"रंगू बाजारला जाते हो जाऊ द्या"
- dileepbw
- Sep 4, 2023
- 2 min read
"रंगू बाजारला जाते हो जाऊ द्या"
©दिलीप वाणी,पुणे
उदयने "रंगू बाजारला जाते हो जाऊ द्या" या इ.स.१९५० सालातील "वंशाचा दिवा" या चित्रपटातील सुधीर फडके यांच्या पत्नी सौ.ललिता फडके यांनी गायलेले गीत सादर करून सर्वांनाच कोड्यात टाकले.सुधीर फडके यांनी संगीतबध्द केलेल्या गदिमांच्या या गीताला वसंतराव देशपांडे यांनी पण आपला आवाज दिला आहे.ऐका हे गाणे !
रंगू बाजारला जाते हो, जाऊ द्या !
दही इकाया नेते हो, नेऊ द्या !
रंगू डुलत डुलत चालते
गोर्या नाकात नथनी हालते
हाक मारावी एकदा वाटते, राहु द्या !
जरा थांबून बोल ग रंगू
माझ्या मनातलं कसं ग सांगू?
तुला पाहून काळीज तुटते, तुटु द्या !
रंगू वळख आहे मी कोण?
माझ्या पायातला पैंजण !
मी पायातलं पायात ठेवते, ठेवु द्या !
तुझा पाठलाग रंगू करीन
अशी मुरडून कान मी धरीन
तुझं कानशील थोडं शेकते, चालु द्या !
केली थट्टा अंगाशी आली
लाज रंगूची माझ्या गाली
रंगू मर्दानी थाटात चालते, चालू द्या !
मला या गाण्यावर बेतलेले रमेश देव व जयश्री गडकर यांच्यावर चित्रित झालेले "गोमु माहेरला जाते हो नाखवा" हे गाणे मात्र लगेच आठवले.दीप्या म्हणतो तसे "रंगू बाजारला जाते हो जाऊ द्या" हे गाणे
आपल्या बापजाद्यांच्या काळातले ! ते कसे आठवेल ?
या गाण्याच्या निमित्ताने ललिता फडके (पूर्वाश्रमीच्या ललिता देऊळकर) यांची माहिती सांगतो. अभिनेते हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय यांनी त्यांना हिंदी सिनेमात आणले.‘बॉम्बे टॉकीज’ची आघाडीची नायिका देविकाराणी सोबत ‘दुर्गा’ मध्ये एक फुटकळ भूमिका त्यांनी केली. याच संस्थेच्या ‘अंगूठी’ मध्ये त्या दोन गाणीही गायल्या. ‘बंधन’, ‘कंगन’ या चित्रपटांपर्यंत त्या ‘बॉम्बे टॉकीज’ मध्ये होत्या. १९४० च्या दशकाच्या अखेरीस खर्या अर्थानं पार्श्वगायनाचं युग आलं.याच काळात सी. रामचंद्र यांनी ललिताबाईंच्या आवाजाचा कल्पकतेनं वापर करुन घेतला.त्यांचं संगीत असलेल्या “साजन” मधलं ‘हमको तुम्हारा ही आसरा’ हे ललिताबाईंनी मोहम्मद रफीसोबत गायलेलं गाणं चांगलंच गाजलं.पण कहर केला तो सी. रामचंद्र यांच्याच “नदिया के पार” मधल्या ‘मोरे राजा हो… ले चल नदिया के पार’ या ललिता आणि रफी यांच्या युगुलगीतानं ! बडे संगीतकार मास्टर गुलाम हैदर यांनीही ‘शहीद’ साठी ललिताबाईंकडून दोन गाणी गाऊन घेतली. त्यातलं ‘कदम उठाकर रुक नहीं सकता’ हे समरगीत आजही आठवणीत आहे.
याच काळात मराठीतले उगवते संगीतकार सुधीर फडके यांच्यासाठीही त्या गायल्या आणि पुढे त्यांच्याशी विवाहबध्द झाल्या. २९ मे १९४९ रोजी झालेल्या त्या विवाह सोहळ्यात खुद्द मोहम्मद रफीनं "मंगलाष्टकं" म्हटली होती, हाही एक दुर्लभ योग !
ललिताबाईंनी मराठीतही आपल्या आवाजाचा ठसा उमटवला. जशास तसे, मायबहिणी, उमज पडेल तर, वंशाचा दिवा, जन्माची गाठ, माझं घर माझी माणसं, रानपाखरं, चिमण्यांची शाळा, प्रतापगड इत्यादी चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केलं.
आशा भोसले यांना सर्वप्रथम ललिताबाईंना पारखलं होते. त्यांनीच बाबूजींकडे आशाबाईंचे नाव सुचवले होते. पुणे आकाशवाणीवर सर्वप्रथम सादर झालेल्या ‘गीतरामायण’ मधली गीतरामायणातील कौसल्येची सर्व गाणी ललिताबाईंनी गायली आहेत.
सुधीर फडके यांच्या व्यक्तिमत्त्वाला सामाजिक आणि राजकीय पैलूही होते. त्यातील सर्व टप्प्यांवर बाबूजींना खंबीर साथ मिळाली ती ललिताबाईंची, म्हणूनच ‘गदिमा प्रतिष्ठान’तर्फे काही वर्षांपूर्वी ललिताबाईंना लाभलेला ‘गृहिणी-सखी-सचिव’ पुरस्कार त्यांच्या कर्तृत्वाचा मान राखणाराच ठरला.न‘ललिताने घराकडे पूर्णपणे लक्ष दिल्यामुळेच मी एवढे यश मिळवू शकलो’, असं अभिमानानं सुधीर फडके सांगत. जेष्ठ संगीतकार व गायक श्रीधर फडके हे त्यांचे चिरंजीव होत. ललिता देऊळकर फडके यांचे निधन २५ मे २०१० रोजी झाले.
Comments