देवांचा अभिमान - भास्कराचार्य
- dileepbw
- Sep 11, 2022
- 2 min read
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजातील "देव" कुलबांधवांच्या कुलग्रामातील असामान्य व्यक्तीमत्व - थोर गणितज्ञ "भास्कराचार्य"
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या,"सका/शक/Scythian" पूर्वजांच्या,महाभारत काळापासून माहित असलेल्या,"ऋषिका" जमातीच्या, समस्त "देव" कुलाच्या लोकांना अभिमान वाटावा अशा आपल्या कुलग्रामामध्ये जन्माला आलेल्या अतिशय थोर व्यक्तिमत्वाचा सर्व "देव" मंडळीना परिचय असला पाहिजे.
ती व्यक्ती म्हणजे थोर गणितज्ञ भास्कराचार्य !
भास्कराचार्यांचा जन्म सह्याद्रीच्या कुशीत,"विज्जद्वीद(प्राचीन विज्जलविड - सध्याचे चाळीसगाव जवळील "पाटण")" या ग्रामात झाला असे खालील ऐतिहासिक पुरावे सांगतात :-
१. कै.भाऊ दाजी तेलंग या संशोधकाने अभ्यास करून रॉयल एशियाटिक सोसायटीच्या नियतकालिकेत प्रसिद्ध केलेल्या संशोधनानुसार भास्कराचार्यांचा जन्म सध्याचे चाळीसगाव जवळील "पाटण" येथे झाला. चाळीसगाव जवळील पाटणा देवीच्या मंदिरात भास्कराचार्यांचा नातू चांगदेव याने घडविलेला शिलालेख, तसेच चाळीसगाव जवळील "बहाळ" या गावामधील मंदिरात भास्कराचार्यांचा दुसरा नातू अनंतदेव याने घडविलेला शिलालेख व "नाशिक" चे श्री.घोलप कुटुंबीयांकडे असलेला ताम्रपट यांचा अभ्यास करून कै.भाऊ दाजी तेलंग या निर्णयाप्रत आलेले आहेत.
२. मुनीश्वर रचित "मरीचिका" हा भास्कराचार्यांनी लिहिलेल्या लीलावती या ग्रंथावरील टीकाग्रंथ तसेच प्रा.ना.ह.फडके लिखित "लीलावती पुनर्दर्शन" या ग्रंथात, तसेच भास्कराचार्यांनी स्वतः लिहिलेल्या "सिद्धांत शिरोमणी" या ग्रंथात त्यांचा जन्म महेश्वर नावाच्या शांडिल्य गोत्री ब्राह्मणाच्यापोटी झाल्याचे लिहून ठेवले आहे.
भास्कराचार्यांनी वेदशास्त्रसंपन्न अशा पंडितांच्या सहवासात ज्ञानार्जन केले. प्राचीन भारतीय खगोलशास्त्र, दशमान पद्धत, संख्यांचे नामकरण (एकम,दहम व पुढे क्रमाने १० चा वर्ग - शतम,सहस्त्र,अयुत,लक्ष,प्रयुत,कोटी,अर्बुद,अब्ज,खर्व,निखर्व,महपद्म,शंकू,जलधि,अंत्य, मध्य व पारद), कुटक (Pulveriser - Indeterminate equation of first order), खगोलशास्त्रीय अंकगणित, काव्यरूप बीजगणित(लीलावती ) ,चक्रावळ (Indeterminate equation of second order/Pell’s equation /Brahmagupta-Bhaskaracharya equation),वर्ग,घन, वर्गमूळ ,घनमूळ काढण्याच्या सोप्या पद्धती, पायथागोरसचा सिद्धांत , खंडमेरु ( Pascal Triangle),अंकपाश (permutations and combinations),value of PI,अनंत - खहर राशी (concept of infinity), अशा एक ना अनेक विषयांवर त्यांनी जगन्मान्य लिखाण केले आहे.
भास्कराचार्यांच्या "सिद्धांत शिरोमणी " या ग्रंथाचे एकूण १४५० चरण असून वयाच्या केवळ ३६ व्या वर्षी त्यांनी हे महत्कार्य केले.लीलावती(२७८ चरण) ,बीजगणित(२१३ चरण ) ,गणिताध्याय (४५१ चरण) व गोलाध्याय(५०१ चरण) अशा चार भागांमध्ये या ग्रंथाची रचना केलेली आहे.
त्यांच्या या सर्वसमावेशक संशोधनाबद्दल दैवज्ञ गणेश या पंडिताने "गणकचक्रचूडामणी " म्हणून केलेले त्यांचे वर्णन अतिशय सार्थ वाटते.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६




Comments