top of page

महाराष्ट्रात स्थलांतर

  • dileepbw
  • Sep 12, 2022
  • 3 min read

लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या महाअधिवेशनच्या निमित्ताने प्रसृत करण्यात आलेली राजस्थान,गुजरात ते महाराष्ट्र या स्थलांतराची ध्वनीचित्रफीत पहाण्यात आली.त्यामुळे या स्थलांतराचा धांडोळा घेताना हाती लागलेली काही माहिती सर्वांच्या माहितीसाठी प्रसृत करीत आहे.

गुजरात प्रांतातील "सारा वसुली" ची "जमिनीदारी" ची पध्दत Mirăt-i-Áhmedi या मुस्लिम लष्करशहाने अधिक जाचक केली. त्यामुळे आम जनतेत रोष व त्यातून मोठा असंतोष निर्माण झाला. याचा परिणाम म्हणून लाड सका (शाखीय) वाणी समाज बांधवांसह अन्य अनेक समाज बांधव "जमिनदारी/वतनदारी" ऐवजी "रयतवारी" ही समाधानकारक कर वसुली व्यवस्था असलेल्या महाराष्ट्रात स्थलांतरीत झाले.

महाराष्ट्रात स्थलांतरीत झालेल्या या समाजांचा अभ्यास ब्रिटिशांनी १९३१ साली "महाराष्ट्राचे गॅझेटियर" या ग्रंथात प्रकाशित केला होता. तो खालील संकेतस्थळावर उपलब्ध आहे :-

महाराष्ट्रातील "वाणी" समाजाबद्दल लिहिताना ब्रिटिशांनी "लाडशाखी (सका/सक्का/शाखीय) वाणी" म्हणजे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर,एरंडोल,पाचोरा,चाळीसगाव,जळगाव,पिंपळनेर इ.शहरात रहाणारे "व्यापारी" असे लिहून ठेवले आहे.त्यांची नावे,भाषा, चालीरीती पहाता ते गुजरातमधून महाराष्ट्रात स्थलांतरीत झाल्याचे सहज लक्षात येते.एकूण सात गोत्रे व १०८ कुलात विभागलेला "लाडशाखी(सका/सक्का/शाखीय) वाणी" समाज मराठी,अहिराणी व गुजराती या भाषांपासून तयार झालेली "संमिश्र" भाषा बोलतो.ते "वीसा व दसा" अशा उपगटात विभागलेले असून त्यांचे धर्मगुरे "खेडवळ ब्राह्मण" या समाजाचे असतात.या समाजात "मांसाहार, मद्यपान,विधवा विवाह व घटस्फोट" वर्ज्य आहे.हा समाज वैष्णव

पंथीय असून "व्यंकटेश" हे त्यांचे आराध्य दैवत आहे.त्यांच्या देव्हार्‍यात अन्य देवतांसोबत "कुलस्वामिनी व खंडेरायाचा टाक" आवर्जून आढळतो."लाडशाखी (सका/सक्का/शाखीय)" वाणी" समाजाच्या जात पंचायतीच्या प्रमुखाला "शेठीया" असे म्हणतात.

या अभ्यासात महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या "वाणी" लोकांची संख्या १,०९,५१८ एवढी असल्याचे सांगीतले असून त्यात मराठी,गुजराती, मारवाडी व लिंगायत "वाणी" लोकांचा समावेश केलेला होता.या पैकी हिंदू वाणी "मेश्री" तर जैन वाणी "श्रावक" या नावाने ओळखले जात असत.१९११ साली झालेल्या जनगणनेत "वाणी" लोकांची लोकसंख्या १,६२,८९९ एवढी भरली होती.ती १९३१ साली झालेल्या जनगणनेत१,९४,९१८ एवढी भरली होती.

मराठी वाणी लोक कुदळे(कुडाळ,बांदे,रत्नागिरी),संगमेश्वरी (संगमेश्वर,सावंतवाडी),कुलूम(दख्खन), कुणबी(देश),पाटणे, बावकुळे(कर्नाटक)नेवे(खानदेश),काथर(खानदेश) व खरोटे (खानदेश), हुंबड,वाळूंज व लाडसका/लाडशाखी(जळगाव) या उपगटात विभागलेले होते.त्यांच्यात "रोटी-बेटी" व्यवहार होत नसत.

कुदळे वाणी स्वत:ला आर्य समजत व ब्राह्मणांप्रमाणे अनेक गोत्रात विभागलेले आहेत.पण ते "मौजी बंधन" तसेच "सगोत्री विवाह" करीत नाहीत.मात्र विवाह प्रसंगी "जानवे" धारण करतात.त्यांचे गुरूजी चित्पावन/कर्‍हाडे ब्राह्मण समाजाचे असतात.१८५० सालापर्यंत शुध्द शाकाहारी कुदळे वाणी व मराठा वाणी यांच्यात "रोटी व्यवहार" व क्वचित् प्रसंगी "बेटी व्यवहार" होत असे.विधवा विवाहाला सामाजिक मान्यता नव्हती.कुदळे वाणी लोकांसारख्याच प्रथा असलेल्या संगमेश्वरी वाणी लोकांच्या विवाहात "सप्तपदी" ही प्रथा मात्र नव्हती.पाटणे वाणी लोक सातारच्या पाटण तालुक्यात आढळून येतात.त्यांच्या प्रथा कुलूम वाणी लोकांसारख्याच आहेत.

कोकणी भाषा बोलणारे बावकुळे वाणी फक्त कारवार येथेच आढळतात.अंगदीचा महादेव व म्हरडोळीची म्हाळसा ही त्यांची कुलदैवते आहेत.प्रथा कुदळे वाणी लोकांसारख्या असल्या तरी बावकुळे वाणी लोक "मांसाहारी" आहेत हे विशेष ! मराठा समाजातील व्यापाराकडे वळालेले कुणबी लोक कुलूम/कुणबी वाणी म्हणून ओळखले जातात.

काथर वाणी लोक जळगाव,नशिराबाद,यावल येथे तर नेवे वाणी लोक सावदे,नशिराबाद,रावेर व नाशिक येथे आढळून येतात.लाड वाणी लोक सावदा येथे तर पोरवाल,मोढ,लाड,देसवाल,शरोळा,

वायदा,नागर,खेडायत,श्रीमाळ हे "गुजराती वाणी" जळगाव जिल्ह्यात विशेषत: चोपडा येथे आढळून येतात."श्रावक" या गुजराती वाणी लोकांची मोठी वसती अमळनेर जवळील गांधली येथे आढळून येते. शुध्द शाकाहारी असलेले "श्रावक" हे गुजराती वाणी लोक "कांदा व लसूण" याला स्पर्श देखील करीत नाहीत.जैन धर्मीय पोरवाल व श्रीमाळी सोडले तर अन्य हिंदू गुजराती वाणी "वैष्णव" पंथीय आहेत. डाकोरनाथ,द्वारकानाथ,रणछोडदास,श्रीकृष्ण ही त्यांची आराध्य दैवते आहेत.प्रत्येकाची स्वतंत्र जात पंचायत असते.

"मारवाडी वाणी" लोकांचे आगरवाल,मेश्री,ठाकूर,खंडेलवाल व ओसवाल असे उपप्रकार असून ते राजस्थानातील मारवाड,जयपूर, जोधपूर व उदयपूर येथून महाराष्ट्रात स्थलांतरीत झाले आहेत. मराठी,गुजराती व मारवाडी या भाषा बोलणारे "मारवाडी वाणी" गिरी व बालाजीचे पूजन करतात.तर जैन धर्मीय "मारवाडी वाणी" लोक दिगंबर पार्श्वनाथाचे पूजन करतात.हिंदू धर्मीय "मारवाडी वाणी" विष्णुची पूजा करतात व त्यांचा पुजारी "गौड ब्राह्मण" समाजाचा असतो. वैष्णव व माहेश्वरी वाणी "रोटी-बेटी" व्यवहार करतात.पण श्रावक वाणी लोकांशी फक्त व्यावसायिक संबंध ठेवतात."मारवाडी वाणी" स्वत:ला अन्य वाणी लोकांपेक्षा "श्रेष्ठ" समजतात.

लिंगायत वाणी समाजाचेपंचम,दीक्षावंत,चीलवंत व मेळवंत असे चार गट व सुमारे १५ उपगट आहेत.सर्वांमधे "रोटी-बेटी" व्यवहार होतात.मराठी व कानडी बोलणारे लिंगायत वाणी लोक "मांसाहार व मद्यपान" वर्ज्य मानतात.गळ्यात शिवलिंग धारण करणारे लिंगायत वाणी लोकांचे बसवण्णा हे आराध्य दैवत आहे.गुलबर्गा येथील बसवेश्वर नंदी व जेजुरीचा खंडोबा हे त्यांचे तीर्थक्षेत्र आहे.त्यांचे धर्मगुरू "जंगम" या नावाने ओळखले जातात.

आपला कृपाभिलाषी,

प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी

व्यवस्थापक

फेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या दीड लाख)

Recent Posts

See All
कुलग्राम व कुलनाम

सर्वांच्या माहितीसाठी लाड सका(शाखीय) वाणी समाजातील धार्मिक कार्ये ज्यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी केली जातात त्या नाशिकच्या सर्व...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page