"भिडेवाडा - फुले दांपत्याचे राष्ट्रीय स्मारक"
- dileepbw
- Sep 6, 2022
- 2 min read
"भिडेवाडा - फुले दांपत्याचे राष्ट्रीय स्मारक"
काही दिवसांपूर्वी मी "बाहूलीचा हौद" नावाचा एक लेख लिहीलेला सर्वांनाच आठवत असेल.आज तसाच एक लेख "भिडेवाडा" या "फुले दांपत्याचे राष्ट्रीय स्मारक" होऊ घातलेल्या वास्तुवर लिहीतो आहे.कारण इकबालने पाठवलेल्या एका लेखात व काशीनाथने पुन:प्रसृत केलेल्या एका चित्रात "भिडेवाडा" या वास्तूचे "राष्ट्रीय स्मारक" व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली आहे.
माझ्या "बाहूलीचा हौद" या लेखात स्त्री शिक्षणासाठी आपले प्राण वेचणार्या डाॅ.घोले यांच्या नऊ वर्षाच्या बालिकेच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांनी स्वखर्चाने "सार्वजनिक पाणवठा" उभारला होता असे सांगीतले होते.तद्वत "फुले दांपत्याचे राष्ट्रीय स्मारक" उभारले जायचे असेल तर स्वत: फुले कुटुंबीय,त्यांचे गावकरी,त्यांचा समाज,त्यांनी ज्या ज्या गावात शाळा उभारल्या होत्या तेथील गावकरी यांनीच पुढाकार घ्यायला हवा.
स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणार्या महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभारण्यासाठी समस्त सुशिक्षीत स्त्रियांनी प्रयत्न करायला हवेत ही मला जरा मोठीच अपेक्षा वाटते. त्यासाठी गणपती समोर "अथर्वशीर्ष" गाणार्या अन्य समाजाच्या महिलांची वाट कशासाठी पहायची ? वाचा हा लेख पुन्हा एकदा ! मला तरी हे "मदतीचे आवाहन" या पेक्षा "भक्तीमार्गी व अभिजन लोकांचा दुस्वास" जास्त वाटला.असो.वाचा परत व पहा काय वाटते ते !
दरवर्षी साऱ्या महाराष्ट्रात गणपती बसवला जातो.
सकाळ संध्याकाळ गणपतीच्या आरतीला समुदाय जमतो.गणेश उत्सव गावा गावात साजरा होत असतो. तेव्हा मंडळ उभे करतात दृश्य देखावा.
देखावे अनेक असतात,भक्तगण पाहण्यास येतात.
त्यातून त्यांच्या कुवतीनुसार बोध घेतात.
पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपती बसवतात.
तेथेही हजारो भक्त हजेरी लावतात.
ह्या वर्षी दगडूशेठ हलवाईच्या गणपती पहाण्यासाठी.हजारो स्त्रिया आल्या होत्या दर्शनासाठी.कित्येक स्त्रियांनी गणपतीची पुजा केली.गणपती समोर "अथर्वशीर्ष" ही गायली.
दगडूशेठ हलवाई गणपतीच्या समोर भिडेवाडा .
त्या भिडेवाड्यात एकेकाळी भरत होती फुले दांपत्याची शाळा.पण त्या शाळेकडे एकाही सुशिक्षित महिलेचे पाय वळाले नाही.एकाही महिलेने आत्मियतेने त्या आद्य शाळेची चौकशी केली नाही.स्त्रियांना शिक्षणाची दारं खोलणारी ज्योतिबा नि माता सावित्रीची शाळा.कुणालाच वाटला नाही फुले दांपत्याच्या त्यागाचा कळवळा.स्त्री मुक्तीचे प्रतिक असणारा हा वाडा पडतो आहे.जणु आपल्या गतवैभवाची विदीर्ण अवस्था पाहून मुकअश्रु ढाळतो आहे.त्या क्रांतीकारी वाड्याचे संवर्धन व्हावे.स्री मुक्तीचे राष्ट्रीय स्मारक व्हायला हवे.पण त्या ऐतिहासिक वास्तूकडे सर्वांचे दुर्लक्ष होतंय.
स्त्रियां,समाज नि शासनाच्या लक्षात कधी येतंय ?
ज्या माता सावित्रीबाई नि ज्योतिबाने साऱ्या सुखाचा त्याग केला.समस्त स्त्रियां नि बहुजनांच्या उद्धारासाठी शिक्षणाचा पाया रचला.त्यांच्या अस्तित्वाने पावन झालेल्या वास्तूची किती ही शोकांतिका ? नि त्यांच्या कार्याबाबत किती ही कृतघ्नता ?
माता सावित्री आणि ज्योतिबाने देशाला विज्ञानवादी विचार दिला.पण त्या विचारांचा सर्वांना विसर पडला.खरंच सारा समाज सुसंस्कृत झालाय का हा प्रश्न पडतो आहे.आजही समाजाला प्रबोधनकारांची खरोखर गरज आहे.आथला समाज हा गेंड्याच्या कातडीचा झालाय.सारेच आयते मिळाल्याने तनमनाने सुस्तावून गेलाय.
आजच्या स्त्रियां नि बहुजन समाज भौतिक सुखात लोळतो आहे.नि त्यांच्या उपकार कर्त्याला विसरतो आहे.
कोठे गेलेत पुरोगामी विचारवंत ? नि ज्ञानाच्या गप्पा मारणारे ज्ञानवंत ? भिडेवाडा नि फुले दांपत्याच्या स्मृतींच्या अवेहलना.तेथे जाऊन एकदा निरीक्षण करा जरा.जरा आपली सर्वांची मान शरमेने खाली जाऊ द्या.आता तरी सर्वांनी सद्सद्विवेकाने भानावर या.सर्वांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करा.भिडेवाड्याचे सन्मानाने संवर्धन होण्यासाठी पाठपुरावा करा.फुले दांपत्याचे "राष्ट्रीय स्मारक" देशाची शान असेल.त्यामुळे का होईना साऱ्या "बहुजनां" ना तो अभिमान वाटेल.
Comments