"तलत महमूद यांचा २५ वा स्मृती दिन"
- dileepbw
- Sep 4, 2023
- 2 min read
"तलत महमूद यांचा २५ वा स्मृती दिन"
©दिलीप वाणी,पुणे
बंड्याने ९ मे रोजी झालेल्या "तलत महमूद" या मधाळ आवाजाच्या गायकाच्या २५ वा स्मृती दिनाच्या निमित्ताने सादर केलेल्या गीतांबद्दल त्याला मन:पूर्वक धन्यवाद ! या निमित्ताने "जलते हैं जिसके लिये,तेरी आंखोंके दिये" या गीतकार मजरूह सुलतानपुरी यांच्या १९५९ साली गाजलेल्या "सुजाता" या चित्रपटातील तलत महमूद यांनी गायलेल्याा अजरामर गीताची जन्मकथा सांगतो.ऐका.
कधी कधी गाण्याला योग्य गायक ठरवताना संगीत दिग्दर्शकाचा अंदाजही चुकीचा ठरू शकतो. अशाच एका मोठ्या संगीत दिग्दर्शकाच्या एका गाजलेल्या गाण्याच्या चुकलेल्या अंदाजाची ही कथा आहे."अस्पृश्यते" च्या प्रश्नावरच्या या गंभीर चित्रपट निर्मितीस नूतन,सुनील दत्त,शशिकला; मजरूह सुलतानपुरी,एस.डी.बर्मन अशी सर्व तालेवार मंडळी कार्यरत झाली.
या चित्रपटाच्या गाण्यांची तयारी सुरु झाली.एक गंभीर परंतु विरहिणीसारखं गाणं घालण्याचा प्रसंग आला.दिग्दर्शक आणि लेखकानं प्रसंग गीतकार आणि संगीत दिग्दर्शक यांना समजावून सांगितला.
दादांनी लगेच त्यांच्या पोतडीतून ४-५ चाली काढल्या आणि त्या पेटीच्या सहाय्याने वाजवून दाखवल्या. त्यांतील एक चाल पसंत पडल्यावर त्या चालीवर मजरूह यांना गीत लिहायला सांगितलं.
त्यांनी ही ते काम कमीत कमी वेळात पार पाडलं.
ही चाल तयार करताना दादांच्या मनात ही चाल महमद रफीनं गावी,असं होतं.कारण तलतच्या आवाजात जास्त "कंप" येत असल्याचंही जाणवू लागलं होतं.मात्र,ही चाल त्यांच्या तोंडून ऐकताच त्यांचे सहाय्यक आणि स्वतंत्रपणे संगीत दिग्दर्शन करू लागलेले जयदेव आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले जवळ जवळ एकाच सुरात म्हणाले की, चाल तलतच्या गळ्यालाच योग्य आहे ! पण सचिनदा हे मानायला तयार होईनात.ते आपला रफीच्या नावाचाच ठेका धरून बसले.मग शेवटी निर्माते दिग्दर्शक बिमल रॉय यांना विचारले,तर त्यांनीही तलतचंच नाव सुचवलं. इतकंच नव्हे तर हे गाणं तलतच गाईल असा आदेशही दिला !
मग मात्र, दादांचा नाईलाज झाला.बिमलदांच्या शब्दाबाहेर जाण्याची दादांची इच्छा नव्हती; आणि त्यांनी तलतला ते गाणं गाण्यासाठी पाचारण केलं. पण मनातून ते नाराजच होते.नाराज दादांनी तलतच्या नेहेमीसारख्या तालमी घेतल्या नाहीत. इतकंच काय; तलतला एखादी जागा, हरकत त्यांच्या मनासारखी जमली नाही तर त्यांची नाराजी त्यांच्या चेहेऱ्यावर स्पष्टपणे दिसत असे ! शिवाय, दादांनी तलतला ‘ माझं गाणं बिघडवू नकोस ‘ असं काही वेळा बजावूनही सांगितलं ! अखेरीस एकदाचं या गाण्याचं ध्वनिमुद्रण पार पडलं.
चित्रपट प्रदर्शित झाला.सुदैवानं चित्रपटाच्या सर्वच गोष्टी जमून आल्या होत्या.यातील चालीही लोकांना आवडल्या; आणि त्या झपाटयानं लोकप्रिय झाल्या.त्या काळात तलत हा चित्रपटसृष्टीतून फेकला गेल्यासारखा झाला होता. त्याला अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील. इतकीच गाणी गायला मिळत असतं. त्यामुळे त्याला चांगली चाल असलेलं गाणं मिळालं की, ते लवकर लोकप्रिय होत असे.
"जलते हैं जिसके लिये" ची हळुवार चाल तलतनं तितक्याच मुलायमपणे गायली होती.शिवाय, या गाण्याचं चित्रिकरण हे फोनवर गायलेलं गाणं; अशा नाविन्यपूर्ण पद्धतीनं केलं होतं. याचाही उपयोग या गाण्याच्या लोकप्रियतेसाठी झाला. हे गाणं २३ डिसेंबर १९५९ रोजी सादर झालेल्या "बिनाका गीतमाला" च्या वार्षिक कार्यक्रमात १७ व्या क्रमांकावर वाजवलं गेलं.तलत महमूद यांच्या परदेशांतल्या कार्यक्रमांत याच गाण्याची फर्माईश जास्त वेळा होत असे.हे गाणं त्या चित्रपटाचा "परमोत्कट उत्कट बिंदू" आहे.भारतीय चित्रपटांमधील ते "सर्वाधिक रोमांटीक गाणं" आहे.
तलतच्या फिल्मी आणि गैर फिल्मी गाण्यांत या गाण्याचा क्रमांक फार वरती लागतो !
"माझं गाणं कृपया बिघडवू नकोस" असं दादांनी तलतला सांगितल्यावर,"दादा,माझ्या परीनं मी हे गाणं उत्तम गायचा प्रयत्न करीन" असं तलतनं दादांना सांगितल्याचंही एका ठिकाणी प्रसिद्ध झालेलं आहे. मात्र,"हे माझं गाणं बिघडवू नकोस" असं दादांनी ज्या तऱ्हेनं तलतला सांगितलं, त्यावरून त्यांना ते गाणं त्याच्या कडून गाऊन घ्यायचं नव्हतं, हे त्याच्या लक्षात आलं.त्यांचं ते सांगणं त्याला त्याचा "अधिक्षेप" वाटलं ! "दादांनी माझ्याशी अशा भाषेत बोलायला नको होतं" असं तलतनं त्याच्या एका निकटवर्तीय माणसाला सांगितलं.शिवाय,"नौशादजीही असं माझाशी कधी वागले-बोलले नव्हते" असं तलत त्या निकटवर्तीय माणसाला म्हणाला होता.




Comments