरांला लागून असलेले "गोंदूर" या खेडेगावात झाला. ज्या काळात खेड्यातील मुलं शाळेचं तोंड सुद्धा बघत नव्हतें, त्या काळात १९५२ साली राम साहेब मुंबईच्या जे जे स्कुल ऑफ आर्ट कॉलेज मधून स्थपत्य शास्त्राची पदवी घेऊन बाहेर पडले. नंतर पुरातत्व विभागात त्यांनी नोकरी केली. त्यांच्याच आधीपत्याखाली, वेरूळ अजिंठा येथील मूर्त्या आणि लेण्यांची डागडुजी केली गेली. नंतर तें पुतळे बनवू लागले. या कामांचा व्याप वाढत गेला म्हणून त्यांनी व्यवसायानिमित्त दिल्लीला स्थलांतर केले. आज त्यांच्या कारखान्यात शंभरच्या वर कारगीर काम करतात. याच सर्वं नियोजन आता त्यांचा मोठा मुलगा करतो. पण सर्वं मार्गदर्शन मात्र राम सुतार यांचं असतं. त्यांनी देशभरात आणि देशा बाहेर अनेक पुतळे बनविले आहेत.
त्यांची काही प्रसिद्ध शिल्पे, स्टॅचू ऑफ युनिटी, सरदार पटेल, ४५ फूट उंचीचे चम्बळ स्मारकां सोबतच महात्मा गांधीची प्रतिमा बनविली. त्यांच्या अनेक कॉपी देश आणि देशा बाहेर आहेत. संसद भवन दिल्लीच्या आवारात गांधीजींचा बैठ्या अवस्थेतील पुतळा, गांधीजी आणि बाबासाहेब यांचे अनेक पुतळे त्यांनी तयार केले आहेत. टोकीयो जापान येथील रवींद्रनाथ टागोर यांचा पुतळा, संसद भवनातीलच, मौलाना आझाद-१८ फूट, इंदिरा गांधी-१७ फूट, राजीव गांधी-१२ फूट, गोविंद वल्लभ पंत-१० फूट, बाबू जगजीवनराम-९ फूट असे पुतळे तयार केले आहेत.
त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना १९९९ मध्ये भारत सरकारचा "पदमश्री" आणि २०१६ मध्ये त्यांना "पद्म भूषण" हे पुरस्कार मिळाले आहेत.इ.स. २०१६ तील रवींद्रनाथ टागोर सांस्कृतिक सद्भावाचा पुरस्कार त्यांना २०१८ मध्ये मिळाला आहे.
आज त्यांना जगातील सर्वात मोठा पुरस्कार मिळतं आहे.तो म्हणजे भव्य राम मंदिरातील राम लल्ला आणि पूर्ण आकृती सर्व मूर्त्या बनवायचं काम महान शिल्पकार राम सुतार यांना मिळाले आहे. ही मूर्ती आणि मंदिर यांना पुढच्या हजार वर्षात काहीही होणार नाही,एव्हढ हे सर्व भक्कम आहे. तेवढी वर्ष राम सुतार हे नावं अबाधित आहे.
राम सुतार यांना पद्म भूषण किताब मिळाला आहें. भारतरत्न त्यापासून फक्त दोन पायऱ्या वर आहें. लवकर तें त्यांना मीळेल. आज त्यांचं वय 98 वर्ष आहें. प्रकृती ठणठणीत आहें. त्यांना शंभरी आणि भारत रत्न हे एकाच वेळी मिळोत हीं ईश्वर चरणी प्रार्थना. राम सुतार शिल्प कलेंतील तपस्वी आहेत. तपस्वी 200/200 वर्ष जगतात राम सुतार 150 वर्षे तरी जगावेत ही ईश्वर चरणी प्रार्थना.
हे सर्व करून घेणारा राम आहे. रामाला अत्यंत बिकट परिस्थितीत खान्देशनी आश्रय दिला. त्या काळात या भूमिला दंडकांरण्य म्हणत. या तपोभूमीचे पुण्य लक्षात घेऊन जनक राजानी इथे येऊन अखंड पुण्य मिळविण्यासाठी यज्ञ केला होता म्हणून या पावन भूमीला त्या काळात जनस्थानही म्हणत असतं. अशा या आश्रयदात्या पुण्यभूमीवर रामाचे उदंड प्रेम होते. म्हणून रामानें हे स्वतः करून घेतलं. माझं मंदिर कोणीहीं उभारा पण माझी मूर्ती मात्र खान्देशी माणसानेचं तयार करावी हा हट्ट रामाचाच होता. म्हणून श्रीरामानें या रामाला खान्देशात जन्माला घातलं. त्यांना भरगोस आयुष्य दिलं आणि स्वतः श्रीरामानें रामा कडून रामाची मूर्ती करून घेतली."जय श्रीराम | जय खान्देश !




Comments