top of page

धुळे - महाभारत काळातील रसिका

  • dileepbw
  • Sep 12, 2022
  • 4 min read

लाड सका(शाखीय) वाणी समाजाची सांस्कृतिक राजधानी "धुळे" महाभारत काळात "रसिका" या नावाने ओळखली जात असे.

लाड सका(शाखीय) वाणी समाजाचे मध्य आशियातील "सका/शक/Scythian" वंशाचे पूर्वज महाभारत काळात "रूषीक" या नावाने ओळखले जात असत.

मध्या आशियातून भारतात स्थलांतरित झालेल्या लाड सका (शाखीय) वाणी समाजाच्या मध्य आशियातील "सका/शक/Scythian" वंशाच्या "रूषीक" या पूर्वजांच्या नावावरून "धुळे" शहर प्राचिन काळी "रूषीका" या नावाने ओळखले जात असे. त्याचा अपभ्रंश म्हणजे "रसिका" !

या "धुळे" शहराचा ब्रिटीश कालिन इतिहास खालील प्रमाणे :-

"धुळे" शहराची आखीव-रेखीव आखणी ही १८१८ मध्ये कॅप्टन ब्रिग्ज यांनी केली आहे. १८१८ मध्ये ब्रिटीशांनी मराठ्यांवर पूर्ण विजय संपादन केल्यानंतर कॅप्टन ब्रिग्ज यांची खान्देशचे अंमलदार म्हणून नियुक्ती केली होती. त्यावेळी ब्रिटीशांची लष्करी वसाहत मालेगावला होती. कॅप्टन ब्रिग्जला उत्तरेहून विंध्य, सातपुडा, नर्मदा, तापी ओलांडल्यावर आणि पश्‍चिमेस सुरत व पूर्वेस धरणगावला असणार्‍या इंग्रजी व्यापार वखारींच्या दृष्टीकोणातून धुळे हे ठिकाण मध्यवर्ती वाटले. लष्करीदृष्ट्या धुळे या खेड्याचे कॅप्टन ब्रिग्जला अधिक महत्व वाटले होते. त्यावेळी धुळे (जुने धुळे) हे अवघ्या दीडशे घर-झापेड्यांचे लहानसे खेडे होते. धुळ्यासोबतच नदीच्या पलिकडे देवपूर व पश्‍चिमेस मोगलाई अशी दोन गावठाणे होती. कॅप्टन ब्रिग्जने संयुक्त खान्देशची राजधानी (धुळे-जळगाव-नंदुरबार-बागलाण एवढा खान्देश- यात बर्‍हाणपूरपर्यंत खान्देश मानला जात असे) म्हणूनच धुळे वसवायचे ठरविले. लष्करी छावणीचीही आखणी केली. त्यामुळेच जुने कलेक्टर ऑफिसपासून थेट मोगलाई-कुमारनगर व इकडे धुळे कोर्टापर्यंतच्या भुभागाची अत्यंत जुनी कागदपत्रे पाहिली तर त्यावर ‘छावणी’ असाच उल्लेख सापडतो. आज धुळे न्यायालयाची जी इमारत आहे ती ब्रिटीशांनी मुळात लष्करी सिव्हिल हॉस्पिटल म्हणून बांधली होती. याशिवाय टेक्निकल स्कूल, दगडी शाळा कारागृह अशा किती तरी मोठमोठ्या, देखण्या इमारती ब्रिटीशांनी बांधल्या आहेत. ब्रिटीश अंमलदार कॅप्टन ब्रिग्ज याने धुळ्यास लष्करी छावणीचे रूप देण्यासाठी कामास सुरूवात केली, तेव्हा त्यांने सर्वात पहिली इमारत धुळ्यात आज नव्या कलेक्टर ऑफिसमोर जी दस्तनोंदणीची रजिस्टारची कौलारू इमारत आहे, ती बांधली होती. तेथे स्वतःचे प्रथम ऑफिस थाटले होते. त्यानेच आजची अवाढव्य जमिनीवर असलेली जिल्हाधिकारी निवासस्थानाची-बंगल्याची इमारत बांधली होती. जिल्हाधिकारी यांचा बंगला इतक्या मोठ्या भुभागावर असणारे मोजक्या शहरापैकी धुळे एक आहे. ब्रिग्जच्याच काळातील जिल्हा पोलिस अधीक्षक, सिव्हिल सर्जन व अन्य बड्या अधिकार्‍यांच्या बंगल्यांच्या भव्य, एैसपैस वास्तू, भरपूर मोकळ्या जागेत ब्रिटीश काळातच बांधण्यात आल्या आहेत. माननीय भारतरत्न कै. सर विश्‍वेश्‍वरय्यांच्या काळातल्या या इमारती नाहीत. कॅप्टन ब्रिग्जने दीडशे घरांचे धुळे छावणीत रूपांतरीत करण्याचा निर्णय घेतला तेव्हा धुळे या खेड्याचा कारभार लळींग या सजातून चालत होता. धुळ्यापेक्षा लळींग आणि सोनगीर हे मोठे होते. धुळे, देवपूर, मोगलाईच्या लोकांना जवळची मोठी बाजारपेठ सोनगीर होती. कॅप्टन ब्रिग्जने आताच्या धुळे शहरातील नगरपट्टी ते मनोहर थिएटर या भागात नागरीवस्ती वसावयाचे ठरविले. त्यासाठी बांबू व दोरी लावून जुना आग्रारोडला समांतर दोन्ही बाजूस सरळ रेषेत उभ्या- आडव्या गल्यांची आखणी केली. त्याच आजच्या गल्ली नं. एक, दोन, चार, सात आणि या गल्ल्यांना आडव्या छेदून जाणार्‍या गल्ल्यांमुळे निर्माण झालेले चौक. त्यांना आपण खुंट असे म्हणतो. या ठिकाणी नागरिकांनी, व्यापार्‍यांनी, बारा बलुतेदारांनी येवून रहावे म्हणून कॅप्टन ब्रिग्ज यांनी बर्‍हाणपूरपासून सुरतपर्यंत विविध मोठ्या गावातील लोकांना व्यावसायिकांना विविध सवलती देवू केल्या, बाहेरून आणून या लोकांना धुळ्यात वसविले. असे म्हणतात की उभ्या आडव्या सरळ रेषेत असणार्‍या गल्ल्या रस्त्यांमुळे धुळे शहर हे चंदिगड पाठोपाठचे रेखीव शहर आहे. हे नियोजन कॅप्टन ब्रिग्ज यांचे आहे. ब्रिग्ज यांनी छावणी म्हणून नियोजन करून आखीव-रेखीव धुळे शहर तर वसविले; परंतू नंतर ब्रिटीशांचा देशावर सर्वत्र अंमल झाल्याने धुळे येथे लष्करी छावणी करण्याचा त्यांचा उद्देश बारगळला. निर्णय रद्द झाला. मात्र त्या निमित्ताने आखीव रेखीव व विस्तृत, मोठ्या मोकळ्या जागांवरील सरकारी इमारतींच्या अशा धुळे शहराची मुहूर्तमेढ रोवली गेली होती. ती कायम राहिली. मग प्रश्‍न निर्माण होतो हा, की सर विश्‍वेश्‍वरय्या यांचा धुळ्याशी संबंध काय? भारतरत्न सर विश्‍वेश्‍वरय्या यांनी धुळे शहराची पिण्याच्या पाण्याची योजना तयार केली आहे. एक युनिट विजेचा खर्च न करता केवळ ग्रॅव्हिटीने डेडरगाव तलावाचे पाणी धुळे शहरात मालेगावरोडवरील दगडी टाकीपर्यंत आणण्याची एकमेव अशी सायफन व ग्रॅव्हिटीची पाणी पुरवठा योजना त्यांनी बनविली आहे. ही आगळी-वेगळी अशी योजना बनविण्याचे श्रेय सर विश्‍वेश्‍वरय्या यांचे आहे. सर विश्‍वेश्‍वरय्या ऑक्टोबर 1885 मध्ये धुळ्यास आले होते. त्यांचे धुळ्यात १६ महिने वास्तव्य होते. त्यावेळी त्यांचे पद होते सहाय्यक अभियंता वर्ग एक. त्यावेळी कार्यकारी अभियंत्यांचाही काही काळ कार्यभार त्यांच्याकडे होता. त्यांनी साक्री तालुक्यात दातर्तीला पांझरा नदीच्या खालून ३०० फूट लांबीचा सायफन पद्धतीचा कालवा १३० वर्षापूर्वी बांधला आहे. तो आजही कार्यरत आहे. संपूर्ण जगात अभ्यास होणारी व नावाजलेली पांझरेवरची फड सिंचन पद्धत ही डॉ. सर विश्‍वेश्‍वरय्या यांचीच देणगी. यात कमांड एरियातील सर्व शेतकर्‍यांना समान पाणी मिळण्याची अत्यंत व्यवहार्य पद्धत त्यांनी त्याकाळी आखून दिली होती. हीच पद्धत त्यांची पूण्यास नियुक्ती झाल्यावर तेथे त्यांनी सुरू केली होती. नंतर म्हैसूर संस्थानचे दिवाण, तेथे प्रचंड मोठ्या धरणाची निर्मिती, पं. नेहरूंच्या आग्रहास्तव ९० व्या वर्षी गंगेवरचा पूल बांधण्याची कामगीरी, ५० वर्षानंतरचा हिंदुस्थान व अनेक पुस्तके त्यांनी लिहिली. धुळ्यात निवृत्त अभियंता हिरालालजी ओसवाल व सहकार्‍यांनी त्यांचे स्मृती निमित्त धुळ्यात जुन्या सिव्हील समोर बांधकाम खात्याच्या आवारात एक चांगले संग्रहालय निर्माण केले आहे. निश्‍चितच सर विश्‍वेश्‍वरय्या यांचे धुळ्यासाठी योगदान मोठे आहे. परंतू ते धुळ्यात येण्या अगोदर जुने धुळेसह ग.नं. १ ते ७ व नगरपट्टी ते आताचे मनोहर थिएटर एवढ्या भागात नागरी वसाहत आणि शासकीय मोठमोठ्या इमारतीचे धुळे शहर नावा रूपास आलेले होते. त्यावेळी धुळ्याची लोकसंख्याच ५० ते ६० हजार इतकी झालेली होती. धुळ्याच्या इतिहासाचा विपर्यास होवू नये, असेच कुणीही सुज्ञ धुळेकर मानेल. कै. सरविश्‍वेश्‍वरय्या यांच्या कामगिरीस सलाम. पण मुळ धुळे शहराची आखीव स्थापना १८१८ मध्ये आलेल्या कॅप्टन ब्रिग्ज यांनी केली आहे. हे निश्‍चित. त्यांनी धुळ्यात बनविलेली पहिली इमारत रजिस्ट्रार ऑफिसला आता काही वर्षापूर्वी आग लागली होती. तेव्हा तेथे देखील या स्थापनेच्या कोरीव मजकूराची शिला सापडली होती.

आपला कृपाभिलाषी,

प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी

व्यवस्थापक

फेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या - ८३१४)

Recent Posts

See All
कुलग्राम व कुलनाम

सर्वांच्या माहितीसाठी लाड सका(शाखीय) वाणी समाजातील धार्मिक कार्ये ज्यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी केली जातात त्या नाशिकच्या सर्व...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page