"मधुबाला ती मधुबाला - भाग ८"
- dileepbw
- Sep 4, 2023
- 2 min read
"मधुबाला ती मधुबाला - भाग ८"
©दिलीप वाणी,पुणे
आरतीने वसंत बापट यांची "मधुबाला" ही कविता सादर करून मला एक नवीन लेखमाला लिहायला प्रवृत्त केले आहे.हरीवंशराय बच्चन यांच्या "मधुशाला" या काव्याचे स्मरण करून कवीवर्य वसंत बापट म्हणतात "तुम्हास तुमची मधुशाला
अम्हास प्यारी मधुबाला" ! ही "नार अनारकलीसम नाजुक" माझ्या आयुष्यात आली ती "मुगल-ए-आजम" मुळे ! त्यातील तो "शीशमहल" म्हणजे बापटांचा "महाल स्वप्नांचा झगमगता" ! त्यात नृत्य करता करता साक्षात अकबर बादशहाला लाडिकपणे "प्यार किया तो डरना क्या" असे विचारणा करणारी मधुबाला म्हणजे "लखलखली चंद्रज्वाला" च ! वसंत बापट म्हणतात ते खरे आहे."रजतपटावर कितीक झाल्या,मधुबाला ती मधुबाला" ! अशा या मधुबालासाठी माझे दोन शब्द !
१९६० साली मधुबालाचा एक असा सिनेमा रिलीझ झाला जो दिग्दर्शक प्यारेलाल ऊर्फ पी.एल.संतोषी यांच्या कारकीर्दीतील एक सर्वोत्कृष्ट सिनेमा होता. ‘बरसातकी रात’ ! यातील प्रत्येक गाण्यात अब्दुल हयी ऊर्फ साहिर लुधियानवीने प्राण ओतले आणि संगीतकार रोशननं अवीट सुंदर चालीत प्रत्येक गाण्याला बांधून ते अजरामर केलं ! नायक म्हणून भारत भूषण होता.काय त्याच्या सात पिढ्यांची पुण्याई होती न कळे, पण चेहेर्यावरची माशी पण न हलणारा माणूस मधुबालाचा नायक असावा ही केवढी मोठी शोकांतिका !
मुस्लिम पार्श्वभूमीवरची मधुबालाची भूमिका अविस्मरणीय ठरली. ‘जिंदगीभर नहीं भूलेंगी वो बरसातकी रात’ या रफीने म्हटलेल्या गाण्यात ‘सुर्ख आँचलको दबाकर जो निचोडा उसने’ या ओळीच्या वेळी भिजलेल्या ओलेत्या मधुबालाला पहाताच माझ्यासारख्या रसिक नायकाला हृदयविकाराचा झटका आला असता. वर हे गाणं रेडिओवर ती ऐकताना तिच्या चेहेर्यावरचे ते सलज्ज भाव. आपल्या अख्ख्या आयुष्यात कैक नायिकांना ओलेत्या दाखवूनही जे राज कपूरला आयुष्यभरात साधलं नाही, ते सगळ्याच बाबतीत उत्कृष्ट असं गाणं ‘बरसातकी रात’नं देऊन तमाम सिनेरसिकांना या सिनेमाचा,मधुबालाचा,साहिरचा,रोशनचा, पी.एल्.संतोषीचा आणि रफीचा ऋणाईत करून सोडलं राव !
याखेरीज ‘ना तो कारवाँकी तलाश है’ , ‘ये ईश्क ईश्क है ईश्क ईश्क’, ‘निगाहे नाजके मारोंका हाल क्या होगा’सारख्या कव्वाल्या, ‘मुझे मिल गया बहाना तेरे दीदका’, ‘गरजत बरसत सावन आयो रे’, ‘मैंने शायद तुम्हें पेहलेभी कभी देखा है’ सारखी लाजवाब गाणी. हा सिनेमा म्हणजे तमाम संगीतप्रेमी आणि रसिक प्रेक्षकांसाठी मेजवानी होती मेजवानी. सिनेमा तूफान चालला हे वेगळं सागणं न लगे !




Comments