
"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ४३"
- dileepbw
- Dec 2, 2023
- 2 min read
"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ४३"
"BJMC-1973 Batch" चे वैशिष्ट्यपूर्ण सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले.सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन !
माझ्या दृष्टीने या सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाची सर्वात मोठी "उपलब्धी" जर काही असेल तर ती माझ्या वैचारिक विरोधकांचे देखील माझ्यावर प्रेम आहे याची आलेली सुखद अनुभूती ! प्रसंग छोटे असतात,पण "मैत्राची महती" सांगून जातात.सांगतो.ऐका !
शनिवार दि.२५ नोव्हेंबर,२०२३ ! आपल्या सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा पहिलाच दिवस ! सकाळी ९.१५ ला "पुणे-लोणावळा" बस आपल्या बी.जे.वैद्यकीय महाविद्यालयातून निघणार होती.रिक्षाने काॅलेजला पोहोचलो. दारातच वाॅचमनने अडवले.ओळख सांगूनही ऐकेना.डीन ऑफिसला फोन लावणार तेवढ्यात गोरखनाथ चिंधे तिथे पोहोचला.शासकीय सेवेत संपूर्ण आयुष्य गेलेले असल्याने त्याने त्याच्या पध्दतीने "शासकीय किल्ली" फिरवताच गेट उघडले व मी माझे "मोडके पाय" घेऊन काॅलेजच्या पायर्यांवरच सुखरूपपणे ठिय्या दिला.
पुढे कॅंटीनमधले आसाराम खाडेने आणलेले कयानीचे केक व श्रुबेरी बिस्किटस् यांच्या बरोबर "चहापान" करून परत काॅलेजच्या पायर्यांपाशी येत नाही तोपर्यंत चिंधेने सर्वांचे सामान गाडीत चढवून त्वरीत निघायची जय्यत तयारी करून ठेवली होती.माझा परंपरागत वैचारिक विरोधक उदय अजोतीकर पायर्यांवर चढताना व उतराना तातडीने मदत करायला पुढे सरसावला.गटावरील "वैचारिक भांडण" एका बाजूला व मैत्र दुसर्या बाजूला याची पहिली प्रचिती आली.
सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनात माझी कट्टर वैचारिक विरोधक मंगलप्रभाने वाचलेल्या दोन कविता मला "वाॅर्निंग" देणार्या आहेत असे काही जणांना वाटले.पण रात्रीच्या भोजनाच्या आधी पक्याने तिची व माझी "दिलजमाई" करून दिली. त्याचा चांगला परिणाम दुसर्याच दिवशी उपाहार घेताना दिसला.मंगलप्रभाने सर्वांच्या समक्ष माझ्या हातात रेशमी बटव्यात गुंडाळलेला एक "उपहार" ठेवला.सर्वांची उत्सुकता ताणली गेली.आत "भातुकलीतले शेंगदाण्याचे लाडू" होते. माझ्या लहानपणी मंगलप्रभा मला असेच लाडू देत असे. गटावरील "वैचारिक भांडण" एका बाजूला व "मैत्र" दुसर्या बाजूला याची दुसरी प्रचिती आली.आज तिने सर्वांसाठीच एक कविता पाठवली आहे.वाचा.
हमने हमेशा वही किया
जो हमे अच्छा लगा
हर रिश्ता निभाया दिलसे
तो गलत क्या किया ?
हम वही करेंगे
जिससे हमे खुषी मिले
हमारी खुषी ही,उसीमे है
जिन्हे हमने चाहा वो खुष रहे
या कवितेपाठोपाठच तिने "थोरात म्हणजे मराठा का?" हा मजेशीर लेख पाठवला आहे.जातीचा प्रश्न म्हणजे सर्वांच्याच जिव्हाळ्याचा प्रश्न ! "आंतरजातीय विवाह" व "दत्तक विधान"
करून ही समस्या दूर होईल का ? यावर आमचे विचार परस्परांहून भिन्न ! "जात नाही ती जात" व समाजाच्या धारणेसाठी "जातीव्यवस्था आवश्यक" हे माझे मत ! तर "जाती व्यवस्थेचे निर्मूलन" हे तिचे ध्येय ! कसला "गुतूडा" आहे ना ? डोक्याची पार "आयमाय" करुन टाकली यड्या !कशाचा कशाला मेळ लागाना.कुणाच्या विचारात कोण गेलंय अन् कोण कोणाचा भक्त ? कायबी समजना !
"जाती विरहीत समाज निर्मिती" ही काळाची गरज असली तरी तसे घडेल असे काही मला वाटत नाही.लोक "जातीपाती" विसरतील याची शक्यता मला तरी दिसत नाही.त्यापेक्षा सर्वांनी "भारतीय" होणे सोपे नाही का ? आज देशाला "कॅशलेस इंडिया" बरोबरच "कास्टलेस इंडिया" होण्याची सुद्धा गरज आहे.नाही का ?
Comments