माझे गडप्रेम - लेक पॅलेस(जग निवास), उदयपूर, राजस्थान
- dileepbw
- Feb 15, 2022
- 1 min read
राष्ट्रीय रक्तपेढी विज्ञान परीषदेच्या निमित्ताने १९८७ साली जयपूर शहराचे मनसोक्त पर्यटन केल्यानंतर साधारणपणे १० वर्षानंतर पुन्हा राजस्थानातील उदयपूर या शहराला परीषद आयोजित करण्याचा सन्मान मिळाला.त्या वर्षी राष्ट्रीय रक्तपेढी विज्ञान संस्थेचा मी "राष्ट्रीय सचिव" व केंद्र व राज्य शासनाचा राष्ट्रपती नियुक्त "सल्लागार" झालेलो होतो.त्यामुळे परीषदेत माझे "वजन" बरेच वाढलेले होते. त्यामुळे संयोजकांनी उदयपूरच्या "सिटी पॅलेस" मधे राष्ट्रीय सचिवाची हत्तीवरून मिरवणूक काढली होती ! अगदी "महाराजा" झाल्यासारखे वाटले होते.त्यामुळे ती "धुंदी" उतरायच्या आत दुसर्याच दिवशी परीषदेतील काही सत्रे टाळून "लेक पॅलेस(जग निवास)" पाहून आलो.
"लेक पॅलेस(जग निवास)" म्हणजे "पिछोला" तलावातील एका बेटावर बांधलेला पूर्वाभिमुख "संगमरवरी महाल" ! आता त्याचे रूपांतर अमेरिकन वास्तुविशारद डी.डी.काँट्रँक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली "ताज लेक पॅलेस, उदयपुर" या हाॅटेलमधे केले आहे.सन १७४३ से १७४६ साली "महाराणा जगत सिंह द्वितीय" यांनी याचा निर्माण केला.जागतिक किर्ती प्राप्त केलेल्या या "लेक पॅलेस(जग निवास)" मधे लाॅर्ड कर्ज़न, विविएन ले, क्वीन एलिज़ाबेथ,इराणचे शाह,नेपाल नरेश,फर्स्ट लेडी जैकलीन केनेडी अशा मान्यवरांनी वास्तव्य केलेले आहे.
"लेक पॅलेस(जग निवास)" मधे दि टायगर ऑफ एस्च्नापुर,दि इंडियन टोम्ब,दि ज्वेल इन दि क्राउन,मेरा साया, ये जवानी है दीवानी अशा चित्रपटांचे चित्रीकरण झालेले आहे.पनवेलला असताना डझनावारी चित्रपटांचे चित्रीकरण पाहिलेले असल्याने याचे फार कौतुक वाटले नाही. पण "वास्तूशिल्प" म्हणून याचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे.





Comments