top of page

लाभलेली माणसं

  • Aug 20, 2021
  • 2 min read

"लाभलेली माणसं"


पूरग्रस्त जनकल्याण रक्तपेढी,महाडसाठी निधी संकलन करताना १९७३ साली मला भेटलेली "माणसं" ही अवचित भेटलेली माणसं नसून "लाभलेली माणसं" आहेत याचा प्रत्यय आला.आयुष्याची गाडी वेगाने पुढे हाकताना अशीच लाभलेली काही जीवाभावाची माणसं "मी” पणाचा पडदा थोडा बाजूला करून वेळ काढून,पुन्हा निरखून पाहायला मिळाली,त्यांची विचारपूस करायला मिळाली,त्यांना समजून उमजून आपल्या आयुष्यात ठरवून आणायला मिळालं याचा मनस्वी आनंद होतो आहे.काही माणसं काळाच्या पडद्याआड गेली आहेत.ती परत येत नाहीत याचे दु:ख देखील आहे.


गगनाला भिडलेल्या,फुलांनी लगडलेल्या झाडाखाली उभं राहिलं कि ते झाड आपल्यावर न सांगता त्या फुलांचा वर्षाव करतं. तशीच आनंदवर्षाव करणारी हि माणसं फुलाची पाकळी नि पाकळी वेचावीत अगदी तशीच वेचायची संधी या पूरग्रस्त जनकल्याण रक्तपेढी,महाडने मला दिली.याला आपत्ती म्हणू का "इष्टापत्ती" ?


या वेळी कवी गुलजारांच्या खालील काव्यपंक्ती आपल्या सर्व दिवंगत मित्रांना अर्पण करतो :-


फूल खिलते हैं, लोग मिलते हैं मगर

पतझड़ में जो फूल मुरझा जाते हैं

वो बहारों के आने से खिलते नहीं

कुछ लोग एक रोज़ जो बिछड़ जाते हैं

वो हजारों के आने से मिलते नहीं

उम्र भर चाहे कोई पुकारा करे उनका नाम

वो फिर नहीं आते…


"आपली माणसं" ही अत्यंत महत्त्वाची असतात.त्यांना मनापासून जपायला हवं.भावनाशून्य या जगात जगताना आपण थोडं भावनाप्रधान व्हायला हवं.ओळख जितकी जूनी तितकी मैत्री घट्ट होत जाते.नात्यात सहजता येते.या मनापासून जपलेल्या नात्याला जेव्हा आपण बुद्धीच्या जोरावर तोलून पाहतो तेव्हा काहीतरी खटकतं, अनेक तर्क-वितर्क निघतात, शंका उत्पन्न होतात, राईचा पर्वत होतो, गुंतागुंत वाढवणारे गैरसमज निर्माण होतात आणि.......ही मैत्री नावाची "नाव" अनेक विचारांच्या सागरात हेलकावे खाताना दिसते. वेळीच हे सगळे विचार पुसून टाकून मनाची पाटी ज्याला कोरी करता आली तो तरलच म्हणायचं.आपले सर्व वैचारिक,राजकीय,धार्मिक इ.मतभेद विसरून सर्वच मित्रांनी पूरग्रस्त जनकल्याण रक्तपेढी,महाडच्या पुनर्वसनाला मदतीचा हात देण्याचा "भावनिक तरलपणा" दाखवला.हे पाहून आपल्याला नियतीने असे जीवाभावाचे सवंगडी दिले आहेत याचा अभिमान वाटला.डोळ्यांना दिसणाऱ्या सगळ्याच गोष्टी खऱ्या असतातच असं नाही ना ! अहो आपणहून घट्ट धरुन ठेवलं तर कदाचित् थोडंसं गळेल, पण तुटणं मात्र टळेल.


आँख धोखा है, क्या भरोसा है

दोस्तों शक दोस्ती का दुश्मन है

अपने दिल में इसे घर बनाने न दो

कल तड़पना पड़े याद में जिनकी

रोक लो रूठ कर उनको जाने न दो

बाद में प्यार के चाहे भेजो हजारों सलाम

वो फिर नहीं आते…


आपल्या सगळ्यांचच आयुष्य फार गजबजलेलं आहे. कुणालाही जराही उसंत नाही.आपल्याला सगळ्यांनाच यशस्वी व्हायचंय… पुढे जायचंय … ठरवलेलं धेय गाठायचंय. आपल्या भोवती शोभेल अशी एक महागडी चौकट उभी करायचीय. पण ती उभी करताना… पुढे जाताना गवसलेली हि आपली माणसं … आपल्या जवळची ही माणसंच नसतील तर…यशाचं शिखर गाठल्यावर मिळालेलं यश साजरं करायला, तोंडभरुन कौतुक करायला, शाबासकी म्हणून पाठीवर थाप द्यायला जवळ आपलं असं कुणीतरी हवं ना…. नसेल तर…. खूप प्रयत्न करून मिळालेलं हे यश, त्या सोबत आलेली सुबत्ता सगळंच मातीमोल ठरेल ...नाही का ?

आयुष्य खरंच खुप सुंदर आहे. न मागता भरभरून मिळालेलं फक्त थोडे कष्ट घेऊन जपता आलं पाहिजे. अगदी माणसं सुद्धा… कायमची आपल्याशी बांधता आली पाहीजेत. आपल्या मनापासून त्यांच्या मनापर्यंत..

शरीरावरच्या जखमा दिसतात हो, मनावरच्या दिसत नाहीत एवढंच.उत्तरार्धात मागे वळून पाहताना तो पुढे येणार्‍या प्रत्येक टप्यावर दिसली पाहिजेत हीच ती सुंदर माणसं.... तुमच्या पाठीशी वटवृक्षासारखी अगदी खंबीर उभी .. सुंदर, निखळ, हसऱ्या चेहऱ्याची....

सच कहा है किसीने...

...वो फिर नही आते.... !



 
 
 

Recent Posts

See All
"Oppenheimer - Part २०"

"Oppenheimer - Part २०" काल रात्री जावई सागर,कन्या किर्ती,बंधू सुहास,वहिनी प्रतिभा व पत्नीची वहिनी माधवी असा सहकुटुंब सहपरिवार घरबसल्या...

 
 
 
"आपटा रेल्वे स्टेशन"

"आपटा रेल्वे स्टेशन" माझ्या आयुष्यात "पनवेल-आपटा रेल्वे स्टेशन" ला मनोरंजनाच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे. अकरावी,पी.डी.व...

 
 
 
"मृगागड किल्ला, ता.सुधागड,जि.रायगड"

"मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" आपला वर्गमित्र बापू घोडके यांने नुकताच "मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" हा आपल्या सुवर्ण महोत्सवी...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page