top of page

माझे गडप्रेम - शनिवारवाडा,पुणे

  • dileepbw
  • Sep 25, 2021
  • 7 min read

Updated: Sep 3, 2022

इयत्ता पाचवी ते सातवी न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड,पुणे या शाळेत तीन वर्षे शिकून देखील शाळेनी किंवा पालकांनी आम्हाला "शनिवारवाडा" दाखवण्याचे कष्ट घेतले नव्हते.१९७३ ते १९८२ अशी दहा वर्षे बी.जे.मेडीकल काॅलेजमधे शिकूनही कधी "शनिवारवाडा" पहाण्याचा योग आला नाही.पिकते तिथे विकत नसते हेच खरे !

शेवटी हा योग आला तो जनकल्याण रक्तपेढी परिवाराचा अखिल भारतीय निवासी अभ्यासवर्ग पुण्यात आयोजित केला त्यावेळी ! "शनिवारवाडा" येथे नव्याने सुरू झालेला इतिहासाचा "दृक-श्राव्य कार्यक्रम" हे त्यावेळी प्रमुख आकर्षण होते. तो कार्यक्रम इतका आवडला की २०१६ साली माझ्या अध्यतेखाली संपन्न झालेल्या भारती विद्यापीठातील अखिल भारतीय रक्तपेढी विज्ञान संस्थेच्या परीषदेच्या वेळी भारतातील सर्व रक्तपेढी प्रतिनिधींना हा कार्यक्रम आवर्जून दाखवायचा असे नियोजन केले.सर्वांचा उत्साह इतका वाढला होता की पडद्यावर मस्तानी साकार करणार्‍या दीपिका पादुकोणला या कार्यक्रमासाठी पाहुणी म्हणून बोलावयाचे ठरविले.पण ते प्रकरण बजेट बाहेरचे आहे असे लक्षात येताच त्याला वेळीच मुरड घातली.

माझ्या इतिहासाच्या अभ्यासासाठी मी काही काळ रोज भारत इतिहास संशोधन मंडळ,पुणे या संस्थेत जात असे.त्यावेळी "शनिवारवाडा" या विषयावर पुस्तके लिहिणारे इतिहास संशोधक श्री.प्र.के.घाणेकर व श्री.प्रभाकर भावे यांचा परीचय झाला.त्यामुळे "दृक-श्राव्य कार्यक्रम" या माध्यमातून प्रथम परीचित झालेला "शनिवारवाडा" अधिक परीचयाचा झाला.

पहिला बाजीराव पेशवा यांनी सन १७३६ साली १३ खोल्यांचा पेशव्यांचा राजवाडा म्हणजेच शनिवार वाडा बांधला. हा वाडा पेशव्यांचे मुख्य ठिकाण होते. हे पुण्याच्या संस्कृतीचे प्रतिक आहे. सुरक्षिततेला जास्त प्राधान्य देऊन शनिवारवाडयाची रचना करण्यात आलेली आहे. शनिवार वाडयाचे मुख्य प्रवेशद्वार दिल्ली दरवाजा या नावाने व इतर दरवाजे गणेश, मस्तानी, जंभळ, खिडकी अशा नावांनी ओळखले जातात.हा "मस्तानी दरवाजा" खास पहिला बाजीराव पेशवा यांनी पत्नी समान वागवलेल्या बुंदेलखंडचे राजा छत्रसाल यांची पुत्री "मस्तानी" हिच्या साठी राखीव होता.

शनिवार वाडयासमोर पहिल्या बाजीरावाचा घोडयावर बसलेला पुतळा आहे. शनिवारवाडयात गणेश महल, रंग महल, आरसा महल, हस्तीदंत महल, दिवाणखाना आणि कारंजे अशी अनेक ठिकाणे पाहावयास मिळतात. पेशव्यांचा इतिहास सांगणारा "लाईट व म्युझिक शो" शनिवार वाडयावर दररोज आयोजित केला जातो. पेशव्यांची सत्ता असलेला हा राजवाडा सन १९२८ मध्ये आगीमुळे नष्ट झाला. आता फक्त राजवाडयाच्या मजबूत तटबंदी असणा-या भिंती व सुरक्षिततेसाठी अणकुचीदार टोक असणारा भक्कम दरवाजा शिल्लक आहे.

शनिवारवाड्याच्या पायाभरणीचे काम १० जानेवारी १७३० रोजी सुरू झाले, तर २२ जानेवारी १७३२ रोजी शनिवारवाड्याची वास्तुशांत करण्यात आली. त्या दिवशी शनिवार होता म्हणून "शनिवारवाडा" असे नाव पडले. १७३२ नंतरही या वाड्यात वारंवार नवीन बांधकामे, बदल होत राहिले. बुरुजाचे दरवाजाचे काम होण्यास १७६० हे वर्ष उजाडले. १८०८, १८१२, १८१३ या वर्षी छोट्या-मोठ्या आगी लागल्याच्या नोंदी सापडतात, तर १७ नोव्हेंबर १८१७ ला वाड्यावर ब्रिटिशांचे निशाण लागले. त्यानंतर येथे काही काळ पुण्याचा पहिला कलेक्‍टर "हेन्‍री डंडास रॉबर्टसन" राहत होता. त्यानंतर वाड्यात तुरुंग, पंगुगृह, पोलिसांची निवासस्थाने होती. १८२८ मध्ये वाड्यास मोठी आग लागली व आगीत बहुतेक सर्व इमारती जळाल्या. पुढे तब्बल ९० वर्षांनी अखेर वाड्याची दुरावस्था संपली. १९१९ मध्ये वाडा संरक्षित स्मारक म्हणून जाहीर झाला व वाड्याचे उत्खनन करण्यास सुरुवात झाली. त्या काळी वाड्यात कोर्टासाठी वापरण्यात येणारी इमारत १९२३ पूर्वी उत्खननासाठी पाडण्यात आली.

शनिवारवाड्यासंबंधी अनेक घटना, दुर्घटना आहेत. वाड्यातील पेशव्यांच्या कार्यालयात अनेक वीर आणि मुत्सद्दी येत. राजकारणाचे येथे फड रंगत; पेशव्यांचा दरबार येथेच होता. पेशव्यांच्या घरांतील मुलामुलींची लग्ने याच वाड्यात होत. शनिवारवाड्यासमोरील पटांगणात मोहिमेला जाणारे सैन्य जमत असे. पुढे येथे जाहीर सभा होऊ लागल्या. आचार्य अत्र्यांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ याच पटांगणातून लढवली. वाड्याच्या पटांगणातील मारुतीस सभामंडप होता. हे मंदिर लॉइड्ज पूल (हल्लीचा नवा पूल किंवा शिवाजी पूल) बांधणाऱ्या केंजळ्यांनी बांधले. मंदिरात १९ मार्च १९२४ रोजी मारुतीची मूर्ती बसविण्यात आली. हा मारुती "बटाट्या मारुती" म्हणून प्रसिद्ध आहे. दिल्ली दरवाजा वाड्यातील मुख्य प्रवेशद्वार तर "हजारी कारंजे" हे विशेष आहेत.

शनिवारवाड्याची इमारत २१ फूट उंच होती आणि चारही बाजूने एकूण ९५० फूट लांबीची तटबंदी भिंत होती. ही भिंत आणि बुरूजं आजही पुण्यातील मध्यवस्तीत दिमाखाने उभे आहेत. वाड्याभोवतालच्या भिंतीला पाच मोठे दरवाजे व नऊ बुरूज आहेत. येथून जवळच मुठा नदी वाहते. तटाला ९ बुरूज असून सर्वांवर तोफा बसवण्याची सोय केलेली आहे. यांपैकी 'पागेचा बुरूज' आतून पोकळ असून त्याच्या पायथ्याशी मध्यभागी बांधून काढलेला एक गोल खड्डा आहे. त्यात तोफांचे गोळे ठेवत असत.तटबंदीला पाच दरवाजे असून त्यांना अनुक्रमे दिल्ली, अलीबहाद्दर किंवा मस्तानी, खिडकी, गणेश, नाटकशाळा ऊर्फ जांभूळ दरवाजा ही नावे आहेत. सर्व दरवाजे टोकदार कमानींमधे असून मोठे अणुकुचीदार लोखंडी खिळे व जाडजूड पट्ट्या ठोकून ते भक्कम केलेले आहेत. यांत दिल्ली दरवाज्याची उंची २१ फूट असून रुंदी १४ फूट आहे.हाच सर्वांत मोठा दरवाजा आहे. वाड्याच्या सर्व तटांवर मिळून २७५ शिपाई, रात्रंदिवस ५०० स्वार व वाड्यातील अंतर्गत बंदोबस्तासाठी १०००हून अधिक नोकर होते.

दिल्ली-दरवाज्यावर नगारखाना आहे. आगीच्या प्रलयातून वाचलेला अस्सल पेशवेकालीन शाबूत असलेला भाग हा एवढाच.देवडीच्या भिंतीवर शेषशायी विष्णू, गणपती या दैवतांची चित्रे काढली आहेत. ती आता बरीच खराब झाली आहेत. वाड्याच्या आतल्या भागांमध्ये काय चालले आहे, हे बाहेरच्या माणसांना दिसू नये म्हणून दिल्ली दरवाजा, देवडी आणि आतला चौक नागमोडी रचनेत आहे.

एक मुसलमान सरदार पत्रात लिहितो: "बाहेरून पाहता वाडा नरकासारखा भासतो. मात्र आत स्वर्गासारखा दिसतो(संदर्भ - घाणेकर, प्र. के.-२०१३,पेशव्यांचे अधिकृत निवासस्थान शनिवारवाडा,पुणे: स्नेहल प्रकाशन)

शनिवारवाड्यातील गणेश रंगमहाल हा नानासाहेब पेशव्यांनी १७५५ साली बनवून घेतला. गणेशोत्सव भव्य दिव्य प्रमाणात साजरा करता यावा हा त्यामागचा उद्देश होता. येथे एका वेळी शंभर नर्तकी नृत्य करू शकत असत. महालाच्या एका टोकाला सोन्याचा पत्रा असलेली संगमरवरी गणेशमूर्ती होती, तर दुसऱ्या टोकाला कारंजी व सुंदर फुलबाग होती. फुलांचा सुगंध व कारंज्यांचा नाद यामुळे महालात बसणे हा सुखद अनुभव असे..

सांगलीचे कवी साधुदास यांनी केलेले शनिवारवाड्याचे वर्णन - पुण्यातील पेशवे दफ्तरात पेशव्यांच्या खजिन्याची मोजदाद दिलेली आहे. या कागदपत्रांनुसार पेशव्यांच्या शनिवारवाड्यातील रत्नशाळेत ५१४०२ हिरे, ११३५२ माणके, २७६४३ पाचू, १७६०११ मोती, ४३५ नीलम, ४३२ वैडुर्य, ४१७ पुष्कराज, ७५ गोमेद, ४४४ पोवळी, ३७८ करड्या, १५६२ पिरोजा(फीरोजा), १९१२ करिपोला (कोरल), ४९७ लसण्या(लहसुनीया) असे मौल्यवान खडे होते. यातील बहुतांशी खजिना इंग्रजांनी चोरून नेला. उरलेला खजिना दुस-या बाजीरावांनंतर त्याचा दत्तक पुत्र नानासाहेब (दुसरे) यांना मिळाला. कानपूर आणि विठूर-ब्रह्मावर्तमध्ये पराभव झाल्यानंतर त्यांना हा खजिना सोबत नेणे शक्य नव्हते. अतिमौल्यवान जडजवाहीर सोडून राहिलेला खजिना त्यांनी तेथील एका विहिरीत लपवला. इंग्रजांना हेरांकडून त्याची माहिती मिळाली. त्यांनी तो खजिना बाहेर काढला. कर्नल गॉर्डन अलेक्झांडर याने लिहून ठेवलेल्या पुस्तकात त्याचा उल्लेख आहे. त्यात ३० लाख रुपयांची सोन्या-चांदीची नाणी, ताटे, वाट्या, इतर भांडी, कित्येकशे शेर वजनाची चांदीची अंबारी आणि ७० लाख रुपयांचे दागिने, जडजवाहिरे असा एकूण एक कोटी रुपयांचा खजिना त्या वेळी ब्रिटिशांना मिळाला होता.स्काॅटलंडचा एडिंगबर्ग येथील राजधानीचा किल्ला पहाताना देखील शनिवारवाडयातील "खजिना विहीर" सारखेचे हे गुप्तधन लपविण्याचे स्थान मला पहायला मिळाले होते.याची आवर्जून आठवण झाली.

शनिवार वाडा ही अशी वास्तु जिथे पेशवाईतील स्त्रियांनी ऐश्वर्यही उपभोगलं आणि चार भिंती आड दुःखही पचवत दिवस काढले.या सगळ्या स्त्रियांच्या एकांतवासाची साक्षीदार असलेली ही वास्तू ! या वाड्याचं आणि स्त्रियांचं वेगळंच नातं होतं.आनंदात एकत्र न्हाऊन निघत होते तर दुःखात जोडीनं आसवं गाळत होते.एक गोष्ट मात्र नक्की या सगळ्या स्त्रियांनी हयातभर शनिवारड्याचे मांगल्य राखुन ठेवले होतं.त्यांनी वाडयावर भरभरुन प्रेम केलं आणि वाड्यानेही त्यांना तितकंच प्रेम दिलं.असा हा शनिवारवाडा ! यान काय नाही पाहिलं ?

शाही लग्न - मुंजी.जेवणावळी,सण वार,पुजा अर्चा अशा एक ना अनेक गोष्टींचा साक्षीदार ! त्या बरोबरीनं अनेक मृत्यु पाहिले,स्त्रियांचा आक्रोश पाहिला,राजकारणातील खलबतं,भाऊबंदकीही पाहिल्या हे सगळे कमी म्हणुन की काय नारायणरावाच्या खुना नंतर स्वतःच्या अंगावर उडालेले रक्ताचे डागही पाहिले.असा हा वाडा अनेक वर्ष डौलाने उभा.पण त्याचे डौल जपत होत्या त्या पेशवाईतील अनेक स्त्रिया. वाड्यात सतत असणाऱ्या धांदली ! त्यातील स्त्रियांचा उत्साही सहभाग वाड्याला जिवंत पण देत होतं !आता स्त्रियाही गेल्या आणि वाड्याचं जिवंतपणही गेलं ! धांदली म्हणजे काय तर अनेक सण , त्या पैकी मुख्य बारा सण ... गुढी पाडवा , अक्षय तृतीया , नागपंचमी , राखीपौर्णिमा , गणेश चतुर्थी , दसरा , दिवाळी , संक्रांत , वसंत पंचमी , होळी आणि रंगपंचमी... बरोबरीने इतर सण आणि कुळ धर्म कुलाचार .. पेशव्यांचे वाढदिवस , त्या शिवाय पेशव्यांच्या पंधरा कुलदेवता आणि एक महापुरुष यांचे उत्सव शिवाय चैत्र गौरी , गौरी पुजन आणि इतर अनेक सण वार हे सगळं घराती निरनिराळया पिढीतील स्त्रियाच पार पाडत वाड्याला जिवंत ठेवत होत्या. म्हणुनच पेशवाईतील स्त्रिया मध्ये स्त्रिया इतकीच महत्वाची ती वास्तु म्हणजे शनिवारवाडा ! म्हणुनच वाड्याच्या आठवणी शिवाय त्याच्या अनेक लेकी म्हणजे पेशवाईतील स्त्रिया अपुर्ण आहेत.

मुठा नदीच्या किनारी थोरल्या बाजीरावांनी १० जानेवारी १७३० ला वाड्याचे भूमिपुजन केलं आणी २ फेब्रुवारी १७३१ ला म्हणजे १३ महिन्यात बांधकाम पुर्ण होऊन पेशवे वाड्यात राहायला गेले. तेंव्हा हा वाडा दोन मजली आणि दोन किंवा तीन चौकी होता.त्यानंतर त्यात वेळोवेळी बदल होत गेले.नानासाहेब पेशव्यांच्या काळात वाडा अजुन विस्तीर्ण झाला.सहा एकर जागेवर व्यापलेला शनिवारवाडा हा उत्तराभिमुख आहे.त्या काळातील सगळ्या सरदारांचे वाडे उत्तराभिमुखच असत.या वरून दिल्ली पादाक्रांत करायची दृष्टी लक्षात येते.चोहीकडे तटबंदी असलेल्या वाड्याला पाच दरवाजे आहेत.मुख्य दिल्ली दरवाजा , मस्तानी दरवाजा( बुरुज दरवाजा ) , खिडकी दरवाजा , गणेश दरवाजा आणि नाटकशाळा किंवा जांभुळ दरवाजा अशी ती पाच नावं.दिल्ली दरवाज्याची उंची २१ फुट आणि रुंदी १४ फुट आहे , त्या वर नगारखाना होता. दिल्ली दरवाज्यातुन आत गेले की अनेक दालने होती , प्रत्येक दालनाला कालानुरूप आणि व्यक्ती प्रमाणे नावे होती , सदरेच्या कामा करता वेगळी इमारत , दिवाणखाने , निवास स्थाने , देवघरे ,ग्रंथालय , गोशाळा , व्यायामशाळा , कोठीघर , शस्त्रागार , औषधभांडार, स्वयंपाक घर अशी एक ना अनेक दालने.त्या शिवाय खास दरबार , उत्सवाचे दरबार ,पाण्याचे हौद , कारंजी अशा कितीतरी गोष्टी होत्या .या वाड्यातील एक गोष्ट विशेष महत्वाची ती म्हणजे " गणेश महाल " ! १७५५ साली नानासाहेब पेशव्यांनी गणेश महाल बांधला.अतिशय संपन्न असा हा महाल त्या वेळेसच्या पेशव्याच्या वैभवाला साजेसा होता , सागवानी लाकडाची कलाकुसर , भिंतीवर पौराणिक प्रसंगाची चित्रं , एका भिंतीवर संगमरवरी भव्य गणेश मुर्ती , दुसऱ्या भिंतीवर पेशव्यांचे मुख्य सरदार आणि हिंदुस्थानातील मुख्य राज्यकर्ते यांची तैलचित्रे , एका बाजुला दुर्मिळ हस्तलिखित आणि ग्रंथ संग्रह तसेच पेशव्यांना भेटी दाखल मिळालेल्या आणि जमवलेल्या दुर्मिळ वस्तूंचा संग्रह ...जमिनीवर गालिचे ... असा सगळाच थाट होता. मुख्य सण - उत्सव आणि विजयोत्सव गणेश महालातच होत.पेशव्यांचा भव्य ग्रंथसंग्रह होता , संस्कृत ,प्राकृत भाषेतील अनेक पुस्तक , दुर्मिळ ग्रंथ , पोथ्या होत्या.या सगळ्यांची काळजी घेण्या करता नेमलेले ग्रंथपाल होते.एकेकाळी या वाड्यात कुटुंबातील पस्तीस जण आणि अधिकारी , सेवकवर्ग मिळुन एक हजार लोकांचा राबता असे.वाड्यात जरी एक मुख्य देवघर असले तरी प्रत्येकाच्या महालात स्वतंत्र देवघरं होती.महादेव जरी कुलदैवत असले तरी सगळ्यांचीच गणपतीवर नितांत श्रद्धा होती.वाड्यात एका भिंतीवर " ब्रिटिश मेक " घड्याळ लक्ष वेधुन घेई ,शेवट पर्यंत ते व्यवस्थित चालु होते. हे घड्याळ थोरल्या बाजीरावांच्या काळात वाड्यात आले होते.पंच्याऐंशी वर्ष पेशव्यांचे वैभव अनुभवलेली ही वास्तू ,१७ नोव्हेंबर १८१७ ला इंग्रजांच्या ताब्यात गेली आणि वाडयावर युनियन जॅक फडकला.इथुन पुढची १०-११ वर्षे वास्तुच्या नशिबी पेशवाईतील इतर स्त्रियांचे दुःख आले.इंग्रजांनी तिचं रूपांतर कचेरी , दवाखाना आणि तुरुंग असे केले.भरजरी पैठणी जाऊन सुती लुगडं अंगावर आले.अशी ही पेशवाईचे अनेक चढ उतार , सुख दुःख पाहिलेली वास्तू २१ फेब्रुवारी १८२८ आगीत सगळे वैभव हरपुन बसली.माणसाचे जिवंतपण संपले की मृत्यु होतो.पण वास्तूच्या नशिबी मरण म्हणजे भग्नावशेष बनुन राहण असतं.


फोटो शोध सौजन्य - गुगल

सूचना - सदर लिखाण डॉ. दिलीप वाणी © कॉपीराईट आहे.

Recent Posts

See All
"मृगागड किल्ला, ता.सुधागड,जि.रायगड"

"मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" आपला वर्गमित्र बापू घोडके यांने नुकताच "मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" हा आपल्या सुवर्ण महोत्सवी...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page