"भारतीय संगीत - भाग २१"
- dileepbw
- Sep 4, 2023
- 2 min read
"भारतीय संगीत - भाग २१"
©दिलीप वाणी,पुणे
निसर्गाने मला "धन्य ती गायनी कळा" बहाल केलेली नसली तरी चांगला "कानसेन" बनविला आहे.तसेच प्रत्येक गोष्टीचे बारकाईने निरीक्षण करण्याची,त्याचा अभ्यास करण्याची व त्यावरून काही अनुमान काढण्याची प्रवृत्ती दिलेली आहे. सुदैवाने वैद्यकीय शिक्षण घ्यायची संधी मिळाल्याने
आजपासून "संगीत व वैद्यक" यांचा तुलनात्मक अभ्यास सुरू करतो आहे.प्राचीन भारतीय संस्कृतीचा अभिमानी असल्याने तेथूनच सुरूवात करतो.सर्वांनी कृपया सहकार्य करावे.ही नम्र विनंती.
हिंदुस्थानी संगीताच्या क्षेत्रात जुन्या पिढीतील केसरबाई केरकर,मोगूबाई कुर्डीकर,रोशनआरा बेगम, हिराबाई बडोदेकर,बडे गुलामअलीखाँ, अमीरखाँ, विलायत हुसेनखाँ, निसार हुसेनखाॅ, रहिमुद्दिनखाँ डागर,सवाई गंधर्व ऊर्फ रामभाऊ कुंदगोळकर,नारायणराव व्यास,विनायकराव पटवर्धन,मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर इ. थोर गायक कलावंतांची एक संपन्न परंपरा दिसून येते.
सुगम-शास्त्रीय संगीतात रसूलनबाई, बेगम अख्तर, सिद्धेश्वरीदेवी ही काही अग्रगण्य नावे होत. सध्याच्या आघाडीच्या गायकांमध्ये कुमार गंधर्व, भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे,गंगूबाई हनगल,निवृत्तीबुवा सरनाईक, बसवराज राजगुरू, माणिक वर्मा, मालिनी राजूरकर,मल्लिकार्जुन मन्सूर, जसराज, जितेंद्र अभिषेकी, रामभाऊ मराठे, प्रभा जोशी, किशोरी आमोणकर इ. थोर कलावंतांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे दालन समृद्ध केले आहे. भीमसेन जोशी यांनी आपली किराणा घराण्याची गायकी सुयोग्य वैशिष्ट्यांनी अलंकृत करून मांडल्याने व रागदारीवर आधारलेली ‘अभंगवाणी’ लोकप्रिय केल्याने जनमानसात आवडत्या गायकाचे खास स्थान निर्माण केले आहे.
कुमार गंधर्व यांनी लोकसंगीताचेही सखोल अभ्ययन करून त्यावर आधारलेली रागरचना निर्माण केली आहे. किशोरी आमोणकर यांनी सततच्या सूक्ष्म चिंतनाने अत्यंत विशुद्ध असे शास्त्रीय रागस्वरूप मांडण्यासाठी निष्ठापूर्वक परिश्रम केले आहेत. सुगमशास्त्रीय संगीतात गिरीजादेवी, निर्मला अरुण, लक्ष्मीशंकर, शोभा, गुर्टू, परवीन सुलताना इ. कलावंतांनी स्वतःची अशी खास वैशिष्ट्ये व गायकी सिद्ध केली आहे. चित्रपटसंगीताच्या क्षेत्रात महान गायिका लता मंगेशकर यांचे स्थान अनन्यसाधारण आहे. अन्य पार्श्वगायक-गायिकांमध्ये महंमद रफी, मुकेश, आशा भोसले, किशोरकुमार इत्यादींनी आपली खास वैशिष्ट्ये निर्माण केली आहेत. चित्रपटसंगीत देणाऱ्या संगीतकारांत सी. रामचंद्र,वसंत देसाई, नौशाद, एस्. डी वर्मन, मदनमोहन इ. संगीतदिग्दर्शकांनी हिंदुस्थानी शास्त्रीय रागदारीवर तसेच लोकसंगीतावर आधारलेल्या संगीतरचना दिल्या तर शंकर जयकिशन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, आर्. डी. बर्मन इ. संगीतदिग्दर्शकांनी पाश्चात्य संगीताचाही उपयोग आपल्या संगीतरचनांत केल्याचे दिसून येते.
ज्येष्ठ वादकांमध्ये सतारवादनात विलायतखाँ, निखिल बॅनर्जी, अब्दुल अली जाफरखाँ, रईसखाँ इ. कलावंतांनी आपला श्रेष्ठ वादनकौशल्य प्रकट केले आहे. तसेच तबलावादनात अल्लारखाँ व त्यांचे सुपुत्र झाकीर हुसेन, सामताप्रसाद इ. वादक अग्रगण्य आहेत. हरिप्रसाद चौरासिया यांनी बासरीवादनावर असामान्य प्रभुत्व मिळवले असून कंठसंगीताची सर्व वैशिष्ट्ये ते आपल्या वादनातून प्रकट करतात. सरोदवादनात अली अकबरखाँ, व्हायलिनवादनात व्ही. जी. जोग, सारंगीवादनात रामनारायण व संतूरवादनात शिवकुमार शर्मा हे सुविख्यात आहेत.




Comments