रोड मराठा
- Jan 14, 2022
- 1 min read
सुनील आगरकरने टोकियोमध्ये भाला फेकीत सुवर्ण पदक मिळवणारा नीरज चोप्रा हा हरियानातील "रोड मराठा" या मूळच्या मराठी समाजातील बांधव आहे असे सांगीतल्याने बिलकूल आश्चर्य वाटले नाही.मागे मी माझ्या समाजातले सोनजे कुल खंडकरी(खानकरी) कसे झाले याचा शोध लावत असतानाचा मला "रोड मराठा" या समाजाची माहिती मिळालेली होती.
इ.स. १७६१,१४ जानेवारी रोजी अफगाण आक्रमक अहमदशहा अब्दालीशी झालेल्या पानिपत युद्धानंतर हरियाणात स्थायिक झालेल्या मराठा सैनिकांना "रोड मराठा" असे म्हणतात.पानिपतच्या आसपासच्या खेड्यांमध्ये त्यांची सुमारे आठ लाख वस्ती आहे.महाराष्ट्राचे नेते श्री.उदयसिंह गायकवाड़ यांनी तेथे १९९२ साली या लोकांचे एक स्मारक देखील उभारले आहे.
इ.स.१७६१ पुर्वीच्या जातनिहाय जनगणनेत "रोड मराठा"
ही जातच आढळत नाही.कारण अफगाण आक्रमक अहमदशहा अब्दालीने "एका मराठा मुंडीसाठी एक सोन्याची मोहोर" असे बक्षीस जाहीर केल्याने पराभूत मराठे आसपासच्या जंगलात व खेड्यापाड्यात आश्रयाला गेले.सदाशिवराव भाऊ पेशवे,बाळाजी बाजीरावांचे पुत्र विश्वासराव,ग्वाल्हेरचे जनकोजी व तुकोजी शिंदे,धार व देवासचे यशवंतराव पवार असे अनेक सेनापती व जाधव, निंबाळकर,भापकर(चव्हाण),भोंसले,कदमफाळके,भोइटे,पायगुडे,सावंत इ.सरदार या युध्दात सहभागी झालेले होते.
मराठा तोपखाना प्रमुख इब्राहिम खां गार्दी आपल्या ५००० गोलंदाजांसह धारातीर्थी पडला होता.जे मराठे वाचले त्यांनी जंगलात आश्रय घेतला.त्यांच्या वंशजांचा शोध
मराठा जागृति संघाचे अध्यक्ष श्री.वीरेंद्र सिंह वर्मा(जाखले) यांनी घेतला.त्यांना लागलेले रोड मराठा समाजाचे शोध :-
१.भाषेत अनेक मराठी शब्द(पदोपदी छत्रपतीकी जय म्हणणे)
२.अश्वप्रेम व शस्त्रप्रेम
३.मराठी वास्तुरचना(लाकडी महाद्वार,देवडी)
४.मराठी आडनावे
५. मराठी रूढी-परंपरा(पुरणपोळी,होन हे चलन,रात्री वरण-भाताचे जेवण,गाण्यांमधे समुद्राचा उल्लेख,विवाहातील मामाचे महत्व,मराठी पागोटे,भिकबाळी,राखी पौर्णिमेपेक्षा भाऊबीजेला महत्व,डोक्यावर पदर घ्यायची पध्दत इ.)
मराठी इतिहासकार श्री.वसंतराव मोरे,कोल्हापुर यांनी "रोड मराठा" समाजावर एक पुस्तक लिहिले असून त्यात असे म्हटले आहे की या मराठा लोकांनी "रोड" या स्थानिक राजाचा आश्रय घेतला व आपली आडनावे तात्पुरती बदलली.युध्द परिस्थिती संपल्यावर ते परत आपल्या मराठी नावांनी(पवार,चव्हाण,भोंसले,सावंत,मेमाने, दुधाणे,खोखरे,खसबरे,गोले,धबाड़े,बोडले,झोंढले,शेलार, बटाने इ.) ओळखले जाऊ लागले.
Comments