"हे सुरांनो,चंद्र व्हा"
- dileepbw
- Mar 20, 2023
- 2 min read
"हे सुरांनो,चंद्र व्हा"
बंड्याने महेश काळे यांचे पंजाबमधे गायलेले "हे सुरांनो,चंद्र व्हा" हे गीत आज गटावर सादर करताच मला त्यांच्या मेलबर्नच्या संगीत रजनीचीच आठवण झाली.सांगतो या मेलबर्नच्या संगीत रजनीमधली "शर्मिष्ठा(शर्मिला)" कोण व "ययाती(गौरव)" कोण ते ! त्यासाठी आधी ही पौराणिक कथा व हे गाणे ऐका.
हे सुरांनो, चंद्र व्हा
चांदण्याचे कोष माझ्या
प्रियकराला पोचवा ॥
वाट एकाकी तमाची
हरवलेल्या मानसाची
बरसुनी आकाश सारे
अमृताने नाहवा ॥
शर्मिष्ठा खरंतर राजकन्या, पण एका दुर्दैवी घटनेमुळे ती देवयानीची दासी झालेली आहे. त्यावेळी ती ययातीसाठी हे गाणं म्हणत असते. ती म्हणते, हे सुरांनो, तुम्ही चंद्र होऊन माझ्या प्रियकराच्या आयुष्यात शीतल प्रकाश आणा. त्याच्यापर्यंत चांदण्याचे कोष पोहोचवा. त्याची वाट एकाकी आहे, अंधारमय आहे. तो हरवला आहे, त्याचं चित्त थाऱ्यावर नाही. हे सुरांनो, तुम्ही अमृताची बरसात त्याच्यावर करा. त्याला शांत करा. नवा मार्ग दाखवा. अशी विनवणी शर्मिष्ठा करत आहे.
कुसुमाग्रजांच्या कुशाग्र बुध्दीतून स्त्रवलेले हे नाट्यगीत पं.जितेंद्र अभिषेकी यांनी स्वरबध्द केलेले असून त्यांनीच सर्वप्रथम "ययाति आणि देवयानी" या नाटकात सादर केले होते. अभिषेकीबुवा हे गाणं गाताना इतके तन्मय होत की ते गाणं थेट मनाला भिडत असे. गाताना त्यांचं उजवं बोट आकाशाकडे जात असे. जणू काही ते सुरांना आज्ञाच देत असत.मुळातच 'हे सुरांनो, चंद्र व्हा' ही कल्पनाच सुचणं दिव्य आहे. अशी अलौकिक कल्पना फक्त कुसुमाग्रजांसारख्या महान कवींनाच सुचू शकते.हेच गीत मेलबर्नच्या संगीत रजनीमधे लोकप्रिय हिंदुस्तानी गायक श्री. महेश काळे यांनी सादर केले आणि माझ्या कुटूंबामधे मोठीच क्रांती घडली.
माझा पुतण्या गौरव हा भारतात BE करून उच्च शिक्षणासाठी म्हणून मेलबर्नला गेला आणि तिथलाच "जावई" बनून तिथेच स्थायिक झाला.या माझ्या पुतण्याला त्याची "शर्मिष्ठा(शर्मिला)","हे सुरांनो,चंद्र व्हा" हे गाणे ऐकत असतानाच प्राप्त झाली.खरे तर ती त्याची पुण्यातली बालमैत्रिणच ! "यथा काष्ठंच काष्ठंच" या न्यायाने शाळेत भेटलेली ही "काष्ठे" काळाच्या ओघात "सम्येपच व्यपेयाताम् तद्वत भूत समागम:" या सुभाषिताप्रमाणे अनेक वर्षे एकमेकांपासून दुरावली व "संगीताच्या महिम्या" मुळे पुन्हा एकदा "Oxytocin" च्या वर्षावात एकमेकांना जी भेटली ती साता जन्माकरता एकमेकांशी बांधली जाण्यासाठीच !
अक्षता टाकायला आपले सर्वांचे प्रतिनिधी म्हणून गट व्यवस्थापक डाॅ.नरेंद्र पटवर्धन हजर होतेच !
अभिजात संगीताला व्यापक करण्यासाठी तंत्रज्ञानाची मदतच होते. अमेरिकेतील एका न्यूरो सायंटिस्टसोबत श्री.महेश काळे एक प्रयोग करत आहेत. इलेक्ट्रोडचे हेल्मेट लावलेल्या व्यक्तीला शास्त्रीय संगीत ऐकवल्याचे काय परिणाम होतात हे पाहिले असता शांतता, झोप, विचारशक्ती आणि स्मरणशक्ती वाढल्याचे आढळून आले आहे. गाणाऱ्यांचे स्वास्थ्य, आचरण, संयम कल्पनातीत राहते, असे मत महेश काळे यावेळी व्यक्त केले आहे. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे माझा पुतण्या गौरव व त्याने माझ्या कुटूंबात घडवून आणलेली क्रांती !
Comments