विवाहपूर्व थॅलेसेमिया स्क्रिनिंग
- dileepbw
- Aug 21, 2021
- 1 min read
"विवाहपूर्व थॅलेसेमिया स्क्रिनिंग"
फेसबुक वरील माझ्या "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" या सार्वजनिक अभ्यास गटात मी विवाह जुळवताना "जन्मपत्रिका" पहाण्यापेक्षा
शारीरिक व अनुवंशिक आजारांच्या समस्यांकडे विशेषत: "थॅलेसेमिया स्क्रिनिंग" कडे लक्ष देत चला असे आवाहन करीत आहे. या समाजात "थॅलेसेमिया" चे ५% वाहक असण्याची शक्यता लक्षात घेऊन मी सर्वांना "विवाहपूर्व थॅलेसेमिया स्क्रिनिंग" ही रक्त तपासणी करण्याचा आग्रह धरीत आहे.वधू-वरांची "अशी निवड" हळूहळू समाजाला रूचू लागलेली आहे.
सहजीवन हा सोबत जगण्याचा सर्वात मोठा भाग असतो. विवाह ही सोबत जगण्याची अशीच एक पद्धत आहे. पण पारंपरिक विवाहपद्धतीत जे सहजीवन आहे त्यात बऱ्याच वेळा फक्त एक जण जगत असतो, दुसऱ्याची घुसमट होत असते. विशेष करून मुलींची, कारण तिला फक्त एका व्यक्तीशी नाही तर पूर्ण परिवार, नातेवाईक, त्यांच्या पद्धती, चालीरीतींशी जुळवून घ्यावे लागते. किती छान झालं असतं ना, ज्याच्यासोबत आपण आयुष्य काढणार आहोत त्याच्यासोबत एकमेकांच्या आवडीनिवडी, अपेक्षा, छंद, सवयी, पारिवारिक ओळख, शिक्षण, स्वभाव, गुण-अवगुण, राहणीमान, देवधर्म वगैरे बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टींची चर्चा करू शकलो असतो तर? किमान काही भेटी झाल्या तर ती व्यक्ती आपण नीट ओळखू शकतो. हल्लीच्या शारीरिक व अनुवंशिक आजारांच्या समस्यांमुळे भविष्यात काही अडथळे निर्माण होऊ नयेत, यासाठी वैद्यकीय तपासणीही गरजेची असते.
समाजामधे बरीच मुलंमुली अशी आहेत की ज्यांना पारंपरिक पद्धतीने लग्न नकोय. हुंडा-मानपान,बैठकी, चहा-कांदेपोहे,मुलीला पाहण्याचा अमानुष कार्यक्रम, हळद,पत्रिका,मंगळसूत्र... असं काहीही नको. साधेपणाने व कमी खर्चात आणि मोजक्याच लोकांच्या साक्षीने लग्न व्हायला हवं.त्या दृष्टीने ‘जोडीदाराची विवेकी निवड’ हा व्हॉट्सअपवर चालवला जाणारा उपक्रम विवेकी पद्धतीचा जोडीदार मिळण्याचा एक नवीन मार्ग आहे व तो आता समाजात चांगलाच रूजू लागलेला आहे.ज्यात "परिचयोत्तर पद्धतीने विवाह" ही संकल्पना असते.
नवरा-बायको या पलीकडे "सहसोबती" होऊन "सहजीवन" जगण्याच्या विचाराने विवेकी विचारांचा जोडीदार शोधण्यासाठी मुलं-मुली अशा ग्रुपच्या माध्यमातून एकत्र येत असतात.ही मोठी आनंदाची गोष्ट आहे.अशी मुले व मुली वैद्यकीय तपासणीही करून घेत आहेत.
Comments