"Manjit's Manjinopathy - संगीत रिसर्च अकादमी"
- dileepbw
- Sep 3, 2023
- 2 min read
"Manjit's Manjinopathy - संगीत रिसर्च अकादमी"
©दिलीप वाणी,पुणे
मनजीत गटावर सक्रीय झाल्यापासून गटावरील सगळेच "संगीतप्रेमी" एकदम जागरूक झाले आहेत.उदयच्या रोजच्या अप्रतिम गीतांना इतके दिवस मनातल्या मनात "दाद" देणारे आता चक्क संगीतावर भाष्य करू लागले आहेत.ही आनंदाची गोष्ट आहे.शांतारामने कवितेत म्हटल्याप्रमाणे "दिलकी खिचडी पकाये मंजीत दिलवाला" यात "साधू वाणी डाले पानी और मिर्च मसाला" हे खरे तर उदयच्या "आलापाच्या कोड्या" मुळे घडले आहे.आता शेवटचे काही आलापच बाकी आहेत.ते आज सांगेन.त्यानंतर मनजीतने सांगीतल्याप्रमाणे "माथाफोड" करून संगीताचा "शास्त्रशुध्द अभ्यास"(chords and scales) करेन. "Manjit's Manjinopathy" चे Victim बनलेल्या पक्या,जया,इकबाल,शांताराम,टोपी, उदय,दीप्या यांनी "शाम" या विषयावरची गाणी ऐकताना त्याचा जरूर आस्वाद घ्यावा.आज कलकत्त्याच्या "संगीत रिसर्च अकादमी" ची माहिती सांगतो.
"संगीत रिसर्च अकादमी"
संपूर्ण भारतभर आपल्या वैशिष्ट्यपूर्ण सांगीतिक कामगिरीमुळे प्रसिद्ध झालेली ही संस्था १ सप्टेंबर १९७७ रोजी कोलकाता येथे सुरू झाली. भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रसार आणि संवर्धनाचे ध्येय समोर ठेवून "अल्दिन" या ऐतिहासिक इमारतीमध्ये या संस्थेची स्थापना करण्यात आली. इंडियन टोबॅको कंपनीचे तत्कालीन अध्यक्ष अजीत नारायण हक्सर आणि आग्रा घराण्याचे संगीतज्ञ आणि कलाकार विजय किचलू यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे हे कार्य सुरू झाले.
विजय किचलू हे या संस्थेचे पहिले कार्यकारी संचालक होते. त्यांच्या तळमळीच्या अथक प्रयत्नांना या संस्थेच्या यशाचे श्रेय द्यावे लागेल. ही संस्था संगीतविषयक पुढील तीन उद्दिष्टे ठेवून कार्यरत आहे.
१. प्रभावी संगीत प्रशिक्षणाच्या व्यवस्थेची उत्तम रचना करणे;
२. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून परंपरागत सांगीतिक साहित्याचे आणि घटकांचे जतन करणे; ३. भारतीय संगीताचे संरक्षण आणि त्याचा प्रचार-प्रसार करणे.
स्थापनेपासून भारतातील पारंपरिक संगीत घराण्यांचे शिक्षण देणारे व्यावसायिक दर्जाच्या नियोजनाचे गुरुकुल, आधुनिक साधनांच्या परिपूर्ण उपयोजनाने साकारलेली गुरुशिष्य संगीत प्रणाली, निरनिराळ्या घराण्याच्या उत्तम गायकवादकांचे, आपापली वैशिष्ट्ये ठळकपणे दर्शविणारे सुमारे सतरा हजार तासांचे दर्जेदार ध्वनीमुद्रण संग्रही असलेला हा प्रकल्प आणि विविध विषयावरील सांगीतिक शोध प्रक्रियांचे यशस्वी संयोजन आदी वैशिष्ट्ये आणि बहुआयामी सांगीतिक कार्यामुळे ही संस्था संगीतजगतात आपले स्थान टिकवून आहे.
हिराबाई बडोदेकर, ध्रुवतारा जोशी, गिरिजादेवी, निसार हुसेन खाँ, निवृत्तीबुवा सरनाईक, ए. कानन, मालविका कानन, के. जी. गिंडे इत्यादी दिग्गज कलाकारांनी सुरुवातीच्या काळात येथे विद्यादान करून जिज्ञासू विद्यार्थ्यांना आपापल्या घराण्याची अस्सल गायकी शिकवण्याचे अतिशय मोलाचे कार्य केले.
१९७८ पासून अकादमीने सुमारे १४० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे. या शिष्यांनी भारतासहित जगभरात आपल्या सांगीतिक कौशल्याने स्वत:ची वेगळी प्रतिमा निर्माण केलेली आहे. तसेच अकादमीमधून जे ज्ञान त्यांना मिळालेले आहे, त्याचा अधिकाधिक विकास करून शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसारही ते करीत आहेत. आज संगीताच्या विविध क्षेत्रात प्रसिद्ध असलेली अजय चक्रवर्ती, रशीद खान, कौशिकी चक्रवर्ती, ओंकार दादरकर ही सारी शिष्य मंडळी याचेच उदाहरण आहेत. अलीकडच्या काळात उल्हास कशाळकर, बुद्धदेव दासगुप्ता, उदय भवाळकर आदींनी हे विद्यादानाचे व्रत स्वीकारून संस्थेचा लौकिक सर्वदूर पोहोचवला आहे.
सद्यस्थितीत संपूर्ण भारतभरातून निवडले गेलेले सुमारे चाळीस विद्यार्थी आजही येथे गुरुकुल पद्धतीने शिक्षण घेत असून या आणि इतर अनुषंगिक सांगीतिक उपक्रमामुळे संस्था प्रसार-संवर्धनाच्या कार्यात अग्रस्थानी राहिली आहे.




Comments