"माझे दलितायन - भाग १"
- dileepbw
- Sep 22, 2022
- 3 min read
"माझे दलितायन - भाग १"
गणेशस्थापना या आनंदाच्या सणाला काल
"अस्पृश्यता" या हिंदू समाजाला गालबोट असलेल्या विषयावर संवेदनशील चर्चेला तोंड फुटले व त्याचे पडसाद गटावर आज देखील उठत आहेत.असे अनेकांना "वेड लावणारे" विषय चर्चेला आले की गटावर नाहक "कटूता" निर्माण होते असा पूर्वीचा अनुभव असल्याने यावर माझे व्यक्तिगत अनुभव कथन करणे मला फार अवघड वाटत असे. पण कालच्या व आजच्या गटावरील चर्चेने माझे हे "अवघडलेपण" किंचित दूर झाले असून मला "माझे दलितायन" ही लेखमाला लिहायला प्रवृत्त केले आहे.त्याचे पहिले पुष्प आज गटाला अर्पण करतो.
माझ्यावर टीका करणारेच मला सर्व प्रकारच्या अभ्यासाला प्रवृत्त करत असल्याने सर्व प्रथम या टीकाकारांना वंदन करतो व कालचा आढावा घेऊन मगच "दलितायन" लिहायला सुरूवात करतो. आरतीच्या परवाच्या टीकेने जसे मला "भारतीय संस्कृतीमधील विदुषीं" चा अभ्यास घ्यायला भाग पडले तसेच आता मला "अस्पृश्यता" या विषयाचा सखोल अभ्यास करून "स्वानुभव" सांगणे भाग पाडले आहे.सांगतो क्रमश: !
जगी हा खास वेड्यांचा पसारा मांडला सारा !कुणाला वेड कनकाचे,कुणाला कामिनी भासे ! मला मात्र वेड "अभ्यासा" चे ! त्यामुळे पक्याने सांगीतल्याप्रमाणे मी "वेडा" आहे हे आधी मान्य करतो. आपल्या गृपवर सुध्दा अधूनमधून "वेडाचे झटके" येणारे काही सभासद आहेतच ! त्यांना
"नजरअंदाज" करण्यासाठी सर्वांच्या सहमतीने वेगळा "उपगट" देखील स्थापन करून दिला.ज्यांना राजकारणातच रस आहे ते तेथे आनंदाने नांदत आहेत.पण काहींना तेथेही जायचे नाही व मुख्य गटातच वारंवार "गढूळता" निर्माण करायची आहे त्यांना अधिक काय सांगायचे ? त्यांच्या वक्तव्यांवर काहीच प्रतिक्रिया न देणे हे बंधन सगळ्यांनीच पाळलं तरच हा गट एकसंधपणे दीर्घकाळ कार्यरत राहील.
जालौर,राजस्थान येथील "दलित हत्या" प्रकरणावर काशिनाथने रागाच्या भरात ज्या "कडवट प्रतिक्रिया" गटावर व्यक्त केल्या त्यावर अत्यंत संयमित प्रतिक्रिया उदयने दिल्या आहेत व मी त्याच्याशी पूर्णपणे सहमत आहे.पण अन्य सभासदांच्या "आक्रस्ताळेपणा" वर मी अत्यंत नाराज आहे व पुढेही राहीन.असो.
तुलनेने जातीपातीचे निर्बंध पाळण्यात अत्यंत "पुरोगामी" असलेल्या महाराष्ट्राने मला दिलेले अनुभव मी "माझे दलितायन" या लेखमालेत क्रमश: सांगणार आहेच.तेच जर मी काशिनाथ सारखे आयुष्यभर उरापोटाशी बाळगून जगलो असतो तर माझे हाल देखील काशिनाथसारखेच झाले नसते का ? उदय सांगतो त्याप्रमाणे "ॲट्रॉसिटी" कायद्याचा दुरुपयोग करून ब्लॅकमेल झालेल्या माझ्या एका सहकार्याला देखील मलाच सावरावे लागले होते हे देखील मी कसे विसरू शकेन ? या विषयावर गावातील धनदांडगे राजकारणीच दलित गरीबांना हाताशी धरून आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या काटा काढण्यासाठी याचा "दुरूपयोग" करतात असे म्हटले आहे.याला जबाबदार कोण ? त्याला बळी पडणारे दलितच ना ?
दलित समाजातील तरुणांनी व कार्यकर्त्यांनी स्वतःच्या समाजातील कमकुवत घटकांना आधार देण्यासाठी शर्थीने प्रयत्न करायला हवेत या उदयच्या मताशी मी १००% सहमत आहे. काशिनाथने असा "बहूतजनांचा आधारू" व्हायचा प्रयत्न करायला हवा.मला "आक्रोश" या सिनेमातले "न्यायमूर्ती दुसाने" हे पात्र आठवले. काशिनाथने त्याच्यासारखे बनू नये हीच प्रभुचरणी प्रार्थना !
बाबासाहेब व अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त डीजे बँजो यांचा धुमधडाका चालू असतो. मद्य प्राशन करून हिडीस नाच गाणी चालू असतात.विशेष म्हणजे त्यात बाया-बापड्या देखील सहभागी असतात.अन्य संघटनांचे शिस्तबध्द दसरा संचलन अनुभवलेल्या व्यक्तीला हा प्रकार पहायला अत्यंत "किळसवाणा" वाटतो. त्याचे काही तरी "दुबळे समर्थन" करण्यापेक्षा तो थांबविण्याचा काशिनाथने प्रयत्न करायला हवा.
कोणत्याही प्रकारचे "प्रबोधन" अशा कार्यक्रमांमधे पाहायला मिळत नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. हे मी मागे देखील काशिनाथला समजावून सांगीतले होते. त्या ऐवजी दलित साहित्याची विक्री केंद्रे, वैचारिक परिवर्तनाची व्याख्याने,चर्चासत्रे असे उपक्रम राबिवणे काशिनाथला सहज शक्य आहे.यासाठी त्याचा "व्यासंग" त्याला नक्कीच उपयोगी पडेल.
किशोरने देखील "वारकारी संप्रदाया" चा आवर्जून उल्लेख करून "जातीभेद" कमी करण्यासाठी त्याचा मोठा सहभाग आहे हे नमूद केले आहे.आज काल जो काही धार्मिक किंवा जातीय भेदभाव आहेत ते "राजकारणा" मुळेच ! "जातीनिहाय जनगणना" सर्वच राजकीय पक्षांना हवी आहे. का ? किशा म्हणतो तसे निवडुन येण्यासाठी "जातीचा आधार" हा सोपा मार्ग आहे.त्यामुळे निवडून येण्यासाठी खरे तर आवश्यक असलेले "राजकीय कर्तृत्व" असण्याची आवश्यकता रहात नाही.तसेच पश्चात कुठलीही "नैतिक जबाबदारी" देखील घ्यावी लागत नाही.ज्यांच्याकडे स्वत:चे "कर्तृत्वाचे खणखणीत नाणे" असेल त्यांनी "धर्म व जातीचा पांगुळगाडा" वापरताच कामा नये.असे माझे स्पष्ट मत आहे.
दोन दिवसांच्या या संवेदनशील चर्चेला काशिनाथने सुरूवात करून दिलेली असली तरी त्यात सुरेश भोईटे,प्रकाश फडणीस,उत्तम मेढे,जया पाटील, इकबाल नागावकर,दीपक अंधारे इ.वर्गमित्र देखील सहभागी झाले आहेत.त्या सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन ! दीपकने म्हटले आहे की मागील काही दशकांत प्रत्येक समाजाची काहीनाकाही आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक उन्नती झालेली आहे.अशा प्रगत झालेल्या समाज बांधवांनीच हे "सामाजिक रूण" चुकवायला नको का ? का स्वत:च्या "तुंबड्या" भरण्यातच धन्यता मानायची ? बाबासाहेबांनी देखील असाच विचार केला असता तर ?
आगरकर,भांडारकर,गोखले,रानडे,सावरकर टिळक यांना जवळजवळ सर्वांनीच बहिष्कृत केलेले आहे, या उदयच्या विचाराशी मात्र मी बिलकुल सहमत नाही.त्यांचे स्मरण आहेच.महात्मा ज्योतिराव फुले,छत्रपती शाहू महाराज, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या महाराष्ट्रातील सामाजिक क्रांतीचे दीपस्तंभच आहेत व त्यांना ओलांडून महाराष्ट्र प्रगती करूच शकत नाही.ही सर्व समाज सुधारक मंडळी त्यांच्या कार्यामुळे जाती,धर्म,पंथ, संघटना,संस्था,राजकीय पक्ष याच्या पलीकडे गेलेली आहेत.
"अस्पृश्यतेचा कलंक" मिटवण्यासाठी राजस्थानातील मेघवाल समाज धर्मांतराचा विचार खूप गांभीर्याने करीत आहे व याची दखल मात्र "संस्कृती रक्षकां" नी घ्यायलाच हवी,अशी अपेक्षा काशिनाथने व्यक्त केली आहे.अस्पृश्य समाजातील लोकांना "वेडाचे झटके" येतात असे म्हणून हा प्रश्न सुटणार नाही असे मत त्याने अत्यंत उद्वेगाने व्यक्त केले आहे.अपेक्षे प्रमाणेच नेहेमीच आक्रस्ताळेपणे बोलणार्या सभासदाने तीव्र व अव्यवहार्य प्रतिक्रिया दिली आहे."सशस्र बंड" या प्रतिक्रियेचा मात्र सर्वांनीच तीव्र शब्दात निषेध करायला हवा.




Comments