"श्री एकवीरादेवी, देवपूर,धुळे"
- dileepbw
- Sep 22, 2022
- 1 min read
"सका/शक/Scythian" वंशाच्या लाड सका (लाड शाखीय) वाणी समाजामधील "देव" कुलाची कुलदेवता “श्री एकवीरादेवी, देवपूर,धुळे"
"सका/शक/Scythian" वंशाच्या लाड सका (लाड शाखीय) वाणी समाजामधील "देव" कुलाचे तसेच धुळे - खानदेशातील सुमारे अडीचशे कुलांचे "कुलदैवत" असलेल्या आदिशक्ती "श्री एकवीरादेवी" मंदिराचे मराठीतून संकेत स्थळ(www.aadishaktishriekvira.com) तयार झाले असून त्यामुळे आता भाविकांना देवीचे "ऑनलाइन' दर्शन घेता येईल.
या संकेतस्थळावरील उपयुक्त माहिती समस्त भाविकांसाठी खाली देत आहे :-
सुर्यकन्या "तापी" नदीची उपनदी म्हणून ओळखल्या जाणा-या "पांझरा" नदीच्या तीरावर आदिमाया एकवीरा देवीचे अतिप्राचीन मंदीर आहे. धुळे शहरातील "देवपूर" या उपनगरात असलेल्या या मंदिरातील शेंदूर लेपीत आणि पद्मासनी बसलेली ही स्वयंभू देवी महाराष्ट्रासह मध्यप्रदेश,राजस्थान, कर्नाटक आणि गुजरातमधील अनेक भाविकांची कुलदेवता असल्याने येथे सतत वर्दळ असते.भक्तांच्या संकटांना दूर करून त्यांची मनोकामना पूर्ण करणारी, नवसाला पावणारी, स्वयंभू अशी ही देवी असल्याची भाविकांची श्रध्दा आहे.
आपल्या पराक्रमाने तिन्ही लोकी नावलौकीक मिळविलेल्या "परशूराम" या वीरपुत्राची जननी म्हणून आदिशक्ती एकवीरा देवी ओळखली जाते. एकवीरा आणि रेणुका माता या आदिमाया "पार्वतीचीच रूपे" असून देवीने अनेक अवतार धारण करून असुरांचा नाश केल्याची धारणा आहे.
"जमदग्नी" ऋषींची पत्नी असलेल्या रेणुका मातेचा (रेणूक राजाची पुत्री ) परशुराम हा एकमेव वीर पुत्र असल्याने(कृपया पुतळा पहा) या देवीस 'एक वीरा' असे संबोधले गेले आणि तेच नाव पुढे "एकवीरा" म्हणून रूढ झाले. कर्नाटक राज्यातही देवीचे मंदिर असून तेथूनही अनेक भाविक येथे दर्शनासाठी येत असतात.
प्रभातकाळी पांझरेच्या पात्रातून उगवणा-या सुर्याची कोवळी किरणे(अयांश) जेव्हा पूर्वाभिमुखी असलेल्या या देवीच्या पायी लोटांगण घेतात तेव्हा हे दृश्य डोळयात साठवून घेण्यासारखे असते. यावेळी गाभा-यात सतत तेवत असलेल्या नंदादीपाच्या स्निग्ध प्रकाशातही पद्मासनी बसलेल्या या आदिमायेचे अष्टभूजा रूप अधिकच उजळून दिसते. देवीच्या उजव्या बाजूस श्री गणपती व डाव्या बाजूस तुकाईमातेची चतुर्भूज शेंदूर लेपित मूर्ती आहे.
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६
Comments