top of page

"भारतीय रागदारी - भाग - १९"

  • dileepbw
  • Sep 5, 2023
  • 4 min read

"भारतीय रागदारी - भाग - १९"

©दिलीप वाणी,पुणे

अंजली मंगरूळकरने दिलेल्या "रागां" च्या अनेक उदाहरणांमधील आपण गुलजार यांनी "भैरव" या "रागा" मधे बांधलेले "बंटी आणि बबली" या चित्रपटातले बच्चन कुटूंबीयांवर चित्रीत झालेले आलिशा चिनाॅय,शंकर महादेवन व जावेद अली यांनी गायलेले "कजरा रे कजरा रे" या गाण्याचा आपण अभ्यास केला.पक्याने रागांचा आरोग्यावर परिणाम होतो का ? असे विचारल्याने हा लेख लिहित आहे.वाचा.

१.हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात राग-रस, राग-समय या संकल्पनांचं सक्तीनं पालन करायचं म्हटलं तर भारतीय संगीताचंच नुकसान होणार आहे. काळानुरूप या संकल्पनांनी आज आपले संदर्भ सोडून दिले आहेत. तरीसुद्धा डोळे बंद करून त्यांचं पालन होताना दिसतं आहे. या सिद्धांतांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहणं जरुरीचं आहे. अन्यथा भारतीय संगीतातील काही राग कालौघात नामशेष होतील.

२.वैदिक मंत्रापासून ते आजच्या संगीत घाट किंवा संगीत प्रकारापर्यंत संगीत विकासाच्या वाटेत नादाची गुणवत्ता, संगीत सामग्री, स्वराकृतींतील विविधता, त्यांचं सौंदर्य, त्यांची चाल, प्रस्तुतीकरण यासंबंधात भारतीय संगीताची पावलं सतत विकासाच्या वाटेवर चालताहेत.

३.मौखिक परंपरेमुळं भारतीय संगीत सुरक्षित राहिलं. परंतु जेव्हा जेव्हा गरज भासली तेव्हा तेव्हा मूळ धारेबरोबरच नवीन गोष्टींनाही त्यानं आपलंसं केलं. मात्र, केवळ अशाच गोष्टींना संगीतानं सामावून घेतलं, ज्या भारतीय संगीताच्या मूळ धारेला समृद्ध करणाऱ्या होत्या. अडचणीच्या काळात भारतीय संगीतानं स्वत:ला केवळ सुरक्षितच ठेवलं नाही, तर पावलागणिक स्वत:ला अधिक सशक्त, समृद्ध केलं.

४.मागच्या पिढीनं पारंपरिक म्हणून जे गायलं/ वाजवलं, ते अनेक शतकांपासून विकसित झालेलं संगीत होतं हे आपण लक्षात घ्यायला हवं. जुन्या पिढय़ांनी गायलेलं/ वाजवलेलं संगीत हे त्या, त्या काळात कलेच्या मागणीसाठी कलाकारांना करावे लागलेले बदलेलं संगीत होतं. काळ बदलतो आहे पाहून कलाही बदलते. हे बदल नुसते अपरिहार्य नसतात, तर महत्त्वाचे, आवश्यकही असतात. त्यामुळे कला त्या, त्या काळाच्या संदर्भात अनुभवायला हवी. स्वच्छ मनानं कुठल्याही घटनेचा अनुभव घेणं फार कठीण असतं. संस्कार, शिक्षण, सहवास, अनुभव, क्षमता, इच्छा इत्यादी गोष्टी एखादी गोष्ट चांगली आहे की वाईट, हे ठरवताना परिणाम करतात.

५.संगीत कला ही इतर कलांच्या मानानं शुद्ध कला मानली जाते. विश्वातल्या कोणत्याही गोष्टीचं संगीत प्रतिनिधित्व करीत नाही. संगीताची स्वत:ची भाषा आहे आणि ही भाषा फक्त संगीताचाच अर्थ सांगते.आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी माणसानं जाणता-अजाणता संगीताचा उपयोग केला आणि अशा प्रकारे संगीताची अमूर्तता त्याच्यासाठी विशिष्ट तऱ्हेने मूर्त झाली. भारतीय संगीतात संगीताच्या अमूर्तपणाचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे राग-संकल्पना. जिथे संगीताचं अस्तित्व स्वत: संगीत हेच आहे. त्यामुळे रागाचा अमूर्तपणा मूर्त रूपात अनुभवणं कलाकार आणि श्रोता दोघांनाही कठीण होतं. रागाला मूर्त करण्यासाठी एखाद्या परिचयातल्या गोष्टीचं साहाय्य असेल तर कलाकार आणि श्रोता दोघांनाही त्याची मदत होते. शास्त्राचं आणि प्रस्तुतीकरणाचं उत्तम ज्ञान असलं तरीही अमूर्त रागाला मूर्त करण्यासाठी कलाकार बाहेरची एखादी मदत मिळते का, याचा शोध घेतो. रागामध्ये जे अमूर्त आहे, त्याला मूर्त करण्याचा प्रयत्न म्हणजे राग-रस, राग-समय या संकल्पना आहेत. देवदेवता, वेगवेगळे ऋतू, दिवस-रात्रीचे प्रहर इत्यादी गोष्टींचा रागाशी संबंध जोडून मानवानं राग-रस, राग-भाव यांच्याशी नातं जोडण्याचा प्रयत्न केला. यामुळे विशिष्ट समय किंवा रस यांच्या साहाय्यानं त्याला रागाची निर्मिती करताना सोपं झालं.

६.राग-समय संकल्पनांमध्ये कलाकारानं निसर्गाची मदत घेतली आहे. एकेकाळी मानव निसर्गाच्या खूप जवळ होता. कदाचित यामुळे राग आणि विशिष्ट समय यांचा संबंध जोडला गेला असावा. पण आज मानव निसर्गापासून खूप दूर.. चार भिंतींच्या आत कृत्रिम वातावरणात राहतो आहे. त्याची जीवनपद्धती, त्याच्या सवयी यामध्येही खूप बदल झाला आहे. अशा परिस्थितीत राग आणि समय यांचा संबंध कसा जोडायचा? जेव्हा संगीताबरोबर एखादं दृश्य, एखादा अनुभव किंवा अर्थवाही शब्दांची जोड असते तेव्हा संगीताची अमूर्तता मूर्तामध्ये बदलते. एकसारख्या रागांना ओळखण्यासाठी रागाचं चलन माहिती असायला हवं; राग-समय नाही. राग भूप आणि देसकार यांचं चलन माहिती नसेल तर नुसता समय काय करणार?

७.संगीताचा आनंद घेण्यासाठी आज मुख्यत: आवाजाचा नादगुण, भावाची अभिव्यक्ती करण्याची क्षमता, संगीत सामग्रीचा योग्य तऱ्हेने वापर, लयतत्त्वाचा परिणामकारक उपयोग इत्यादी गोष्टींची मदत होते. अर्थवाही शब्द किंवा एखादं दृश्य यांचा योग्य, प्रभावी उपयोग केला तर विशिष्ट भावाची, रसाची निर्मिती करण्यासाठी निश्चितच मदत होते. तसं तर कोणत्याही रागामध्ये आलाप, तान, सरगम किंवा बोल वाक्य यांचा उपयोग करून एकाच भावाच्या अनेक छटा निर्माण होतात. विशेषत: लय घटक मानसिक स्थिती बदलण्यासाठी खूप मदत करतो.

८.भारतीय संगीतात बऱ्याच दंतकथा आहेत. जसं राग मल्हार गायला तर पाऊस पडतो, राग दीपक गायल्यानं दिवे लागतात, वगैरे. ज्यांनी संगीताकडे केवळ साधना म्हणून पाहिलंय त्यांच्या बाबतीत कदाचित हे शक्य झालं असेल. परंतु ज्यांनी साधनेबरोबर मनोरंजनाचाही उद्देश ठेवलाय, त्यांच्याकडून ही अपेक्षा करता येत नाही. रागाबरोबर एखादा अनुभव, दृश्य, शब्द जोडून कलाकार त्यापासून प्रेरणा घेतो आणि श्रोत्यालाही आनंद मिळतो.

९.राग-रस, राग-समय यासंदर्भात काही प्रश्न उपस्थित होतात :रागाला विशिष्ट रस आहे असं मानलं तर एकाच रागातल्या बंदिशींचे विषय, शब्द एकमेकांच्या विरुद्ध असतात. असं म्हणतात की, राग भैरवी ऐकल्यानंतर करुण रसाची अनुभूती येते. परंतु भैरवीतल्या रचना वेगवेगळ्या भाव घेऊन येतात, तरीही श्रोत्यांना आनंद मिळतो. शिवाय राग भैरवी कोणत्याही वेळी गाता येतो. त्याला वेळेचं बंधन नाही, त्याचं कारण माहिती नाही.

१०.तसं पाहिलं तर कोणताही राग कोणत्याही वेळी जेव्हा द्रुत लयीत प्रवेश करतो तेव्हा एक चैतन्यमय वातावरणाची निर्मिती होते.गेल्या काही वर्षांत काही रागांचं स्वरूप बदललं आहे, मात्र त्यांचं जुनं नाव तसंच आहे. काही जुने राग प्रचारात नव्हते, ते नवीन नाव घेऊन पुन्हा समोर आले आहेत.

११.जेव्हा वेगवेगळे कलाकार तोच राग प्रस्तुत करतात, किंवा एकच कलाकार तोच राग वेगवेगळ्या प्रसंगी प्रस्तुत करतो, तेव्हा कलाकार, श्रोते या सर्वाना एकाच रसाचा अनुभव येतो का?

या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर लक्षात येतं की रागाचं व्यक्तित्व आणि राग-भाव हा त्याच्या सामग्रीवर आणि त्या सामग्रीच्या प्रस्तुतीकरणावर अवलंबून आहे. रागाची वैशिष्टय़पूर्ण स्वरवाक्यं आणि त्यांचं चलन रागाची ओळख करून देतात. आणि त्यावेळी जो सौंदर्यभाव तयार होतो, तो कलाकार आणि श्रोत्यांच्या त्यावेळच्या मन:स्थितीवर परिणाम करून रस किंवा भाव निर्माण करतो.

१२.परंपरा आणि पारंपरिक शिक्षण पद्धतीमुळे राग-रस, राग-समय संकल्पनांचं सक्तीनं पालन करायचं म्हटलं तर आमचंच नुकसान होणार आहे, संगीताचं नुकसान होणार आहे. अनेक शतकं चालत आलेल्या या संकल्पना आमच्या मनात खोलवर रुजल्या आहेत. काळानुसार या संकल्पनांनी आपले संदर्भ सोडून दिले आहेत. तरीसुद्धा डोळे बंद करून त्यांचं पालन होताना दिसतं. या सिद्धांतांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहणं जरुरीचं आहे आणि त्याप्रमाणे आपले विचारही बदलायला हवेत.परंपरा हीच नवीन वाट दाखवत असते. मात्र विकासाच्या मार्गात ती अडचण उत्पन्न करीत असेल तर बदलत्या काळात तिला पुन्हा नवीन जीवनसत्त्व देऊन अधिक कार्यक्षम करावी लागेल. अशा परिस्थितीत परंपरा तुटत नाही, तर अधिक सशक्त, चैतन्यमय होते.

एक गोष्ट महत्त्वाची आहे की, कोणतीही वेळ असो- प्रस्तुतीकरण उत्तमच व्हायला पाहिजे. रागरूप आपल्या पूर्ण सौंदर्यानिशी समोर यायला पाहिजे. कलाकार आणि श्रोते दोघांनाही आनंदानुभूती मिळाली पाहिजे.

Recent Posts

See All
"Manjit's Manjinopathy - "थप्पा"

"Manjit's Manjinopathy - "थप्पा" मनजीत गटावर सक्रीय झाल्यापासून गटावरील सगळेच "संगीतप्रेमी" एकदम जागरूक झाले आहेत.उदयच्या रोजच्या अप्रतिम...

 
 
 
"Manjit's Manjinopathy - महाराष्ट्र संगीत"

"Manjit's Manjinopathy - महाराष्ट्र संगीत" ©दिलीप वाणी,पुणे मनजीत गटावर सक्रीय झाल्यापासून गटावरील सगळेच "संगीतप्रेमी" एकदम जागरूक झाले...

 
 
 
"तसव्वुर-ए-जानाँ"

"तसव्वुर-ए-जानाँ" ©दिलीप वाणी,पुणे उदय,रोहिदास व इकबाल यांनी मिर्जा गालिब यांच्या "बैठे रहें तसव्वुर-ए-जानाँ किये हुए" या शेरची आठवण करून...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page