top of page

हॉटेलिंग

  • Aug 1, 2021
  • 4 min read

आजची खाद्य संस्कृती -"हॉटेलिंग"


आज काल "रिलॅक्सेशन" साठी "हॉटेलिंग" करण्याचे मोठे फॅड आले आहे.पण प्रत्येक वेळेस ते साध्य होते का हा एक विचार करण्याचा मुद्दा झाला आहे.


हल्ली कोणाच्याही घरात काही आनंदाचे कारण असो वा जस्ट विकएण्ड असो,हॉटेल मधे जाण्याची जणू परंपराच रूढ होत आहे.


मग अमुक तमुक हॉटेल मधे जायचे,काऊंटर वर आपली नाव नोंदणी करायची आणि मग असहाय्यपणे ४५ मिनीटे ते १ तास बाहेर ’वेटींग’ रहायचे.मग तथाकथीत मॅनेजर आपल्यावर उपकार केल्याच्या भावनेतुन आपणास टेबलाजवळ बसण्यास सांगुन अंतर्धान पावतो. बसणाऱ्यांच्या हिशोबाने ते टेबल कसेतरी पुरेसे असते.मग आपण त्यात स्वत:ला सावरून कसे तरी बसुन चेहेऱ्यावर आनंदी भाव ठेवून गप्पा सुरू करतो. १-२ मेनु कार्ड येतात, त्यात, त्याच त्याच भाज्या वेगवेगळ्या नावाने वाचून ऑर्डर ठरते.तेव्हढयात वेटर येउन सदर मेनुकार्ड भरभर उचलुन 'पाणी साधे का बिसलेरी’ असे विचारतो.दोन्ही पाण्याची क्वालिटी सारखीच असते हे माहीत असून सुध्दा, लाजेकाजे खातर आपण ’बिसलेरी’ म्हणून सांगतो.मग बराच वेळ ताटकळत ठेऊन,८ बाय १० सुप,पापड, "स्टार्टर्स", कोल्ड ड्रिंक इ.गोष्टी येतात.या सर्व गोष्टी आल्यावर हातच काय पण बोट सुध्दा ठेवायला टेबलावर जागा रहात नाही.पण आपण उगाच "कम्फर्टेबल" आहोत असे आविर्भाव तोंडावर ठेवत अपेक्षाभंग झालेले सुप आवाज न करता पित असतो. सहाजिकच स्टार्टर्सची क्वांटिटी कमी असल्याने,जेमे तेम एक एक तुकडा प्रत्येकी आलेला असतो.पण आम्ही एकदम मस्त मुडमधे ! मग मेनकोर्स काय असे विचारणाऱ्या वेटरकडे आपण आशाळभुतासारखे पाहून थोडासा अवधी मागुन घेतो. कोणी व्हेज,कोणी नॉन व्हेज असे ठरत ठरत आपण शेवटी वेटर नी ’सजेस्ट’ केलेले पदार्थ ऑर्डर करतो.त्यानंतर इतका वेळ जातो की टेबलावरील डिशेश मधे राहीलेले स्टार्टर्सचे कण,पापडाचे कण,कांदा,सॉस इ.पदार्थांचे सेवन,सो कॉल्ड गप्पांमधे रमुन सुरू असते.तो पर्यंत आजुबाजुला असलेल्या एखाद्या ग्रुप मधे जोरदार हाश्या खिदळ्यांचा आवाज आपल्या कानांवर आदळत असतो. त्यातच एखादे अगम्य "म्युझीक" बॅक ग्रांउडला लावलेले असते.थोड्या वेळाने जाणवू लागते की जरासे उकडतंय, पण ए.सी.तर चालू असतो.मग आपण वेटरला ए.सी. ’वाढवायला’ सांगतो.तो ’वाढवल्यासारखे’ करून निघून जातो.थंडाव्यात काडीमात्र फरक पडत नाही.मग खूपच गर्दी आहे ना,ते तरी काय करणार असे स्वत:चेच समाधान करून आलेल्या मेनकोर्सच्या वाटणीच्या मागे लागतो.


काही चांगल्या,काही अपेक्षाभंगीत,काही जहाल तिखट तर काही गोड मिटूक भाज्या वाटून घेऊन गप्पांच्या मुडमधे जेवण सुरू करतो.मग सुरूवातीला काही विनोद,

मग एस.एम.एस, मग ’नेबर्स’ बद्द्ल,मग गतकाळातल्या एखाद्या पिकनिकच्या आठवणी, मग भ्रष्टाचार,मग पार्कींग प्रॉब्लेम... इ. इ. इ. विषय ’डिस्कस’ करत असताना लक्षात येत की भाज्या तर संपल्या आहेत आणी वातड रोटी अजून शिल्लक आहे.मग ती रोटी कशीबशी संपवून न वाफाळणारा ’स्टीम राईस’ समोर येतो.आता राईस खायला पुन्हा १ प्लेट ’डाल’ सांगीतली जाते जी डाल,राईस संपता संपता येते त्यामुळे बराचसा राईस हा कोरडा किंवा दह्या बरोबर ढकलला जातो.लगेच फिंगर ’बोल’ ची आज्ञा सुटते आणी नावाला कोमट असलेल्या पाण्याचे बोल येतात.कसे तरी बुचकळून हात ’साफ’ करतो तोच "डेझर्ट" क्या लोगे म्हणून वेटर उभा असतो. बाहेरील एखाद्या नावाजलेल्या दुकानात मिळणाऱ्या आईस्क्रीम पेक्षा कितितरी कमी प्रतीचे सो कॉल्ड ’डेझर्ट’ आपण मागवतो व सरते शेवटी बिल येते.

एका पापडाचे २०-२५ रू;

एका रोटीचे २५-३० रू;

एका सुपचे -१००-१५० रू;

एका भाजीचे १२५-२०० रू;

नॉनव्हेज डीश चे प्रत्येकी २००-४०० रू;

एका डीशचे ६००-८०० रू;

असे एकुण ३००० ते ३५०० रू. चे बिल भरून आपण हसतमुख चेहेऱ्याने हात कोरडे करत असतो.मग त्या बिलाचा राग म्हणा किंवा पैसे वसूल करण्याची आयडीया म्हणा,पण आपण सुगंधीत बडीशोप,चवळ्या मटक्या व टूथपिक,भरभरून घेतो.बिलाचे राहीलेले पैसे परत आल्यावर "टिप" ठेवणे हा एक अविभाज्य भाग असल्या सारखा आपण १०-२० रू. टिप ठेवतो आणि बाहेर पडतो.मग द्वारपालाला १० रू, गाडी उभी करताना आपल्याला ’मदत’ करणाऱ्या गुरख्याला १० रू. देऊन "जळजळीत" ढेकरा देत देत घरचा मार्ग पकडतो.


आपण खालेल्या पदार्थांचे मुल्यांकन पटण्यासारखे असते का याचा जरा विचार करायला हवा.कितपत स्वादिष्ट व आरामदायक असते ते जेवण ? किती वेळा आपण आपले मन मारून गप्प बसलो ? हे सगळे करून काय मिळाले तर रात्रीची वाढणारी ऍसिडीटी, जेमेतेम २०-२५ मिनीटांच्या गप्पा आणी निम्याहुन अधिक खिसा रिकामा ! त्या मग्रुर हॉटेल मालकांचे खिसे आपण का भरायचे ? का नेहमी स्वत:चीच समजुत घालत बसायची ? आता प्रत्येकाचे रहाणीमान ऊंचावले आहे.पण म्हणून असे पैसे उडवायचे ? त्यापेक्षा जे कोणी पार्टी करणारे असतील त्यातील प्रत्येक कुटुंबाने एक एक पदार्थ आपआपल्या घरी करून आणून घराच्या हॉल मधे मस्त गोल करून व्यवथित बसून गप्पा टप्पा करत "किटी पार्टी" चा आनंद का नाही घ्यायचा ? पुण्यात असा आमचा बारा वाणी कुटूंबांचा "किटी फूड पार्टी गृप" गेली अनेक वर्षे अखंडीतपणे चालू आहे.


तसा विचार केला तर हॉटेल मधील पदार्थांपेक्षा कितीतरी पटीने चांगले पदार्थ आपण घरी करतो व खर्चाचा आढावा घ्याल तर जेमतेम निम्मा होतो.शिवाय वाणी पाककृतींचा अनुभव व आनंद घ्यायला मिळतो तो वेगळाच ! बर प्रत्येक कुटुंबाने एक एक पदार्थ आणल्यामुळे कुणा एकावर भार पडत नाही व खऱ्या अर्थी आनंद भोजन होते.


बहुसंख्य भारतीय हाॅटेल्समधे हाच अनुभव येत असताना इंग्लंडमधील लीड्स या शहरातील "लीड्स रेड हॉट" या "विमाना" च्या आकारात बनविलेल्या वैशिष्ट्यपूर्ण उपाहारगृहाचा अनुभव मात्र फारच भन्नाट होता. एका "ठराविक" किमतीत बुफे पध्दतीचे कुठल्याही देशातील (Chinese,Thai,Mexican, Italian and Japanese) कितीही पदार्थ येथे एकाच छताखाली आरामात बसून खाता येतात हे "लीड्स रेड हॉट" या उपाहारगृहाचे वैशिष्ठ्य !


लीड्स शहरातील अन्य कुठल्याही उपाहारगृहात कोठेही अशी सोय नाही.तेथे सर्वत्र "सेल्फ सर्व्हिस" म्हणजे आधी खाद्य पदार्थ काऊंटरवर विकत घेऊन मग आपली जागा शोधून खायची पध्दत आहे.ज्या मांसाहारी व्यक्ती "हलाल" पध्दतीच्या मासाबाबत आग्रही असतात,त्यांचीही सोय "लीड्स रेड हॉट" येथे केलेली आहे.


"लीड्स रेड हॉट" येथे थोडीशी वाट पाहिली की आपला नंबर लागतो.टेबलवर पोहोचून पेयाची आॅर्डर द्यायची व डझनावारी स्टॉल्सवर जाऊन डझनावारी पदार्थांमधून आपल्या आवडीचे पदार्थ आपणच घेऊन यायचे ही "लीड्स रेड हॉट" ची पध्दत ! आपल्या आवडीचा कुठल्याही देशातील पदार्थ आपल्या मागणीनुसार आपल्यासमोर तयार करून देण्याची देखील येथे सोय आहे. आपली डिश भरून जागेवर येई पर्यंत आपण अॉर्डर केलेले पेय टेबलवर तयार असते.अजून पेय हवे असल्यास ते जेवणाच्या मधेच देखील सांगता येते. संपलेली डिश लगेच उचलून नेतात. पुन्हा नवीन डिश घ्यायची व किचन किंवा बुफे टेबलकडे आपला मोर्चा वळवायचा ! काय चाखू अन काय नको अशी अवस्था होऊन जाते.देवाने एका ऐवजी अनेक पोटे का दिली नाहीत असे वाटायला लावणारे अनेक उत्तमोत्तम पदार्थ येथे अतिशय आकर्षक पध्दतीने मांडलेले आहेत.सॅलड्स् व डेझर्ट्सची मांडणी तर एकदम दिलखेचक ! शिवाय "चॉकेलेट फाऊंटन" ची सोय ! त्यामुळे आपल्या डेझर्टवर

चॉकेलेट ओतून घेण्यासाठी बालगोपालांची तेथे तोबा गर्दी !


असे साग्र-संगीत जेवण आटोपले की बील जाग्यावरच येते तेही आधी ठरलेल्या ठराविक रकमेचे ! कितीही खा, काहीही खा, सर्वांना बील सारखेच ! कधी कधी स्कीम चालू असेल तर बीलामधे सवलत देखील मिळते.


"लीड्स रेड हॉट" ला भेट दिल्यामुळे विविध देशांच्या विविध पाककृतींना दाद देता आली व त्या त्या देशांची वैशिष्ट्ये समजावून घेता आली.भारतातील हाॅटेल्समधे वर उल्लेख केलेल्या सर्वसाधारपणे अनुभवायला मिळणार्‍या अनुभवापेक्षा "लीड्स रेड हॉट" चा अनुभव निश्चितच सुखद होता.

 
 
 

Recent Posts

See All
"Oppenheimer - Part २०"

"Oppenheimer - Part २०" काल रात्री जावई सागर,कन्या किर्ती,बंधू सुहास,वहिनी प्रतिभा व पत्नीची वहिनी माधवी असा सहकुटुंब सहपरिवार घरबसल्या...

 
 
 
"आपटा रेल्वे स्टेशन"

"आपटा रेल्वे स्टेशन" माझ्या आयुष्यात "पनवेल-आपटा रेल्वे स्टेशन" ला मनोरंजनाच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे. अकरावी,पी.डी.व...

 
 
 
"मृगागड किल्ला, ता.सुधागड,जि.रायगड"

"मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" आपला वर्गमित्र बापू घोडके यांने नुकताच "मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" हा आपल्या सुवर्ण महोत्सवी...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page