"राणी एलिझाबेथ यांची आठवण"
- Sep 9, 2022
- 2 min read
काल ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांचे वृध्दापकाळाने निधन झाले.ईश्वर त्यांच्या मृताताम्यास चिरशांती देवो !
या प्रसंगी श्रध्दांजली वहाताना आपले मा.पंतप्रधान यांनी त्यांची एक आठवण सांगीतली आहे.त्यांच्या भेटीच्या वेळी राणी एलिझाबेथ यांनी त्यांना बापूजींनी भेट दिलेला "रुमाल" दाखविला होता.माझी देखील राणी एलिझाबेथ यांच्याशी दि.११ जुलै १९८८ रोजी संध्याकाळी ६ वाजता आकस्मिकपणे भेट झाली होती.सांगतो तो किस्सा !
आमची रक्तपेढी विज्ञानाची आंतरराष्ट्रीय परिषद वेम्ब्ले स्टेडियम,लंडन येथे आयोजित करण्यात आली होती.पुण्यातून मी व डाॅ.आनंद चाफेकर गेलो होतो.तेथे स्मृतीचिन्ह म्हणून परिषदेचा लोगो व राणी एलिझाबेथ यांच्या निवासस्थानाचे चित्र असलेले "टी शर्ट" विकायला ठेवलेले होते.हौसेने घेतला व लगेच अंगावर चढविला देखील !
त्याच दिवशी संध्याकाळी राणी एलिझाबेथ यांच्या निवासस्थानी परिषदेच्या सर्व २००० डेलेगेटस् ना भोजन दिले जाणार होते.तेथे हा "टी शर्ट" घालूनच गेलो.हे राजशिष्टाचारात बसते की नाही ते माहित नव्हते.निवासस्थानाच्या पायर्यांवर दस्तुरखुद्द राणीसाहेब स्वागतासाठी उभ्या होत्या.त्यांचे लक्ष माझ्या "टी शर्ट" कडे गेले व त्यांनी मला जवळ येण्याची खूण केली.राजशिष्टाचार मोडल्याबद्दल राणीसाहेब आता आपल्याला झापणार म्हणून मी भीतभीतच पुढे गेलो.अपेक्षेप्रमाणेच त्यांनी माझ्या बटने न लावलेल्या कोटाची काॅलर धरली व कोंबडीचे पंख फाकवावे तशा दोन्ही बाजू फाकवून आत घातलेल्या त्या "टी शर्ट" कडे त्या डोळे विस्फारून पाहू लागल्या.चहूबाजूंनी कॅमेर्याचे फ्लॅश उडू लागले व ते विनोदी दृश्य अनेक कॅमेर्यात बंद झाले.
मी घाबरलेला पाहून राणीसाहेब मिश्किलपणे म्हणाल्या "Don't worry! We have welcomed Bapuji even in Dhoti !" मग त्यांनी विचारले "टी शर्ट" वरचा हा "लोगो" कशाचा आहे ? त्यांना ISBT या संस्थेची जुजबी माहिती सांगीतली.मग त्यांनी विचारले ते चित्र कशाचे आहे ? मी माहित नाही असे म्हणताच मोठ्याने हसल्या मोठ्या मिश्किलपणे म्हणाल्या अरे बाबा ! माझे घर आहे ते ! त्याच घरात उभा राहून मला ते माहित नसावे ही "लंडन टाईम्स" साठी मोठी विनोदी बातमी होती व ती दुसर्या दिवशी राणीसाहेबांनी माझी काॅलर धरलेल्या अवस्थेतील फोटोसह छापून देखील आली !
Comments