top of page

"Manjit's Manjinopathy - हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत"

  • dileepbw
  • Sep 3, 2023
  • 3 min read

"Manjit's Manjinopathy - हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत"

©दिलीप वाणी,पुणे

मनजीत गटावर सक्रीय झाल्यापासून गटावरील सगळेच "संगीतप्रेमी" एकदम जागरूक झाले आहेत.उदयच्या रोजच्या अप्रतिम गीतांना इतके दिवस मनातल्या मनात "दाद" देणारे आता चक्क संगीतावर भाष्य देखील करू लागले आहेत.ही आनंदाची गोष्ट आहे.शांतारामने त्याच्या कवितेत म्हटल्याप्रमाणे "दिलकी खिचडी पकाये मंजीत दिलवाला" यात "साधू वाणी डाले पानी और मिर्च मसाला" हे खरे तर उदयच्या "आलापाच्या कोड्या" मुळे घडले आहे.चक्क साता समुद्रापलीकडील हेमंत इंगळेने सुध्दा त्यात रस घेतला. काल सगळे "अकरा आलाप" संपले.आता बाकी काही नाही. आता Manjit's Manjinopathy" चा Victim बनून संगीताचा "शास्त्रशुध्द अभ्यास"(chords and scales) सुरू केला आहे. पक्या,जया, इकबाल,शांताराम,टोपी,उदय, दीप्या यांनी या विषयाचा जरूर आस्वाद घ्यावा.आज "हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत" याची माहिती देतो.

कोणत्याही कलेचे स्वरूप सतत बदलत असते. नव्या गोष्टींचा अंतर्भाव सतत होत असतो. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतदेखील याला अपवाद नाही. या संगीताचा उगम शोधायचा तर पार सामवेदापर्यंत जाता येते. सामवेदातल्या ऋचांचे गायन हे शास्त्रीय संगीताचे मूळ आहे. नंतरच्या काळात उत्क्रांती, लय, बदल यामधून संगीत परिष्कृत झालेले दिसते.

कोणत्याही कलेचे स्वरूप सतत बदलत असते. नव्या गोष्टींचा अंतर्भाव सतत होत असतो. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतदेखील याला अपवाद नाही. या संगीताचा उगम शोधायचा तर पार सामवेदापर्यंत जाता येते. सामवेदातल्या ऋचांचे गायन हे शास्त्रीय संगीताचे मूळ आहे. नंतरच्या काळात उत्क्रांती, लय, बदल यामधून संगीत परिष्कृत झालेले दिसते.

वैदिक काळात दोन प्रकारचे संगीत होते. ‘मार्गी’ म्हणजेच गांधर्व संगीत आणि ‘देशी’ संगीत. यापैकी देशी संगीत हे जनसामान्यांचे व परिवर्तनशील होते. मार्गी संगीत फक्त गंधर्व गात. ते अपरिवर्तनशील होते, असे सांगितले जाते. कालांतराने मार्गी संगीत लुप्त होऊन फक्त देशी संगीत उरले. आजूबाजूच्या संगीताचे आणि अनेक सामाजिक-सांस्कृतिक घटनांचे पडसाद या संगीतात उमटले. त्या काळी उदात्त, अनुदात्त व स्वरित एवढे तीनच स्वर होते. त्यातही उत्क्रांती होऊन पुढे स्वरांची भर पडत गेली.

सामवेदातील ऋचांचे पठन करण्याची विशिष्ट शिस्त होती. या शिस्तीतून बंध तयार झाला. त्याचे नाव ‘प्रबंध’. महत्त्वाचे म्हणजे प्रबंध हा समूहगायनाचा प्रकार होता. साहजिकच समूहगायनाला आवश्यक नियम व त्यासाठीची शिस्त यातून एक घाट तयार झाला असावा. साधारण सात-आठव्या शतकापासून तेराव्या शतकापर्यंत प्रबंधगायन प्रचलित होते. प्रबंध अनेक असायचे. ‘ध्रुव’ नावाचाही एक प्रबंध होता. त्यावर आधारित ‘धृपद’ हा या इतिहासातला पुढचा टप्पा आहे. साधारण पंधराव्या शतकापासून धृपद हीच प्रमुख शास्त्रीय गायनशैली म्हणून ओळखली जाऊ लागली. नोम्-तोमने चढत्या लयीकडे सरकत जाणारे रागाचे स्वरूप व भारदस्त आवाजाची आक्रमक अशी ही गायकी आहे. आक्रमक वजनदार गमकातून स्वर गदागदा हलल्याचा भास होतो. चौताल, सूलतालासारख्या थापिया बाजाच्या तालांची पखवाजवरची साथ, गाताना तालाशी मस्तीकुस्तीचाही आनंद देते. ईशस्तुती किंवा राजाची स्तुती असलेले धृपदाचे काव्य जेव्हा देवालयांमध्ये आणि दरबारात सादर केले जात असेल, तेव्हा निश्चितच वातावरणात बोज किंवा गांभीर्य निर्माण होत असेल.

होरीचे वातावरण निर्माण करणारी धमार नावाची गायकीही धृपदाच्या बरोबरीने प्रसिद्ध होती. पुढे शास्त्रीय संगीतातून भक्तीच्या जोडीला शृंगारही सादर केला जाऊ लागला. त्याकाळात मुस्लिम राज्यकर्त्यांच्या आक्रमणाबरोबरच त्या संस्कृतीतील संगीताचाही परिचय झाला. धृपद व कव्वालीसारख्या दोन्ही संगीत संस्कृतीतील संगीतशैलींच्या संकराने नवीन शैली उदयास आली, जिचा प्रभाव आजही अबाधित आहे. ‘ख्याल’ हे या नव्या शैलीचे नाव. तेराव्या शतकात आमीर खुस्रो यांनी ख्याल निर्माण केला. पंधराव्या शतकात सुलतान हुसैन शर्की यांनी त्यात लक्षणीय कार्य केले. ख्यालगायकी खऱ्या अर्थाने लोकप्रिय झाली, अठराव्या शतकातील सदारंग-अदारंगांच्या बंदिशींनीच. पाच शतकांचा हा मोठा काळ आहे. आजही त्या बंदिशी गाताना परंपरागत ‘चीज’वस्तू मांडल्याचा आनंद गायकाला मिळतो.

ख्याल म्हणजे खयाल किंवा अंदाज. गायकाला आपल्या अंदाजाने (हा उर्दू शब्द) किंवा कल्पनेने गायला मुभा मिळणे, हा यातला गर्भितार्थ आहे. प्रबंधगायन सामूहिक होते. धृपद मात्र एकल गायन होते. त्यामुळे समूहाच्या शिस्तीसाठीचे नियम धृपदाला अनावश्यक वाटू लागले. तरीही, ‘दरबारी’ संकेतातून येणारे नियम त्यात होतेच. त्या नियमांचा अडसर वाटणे व कव्वाली-सादरासारख्या काही गायन शैलींचे आकर्षण वाटणे ही प्रक्रिया अनेक शतके चालली. कडक नियमांच्या बंधनातून बाहेर पडण्याचा व नवीन प्रभाव स्वीकारण्याचा कलेचा स्वभाव प्रबंध ते धृपद या प्रवासात दिसला होता. तो धृपद ते ख्याल याही प्रवासात पुन्हा एकदा स्पष्ट झालेला दिसतो.

ख्याल गायकी रूढ होऊन आता तीन शतके उलटून गेली आहेत. दरम्यान ख्यालगायकीत अत्यंत बळकट अशा ‘घराण्यां’च्या शिस्तीचे नियम आलेत. घराण्यांच्या व्यवस्थेचे हे बुरूजही आता ढासळले आहेत. आजच्या काळातील हा बदल अतिशय लक्षणीय आहे. वेगवेगळ्या गायकीचा संकर करून अनेक प्रतिभावान गायक आपली नवी शैली विकसित करत आहेत. एवढेच नव्हे तर इतर संस्कृतीतील गायनशैलीसोबतच्या रिमिक्स आणि फ्युजनमधून अभिव्यक्तीच्या वाटा शोधायचा प्रयत्न कलावंतांकडून केला जातो आहे. बाराव्या शतकातील संतकवी बसवण्णा लिहितात, जे स्थिर-स्थावर तेच क्षणिक, जे वाहते-जंगम तेच शाश्वत. कलेतील चिरंतनाचा व प्रवाहीत्वाचा वेध घेण्याची इच्छा सर्व कलांप्रमाणे संगीतातही दिसते. हेच कलांचे वैशिष्ट्य आहे.

Recent Posts

See All
"Manjit's Manjinopathy - "थप्पा"

"Manjit's Manjinopathy - "थप्पा" मनजीत गटावर सक्रीय झाल्यापासून गटावरील सगळेच "संगीतप्रेमी" एकदम जागरूक झाले आहेत.उदयच्या रोजच्या अप्रतिम...

 
 
 
"Manjit's Manjinopathy - महाराष्ट्र संगीत"

"Manjit's Manjinopathy - महाराष्ट्र संगीत" ©दिलीप वाणी,पुणे मनजीत गटावर सक्रीय झाल्यापासून गटावरील सगळेच "संगीतप्रेमी" एकदम जागरूक झाले...

 
 
 
"तसव्वुर-ए-जानाँ"

"तसव्वुर-ए-जानाँ" ©दिलीप वाणी,पुणे उदय,रोहिदास व इकबाल यांनी मिर्जा गालिब यांच्या "बैठे रहें तसव्वुर-ए-जानाँ किये हुए" या शेरची आठवण करून...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page