"शिल्पकार बी.आर.खेडकर - भाग २"
- dileepbw
- Feb 17, 2023
- 2 min read
"शिल्पकार बी.आर.खेडकर - भाग २"
सध्या मी ब्रिटिश राजाश्रय मिळालेला व्हेनेझूएलाचा "कृष्णवर्णीय" संगीतकार "Edmundo Ross" यांची माहिती सांगतो आहे.
त्याचा उद्देश जन्म श्रेष्ठ नसतो तर "कर्म श्रेष्ठ" असते हे तत्वज्ञान सांगणे असा आहे."जन्मापेक्षा कर्मश्रेष्ठ" हा संदेश ज्यांच्या जीवनातून मिळतो असे सर्वजण मला प्रिय आहेत.आज उदयने अशाच एका कर्मवीराचा साक्षात्कार घडवला.कोण आहेत हे "कुंभार" समाजातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार श्री.बी.आर.खेडकर ? वाचा.
नुकताच "मुगल-ए-आझम" चा सुवर्णमहोत्सव साजरा झाला.पण त्याचा पुण्याशी असलेला संबंध किती जणांना ठाऊक आहे ? यातील सर्वात गाजलेले "प्यार किया तो डरना क्या" हे गीत पडद्यावर "मधुबाला" सादर करीत असली तरी प्रत्यक्षात ते पुण्यातील सुप्रसिध्द शिल्पकार श्री.बी.आर.खेडकर यांनी तयार केलेला मधुबालाचा "रबरी मुखवटा" घालून "लक्ष्मी नाफायण" या एका पुरूष नर्तकाने केलेले आहे. कोण हे श्री.बी.आर.खेडकर ?
छत्रपती शिवाजी महाराज यांचे अश्वारूढ ३५ पुतळे घडविणारे आणि ‘मुघल-ए-आझम’ या चित्रपटासाठी कलाकारांचे हुबेहूब मुखवटे घडवून कलादिग्दर्शनामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणारे
"मातीमध्ये घडलेला शिल्पकार" म्हणजे "कुंभार" समाजात जन्मलेले बी.आर.ऊर्फ आप्पासाहेब खेडकर ! "माती हेच माझे जीवन आहे" असे मानणार्या आप्पासाहेबांनी मातीमध्ये काम करण्यासाठीच शाळा सोडली.माती हेच त्यांचे जीवन झाले. गणेशमूर्ती करताना केवळ तेवढय़ावरच न थांबता "शिल्प" घडविण्याचा ध्यास घेतला. शिवाजीनगर येथे शाळेत जात असताना एसएसपीएमएस संस्थेच्या आवारातील शिल्पकार विनायक करमरकर यांनी घडविलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्प पाहून त्यांना प्रेरणा मिळाली. साठ वर्षांच्या कलाजीवनात त्यांनी "साडेचारशे पुतळे" घडविले.
श्री.बंडोपंत रखमाजी खेडकर हे आप्पासाहेबांचे मूळ नाव. "कुंभार" समाजात जन्माला आल्यानंतर मातीत खेळण्याच्या छंदातून मातीला आकार देत देत त्यांचे जीवनही घडले. "प्रभात फिल्म कंपनी" त प्रवेश करून वयाच्या नवव्या वर्षांपासूनच कलाजीवनाला सुरुवात झाली. त्यानंतर चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांच्या अरुण कंपनीत आणि मा. विनायक यांच्या "नवयुग" कंपनीमध्ये त्यांनी काम केले. १९४५ मध्ये कलादिग्दर्शक सय्यद कादरी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कलासाधना केली. ‘मुघल-ए-आझम’ चित्रपटाचे दिग्दर्शक के. आसिफ यांच्या "मोहन स्टुडिओ" मध्ये ते १९५० मध्ये दाखल झाले. दिलीपकुमार आणि मधुबाला यांचे हुबेहूब त्याच चेहऱ्याचे मुखवटे करण्याचे खेडकर यांचे कसब वाखाणले गेले. या चित्रपटाच्या कलादिग्दर्शनामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
चित्रपटसृष्टीला रामराम ठोकून खेडकर यांनी १९६० पासून स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. त्यांनी साकारलेला तोफेसह छत्रपती शिवाजीमहाराजांचा पुतळा १९६१ मध्ये सातारा येथील पवई नाका येथे उभारण्यात आला. त्यानंतर शिवाजीमहाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि बी. आर. खेडकर हे समीकरणच तयार झाले. खेडकर यांनी शिवाजीमहाराजांचे ३५ अश्वारूढ पुतळे घडविले. त्यांचे पुतळे राज्यात आणि देशात तर आहेतच, पण अमेरिकेमध्ये "सॅन होजे" शहरामध्येही छत्रपती शिवाजीमहाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे.माझ्या सुदैवाने १९९० साली मी त्या पुतळ्याचे दर्शन घेऊ शकलो आहे.
कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ, बार्शी येथील शिवाजी कॉलेज, पुण्यातील कोथरूड चौक यांसह अकलूज, उस्मानाबाद, कळंब, निलंगा, उदगीर, विटा नगरपालिका, वारणानगर सहकारी साखर कारखाना, भवानीनगर, बिदर (कर्नाटक) येथे हे पुतळे उभारण्यात आले आहेत. शनिवारवाडय़ावरील श्रीमंत बाजीराव पेशवे, लातूर येथील संत बसवेश्वर, बेळगाव येथील राणी चेन्नमा ही शिल्पे खेडकर यांच्या कसबी हातांनी साकारली आहेत. पुण्यश्लोक अहल्यादेवी, छत्रपती शाहूमहाराज, नेताजी सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा गांधी, महात्मा जोतिबा फुले, महर्षी अण्णासाहेब कर्वे, कर्मवीर भाऊराव पाटील, क्रांतिवीर भगतसिंग, हुतात्मा राजगुरू, इंदिरा गांधी, केशवराव जेधे, एस. एम. जोशी, यशवंतराव चव्हाण, काकासाहेब गाडगीळ, राजीव गांधी, शंकरराव मोहिते-पाटील, बाबुराव सणस, मामासाहेब जगदाळे, अण्णासाहेब मगर, डॉ. श्यामराव कलमाडी असे अनेक पुतळे खेडकर यांनी घडविले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्यादेवी होळकर, महात्मा गांधीजी, स्वातंत्र्यवीर सावरकर, अण्णाभाऊ साठे, कर्मवीर भाऊराव पाटील अशा अनेक थोर व्यक्तींचे प्रमाणबद्ध पुतळे बनवून शिल्पकलेच्या क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटविणारे ज्येष्ठ शिल्पकार बी. आर. ऊर्फ अप्पासाहेब खेडकर नव्वद वर्षांचे झाल्यानंतर काळाच्या पडद्याआड गेले.त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली.




Comments