"मोहम्मद रफींचा जन्मदिवस"
- dileepbw
- Sep 3, 2023
- 7 min read
"मोहम्मद रफींचा जन्मदिवस"
©दिलीप वाणी,पुणे
आज दि.२४ डिसेंबर ! मोहम्मद रफींचा जन्मदिवस ! लगेच ओठांवर ओळी आल्या -
"दिल का सुना साज तराणा धुंडेगा,
मुझको मेरे बाद जमाना धुंडेगा"
आणि मन आपोआपच गुणगुणू लागले -
"तुम मुझे यु भुला ना पाओगे
जब कभी भी सुनोगे गीत मेरे
संग संग तुम भी गुनगुनाओगे"
मी पनवेलला असताना रफीच्या गाण्यावर चित्रीत झालेली काही गाणी आधी प्रत्यक्ष चित्रीकरण होताना पाहिली होती व नंतर पडद्यावर साकार झालेली पाहिली व ऐकली होती.मला विलक्षण भावायचे ते हेच की मी चित्रीकरणाच्या वेळी पाहिलेला अभिनेताच पडद्यावर ते गाणे प्रत्यक्षात तोच म्हणतो आहे असे वाटायचे.जसे दीपक अंधारे गात असताना हा दीपक आहे हे जसे सांगावे लागत नाही अगदी तसेच ! नाचताना जसा जितेंद्र दिसायचा तसाच रफीचे गाणे ऐकताना देखील जितेंद्रच गातो आहे असेच वाटायचे.
रफीजींचा पहिला पब्लिक परफॉर्मन्स हा त्याच्या वयाच्या १३ व्या वर्षी लाहोर मध्ये झाला.पहिले गाणे 'गाँव की गोरी' या चित्रपटात त्यांनी १९४५ मध्ये गायले. त्याच दरम्यान गायना बरोबरच त्यांनी एक दोन चित्रपटात छोट्या छोट्या भुमिकाही केल्या. १९४७ मध्ये फाळणीनंतर मोहम्मद रफी यांनी भारतात राहण्याचा निर्णय घेतला. १९४९ ते १९७० च्या दरम्यान रफीजींनी चित्रपटक्षेत्रात आपल्या जबरदस्त गायनाने चांगला जम बसवला व तो टिकवला देखील.
१९६० चं दशक हे रफीजींसाठी खास होतं, त्याच वर्षी त्यांना 'चौदहवी का चाँद' च्या शिर्षक गीतासाठी पहिल्यांदाच "फिल्मफेअर ॲवॉर्ड" मिळालं.याच दशकात रफीजींनी दिग्गज संगीतकारांबरोबर काम करून अनेकानेक हिट गाणी दिली.या काळात किशोरकुमार स्वतःच्या गाण्यापेक्षा अभिनयाकडे जास्त लक्ष द्यायचे. त्यामुळे त्यांना गायला कठिण जातील अशी 'मन मोरा बावरा' (चित्रपट - रागिनी) आणि 'अजब है दास्तां तेरी ये जिंदगी' ही दोन गाणी त्या त्या संगितकारांनी चक्क रफीजींकडून गाऊन घेतली होती. १९६९-७० मध्ये आराधनातली 'मेरे सपनोंकी रानी ' आणि 'रूप तेरा मस्ताना' गाजल्यावर सुपरस्टार राजेशखन्ना नेहमी किशोरकुमारजीचीच शिफारस जिथे तिथे करू लागले. त्यामुळे रफीसाठी गायनाच्या संधी कमी होत गेल्या. अगदीच कव्वाली, शास्त्रीय, गजल.. अशा प्रकारची संगिताची बैठक असलेली गाणी त्यांना मिळू लागली. पण त्यातूनही 'हम किसीसे कम नही' मधल्या 'क्या हुवा तेरा वादा' या गाण्याने रफीजींना पुन्हा एकदा नव्याने प्रकाशझोतात आणलं.
हा आनंद फार काळ टिकला नाही कारण त्याकाळी चित्रपटक्षेत्रात खूप वेगाने बदल होत होते.त्यातही मोहम्मद रफी यांनी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या मदतीने 'कर्ज' साठी 'दर्द्-ए-दिल' गात नवीन प्रवाहात स्वत:ला झोकून दिलं खरं, पण सिनेमातून आता 'संगीत' हद्दपार होतंय हे त्यांना पुर्णपणे कळून चुकलं होतं. लता मंगेशकर व मोहम्मद रफी यांच्या छोट्या छोट्या वादांचं आणि मतभेदांचं पर्यावसान एकमेकांबरोबर न गाण्याच्या निर्णयात रूपांतरीत झालं. 'दिल ने फिर याद किया' या चित्रपटाचं शिर्षकगीत गाण्यासाठी सोनिक ओमी यांना रफी, लता आणि मुकेश यांची निवड केली होती. पण नेमकं त्याचवेळी 'लता आणि रफी हे एकमेकांबरोबर गाणार नाहीत' असं दोघांनी जाहीर करून टाकलं. सुमन कल्याणपूर या नव्या तरूण गायिकेला ते गाणं दिलं. त्यांनी एकवेळ लताजींना वगळल, पण रफीजी मात्र त्या गाण्यात त्यांना जास्त महत्त्वाचे वाटले.वैयक्तिक पातळीवर मात्र त्याचे वाद कधीच मिटले नाहीत.
रफीजी हे त्यांच्या उदार स्वभावासाठी प्रसिद्ध होते. किशोरकुमारजींच्या सिनेमातल्या गाण्यासाठी त्यांनी निव्वळ 'एक रुपया' मानधन घेतलं असही म्ह्टलं जातं. शम्मीसाठी त्यांनी ज्या धाटणीत गाणी गायली आहेत, ती गाणी कुणीही पडद्यावर न पाहता फक्त ऐकून सांगेल किंवा अंदाज बांधू शकेल की ही गाणी बहुतेक शम्मीवरच चित्रित झाली असतील असं ऐकिवात आहे की गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळेला शम्मी स्वतः स्टुडिओत रफीजींना भेटून सांगत असे की ह्या गाण्यावर मी असे हावभाव करणार आहे किंवा इथे थोडा अंगविक्षेप आहे. इ. 'दोस्ती' चित्रपटासाठी त्यांनी सुधीरकुमार या नवोदित कलाकारासाठी ३ ते ४ गाणी गायली. तिही त्याच्याच लकबीत. त्यापैकी 'चाहूंगा मैं तुझे...' या गीताला फिल्मफेअर मिळाले.
आपल्या एकूण ३५ वर्षांच्या गायनाच्या कारकिर्दीत त्यांनी ४००० च्या वर गाणी गायली. ज्यात हिंदी, मराठीसह अन्य भाषेतल्या अनेक प्रकारच्या गाण्यांचा समावेश होता. गैरफिल्मी, गझल, भजन, क्लासिकल, सेमिक्लासिकल इ. या अनेक प्रकारांमध्ये रफीजींचे अनेक मूडही समाविष्ट आहेत. रफींना गाडय़ांचीही खूप आवड होती. या छंदापोटी त्यांनी थेट लंडनहून होंडा कार मागविली होती आणि ऑडी हे नाव सिनेमासृष्टीत फारसं कोणाला ठाऊक नव्हतं तेव्हा त्यांच्या दारात दिमाखात ऑडी उभी होती.त्यांना करमणूकीसाठी कॅरम, बॅडमिंटन व पत्ते खेळायला आवडत. तसंच पतंग उडवणे हा ही त्यांचा छंद होता.
नौशादच्या संगीत नियोजनात "गाव की गोरी (१९४५)" या सिनेमासाठी पहिले गीत गायलेल्या रफीचे शेवटचे गीत होते "आसपास(१९८०)" या लक्ष्मी-प्यारे यांच्या संगीत निर्देशनात ! मधल्या ३५ वर्षांत रफीसाहेबांनी दीडशेहून जास्त संगीतकारांसाठी हजारो गाणी गायली.सलाम त्यांना !
उपजत मधुर आवाज,सातत्यपूर्ण रिवाज,अत्यंत कनवाळू आणि मृदू स्वभाव,दानशूर व अजातशत्रू असलेले रफी मला आवडायचे ते त्यांच्या प्रत्येक अभिनेत्याला अनुरूप असा आवाज द्यायच्या लकबीमुळे ! सांगावे लागत नसे त्यांचे गाणे पडद्यावर कुणी साकार केले असेल ते ! भजनापासून कव्वाली पर्यंत गाणी त्यांनी लीलया गायली.पडद्यावर भिकारी असो वा राजा, प्रेमी असो अथवा देवळातील पुजारी,रफीचा आवाज नेहमीच प्रसंग आणि व्यक्तीला तंतोतंत शोभायचा . त्यांनी गायलेल्या अनेकविध गाण्यांवर धावती नजर टाकू या.
१. भजन : मला वाटतं लतादीदींचा अपवाद वगळता इतकी सुंदर आणि भावपूर्ण भजनं इतर कोणत्याही गायकाने गायली नसावीत. बैजू बावरा मधील "मन तडपत हरी दर्शनको आज " हे त्याचा एक उत्तम नमुना. भजनाला आवश्यक आर्तता, व्याकुळपणा आणि भक्तिभाव याचा सुरेख मिलाप रफीने गायलेल्या सर्वच भजनांत अनुभवायला मिळतो. खानदान चित्रपटातील " बडी देर भई नन्दलाला " आणि गोपी मधील " सुखके सब साथी दुखमे ना कोई " हि भजने देखील तेवढीच तल्लीनता प्रकट करतात. .
२. गझल : अनेकोउत्तम गझला रफीने आपल्या कारकिर्दीत गायल्या आहेत. उर्दूची उत्तम जाण ,शब्दांचे वजन ओळखून केलेले उच्चार आणि भावदर्शी स्पष्ट आवाज त्यांच्या गजलांमध्ये ठळकपणे जाणवतो. काजल मधील " छू लेने दो नाजुक होठोको " हि गझल असो किंवा मेरे हुजूर मधील " गम उठाने के लिये मैं तो जिये जाऊंगा " हे गीत ,दोन्ही गझलांमधील भिन्न भावना श्रोत्यांपर्यंत अचूक पोहोचतात . तूम मेरे सामने हो ( सुहागन ), ना किसीकी आँख का नूर हूं ( लाल किला ), रंग और नूर कि बारात किसे पेश करू ( गझल ), ऐसे तो ना देखो ( तीन देविया ), अब क्या मिसाल दु ( आरती ), आप के हसीन रुख पे ( बहारे फिर भी आयेगी ) ,तू इस तरह से मेरी ज़िन्दगीमे शामिल हैं ( आप तो ऐसे ना थे ) अशी एकाहून एक श्रवणीय गाणी आठवतात.
३. कव्वाली :हिंदी सिने संगीतातील बहुतेक लोकप्रिय कव्वाल्या रफीनेच गायल्या आहेत.आपल्या खणखणीत आवाजाचा वापर रफीने कव्वालीत केलेला सापडतो. सर्वात प्रथम आठवते .. ये इश्क इश्क हैं ( बरसात कि रात ) हि कव्वाली मैलाचा दगड ठरलेली हि कव्वाली रफीने आशा भोसले,मन्ना डे आणि सुधा मल्होत्रा यांच्या बरोबर गायली आहे. " काला समुंदर " सिनेमातील मेरी तसवीर ले कर क्या करोगे तुम" हि कव्वाली पण खूप गाजली होती. ये माना मेरी जान ( हसते जख्म ), इशारोंको अगर समझो ( धर्मा ) ,परदा है परदा ( अमर अकबर अँथनी ), हम किसीसे कम नही ( टायटल ) आणि पल दो पल का साथ हमारा ( धी बर्निंग ट्रेन ) या सर्व कव्वाल्या आजही रसिक प्रिय आहेत.
४. प्रेमगीते : हे तर रफीचे बलस्थान .दिलीप कुमार पासून ऋषी कपूर पर्यंत सर्व नायकांची प्रेयसीला साद घालणारी ,तिच्या सौंदर्याचे वर्णन करणारी आणि तिला छेडणारी अनेक गीते रफीने अतिशय समर्थपणे गायली.दिलीप कुमारचे गांभीर्य,देव आनंदचा खट्याळपणा,शम्मी कपूरचे धसमुसळेपण,धर्मेंद्रचे रांगडे व्यक्तिमत्व आणि जितेंद्रचा सळसळता उत्साह आपल्या आवाजातून चोखपणे सादर केला.राजेंद्र कुमार,भारत भूषण,प्रदीप कुमार,विश्वजित,जॉय मुखर्जी यांचे चित्रपट चालले ते केवळ रफीच्या गाण्यामुळे.दिल का भँवर करे पुकार ( तेरे घर के सामने ), नैन लड गयी है ( गंगा जमुना ),ए गुलबदन ( प्रोफसर ), ये मेरा प्रेमपत्र पढकर ( संगम ) , मै प्यार का राही हू ( एक मुसाफिर एक हसीना ), मै कही कवी ना बन जाउ ( प्यार हि प्यार ), चौदवी का चांद ( टायटल ), मस्त बहारोंका मै आशिक ( फर्ज ), दर्द ए दिल ( कर्ज ) अशी विविध गाणी सहज आठवतात.
५. विरह गीत : असफल प्रेमाची वेदना असो वा प्रेयसी विरहाचे दुःख ,रफीच्या आवाजात त्यांना वाचा फुटते. शेकडो Sad Songs मध्ये रफीने त्या भावनांना समोर आणलं आहे , एरवी पहाडी असणारा रफीचा स्वर कमालीचा हळवा आणि कधी कधी असहाय बनतो. "मैने चांद और सितारोंकी तमन्ना कि थी " हे चंद्रकांता चित्रपटातील गाणं ऐका म्हणजे रफीच्या स्वरातील ताकद लक्षात येईल. हीच गोष्ट ब्रम्हचारी मधील " दिल के झरोखेमे तुझको बिठाकर " या गाण्याबाबत . सुहानी रात ढल चुकी ( दुलारी ), याद ना जाये बिते दिनोकी ( दिल एक मंदिर ) ,क्या हुआ तेरा वादा ( हम किसीसे कम नही ), रहा गर्दीशोमे हर दम ( दो बदन ), दिन ढल जाये ( गाईड ), खिलोना जान कर तुम तो ( खिलौना ), ये दुनिया उसिकीं ( कश्मीर कि कली ) या गाण्यांमधून रफीने मांडलेली कैफियत मनाला चटका लावून जाते.
६. हास्य गीत : ५० आणि ६० च्या दशकात जॉनी वॉकर व मेहमूद या दोन Comedians चे फार मोठे प्रस्थ होते. नायकांप्रमाणेच त्यांचे एक कथानक सिनेमात असे तर त्यांच्या तोंडी गाणी पण असत . अर्थातच त्यांच्या साठी वेगळा आवाज रफीने राखीव ठेवला होता . जॉनी वॉकर साठी सर जो तेरा चकराये ( प्यासा ), ए दिल है मुश्कील जीना यहा ( C.I.D ),मै बम्बईका बाबू ( नया दौर ), जंगल मे मोर नाचा ( मधुमती ) हि सर्व गाणी ज्या बेमालूमपणे रफीने गायली त्याला तोड नाही. मेहमूद साठी हम काले हैं तो ( गुमनाम ), गोरी चलो ना हंसकी चाल ( बेटी बेटे ), दुष्मन है जमाना ( पथ्थर के सनम ), सज रही गली मेरी मा ( कुंवारा बाप ) अशा अनेक गाण्यात रफीने धमाल उडवली आहे .
७. तत्वज्ञान सांगणारी गाणी : जीवनाचे तत्वज्ञान सांगणारी अनेक गाणी रफीने एका वेगळ्याच पद्धतीने गायली आहेत. आयुष्यातील सुख-दुःख ,अडचणी-समृद्धी-दारिद्र्य या पासून निर्माण होणाऱ्या परिस्थितीचे निवेदन तटस्थ वृत्तीने ,एखाद्या साधू-संतांच्या भूमिकेतून रफीने मांडले आहे. : "मन रे तू काहे ना धीर धरे " (चित्रलेखा) या गीतात प्रकट होणार अलिप्तपणा , चल उड जा रे पंच्छी (भाभी) आणि "राही मनवा दुःख कि चिंता क्यू सताति है" ( दोस्ती) गाण्यात मांडलेलं त्रिकालाबाधित सत्य , "एक बंजारा गाये " (जिने की राह ) मधे हसत-खेळत सांगितलेली जीवनशैली , "क्या मिलीये ऐसे लोगोसे "( इज्जत ) गाण्यातील कडवटपणा ," बस्ती बस्ती परबत परबत गाता जाये बंजारा ( रेल्वे प्लॅटफॉर्म ) मधलं पैशासाठी वेड्या लोकांसाठी दिलेला संदेश हे सगळे एखाद्या Kaleidoscope प्रमाणे उलगडताना रफी निश्चितच Great यात शंकाच नाही.
या शिवाय शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी ( मधुबन मे राधिका नाचे रे, नाचे मन मोरा , राधिके तुने बन्सुरी बजाई , झनक झनक तोरी बाजे पायलीया ), आणि देशभक्तीपर गीतं ( कर चले हम फिदा , मेरे देशमे पवन चले ,ये देश है वीर जवानो का ,वतन पे जो फिदा होगा ) यात पण रफीचा हातखण्डा होताच. मुलगी सासरी पाठवताना म्हटलेले " बाबुल कि दुवाए लेती जा " ( नीलकमल ) हे अजरामर गीत रफीचेच. भिकाऱ्यांवर चित्रित "आँखे" मधील "दे दाता के नाम तुझको अल्लाह रखे " आणि दस लाख मधलं : गरिबा कि सुनो " हि गाणी सुद्धा रफीचीच. आपल्या आवाजाची उंची , खोली आणि विस्तार याचा पुरेपूर वापर करत मानवी जीवनातील सर्व प्रकट-अप्रकट भावनांचे अचूक सादरीकरण त्यांच्या गाण्यात नेहमीच आढळते.
आता रफीने गायलेल्या मराठी गाण्यांकडे वळू या.
१)तुझे रूप सखे गुलजार असे
२)शोधिसी मानवा राउळी मंदिरी
३)हा रुसवा सोड सखे
४)प्रभू तू दयाळू
५)हे मना आज कोणी
६)प्रकाशातले तारे तुम्ही
७)नको आरती की
८)नको भव्य वाडा
९)खेळ तुझा न्यारा
१०)अग पोरी संबाल दर्याला
मोहम्मद रफींच्या विषयी संगीतकार नौशाद एक किस्सा सांगायचे. एका गुन्हेगाराला फाशीची शिक्षा द्यायची होती. या गुन्हेगाराला त्याची शेवटची इच्छा विचारण्यात आली.या गुन्हेगारानं त्याच्या कुटुंबाला भेटण्याची, विशेष खाद्यपदार्थांची मागणी केली नाही. तर त्यानं इच्छा व्यक्त केली की, त्याला 'बैजू बावरा' सिनेमातलं 'ऐ दुनिया के रखवाले' हे गाणं ऐकायचं आहे.त्यानंतर एक टेपरेकॉर्डर आणून त्याची हे गाणं ऐकण्याची शेवटची इच्छा पुरी केली गेली.
ताजमहाल चित्रपटातली त्यांनी गायलेली पाव छू लेने दो फुलोंको इनायत होगी, जो बात तुझमे है,ही गाणी खूप सुंदर म्हटली आहेत. एक मुसाफिर एक हसीना चित्रपटात त्यांनी आशा भोसले यांच्या बरोबर म्हटलेल्या आप यूं ही अगर हमसे मिलते रहे गाण्यात त्यांनी ओतलेला आवाजाचा गोडवा कमालीचा आहे.
त्यांना जाऊन कित्येक वर्षे झाली तरी त्यांच्या गाण्यांची मोहिनी कणभरदेखील कमी झाली नाही.निधन झाले त्या दिवशी त्यांनी रेकॉर्ड केलेले शेवटचे गाणे "तू काही आस पास है दोस्त" १९८१ च्या आस पास चित्रपटात होते.आज जिथे असतील तिथे,ते देखील म्हणत असतील,
तुम मुझे यूं भुला ना पाओगे
जब कभी भी सुनोगे गीत मेरे
संग संग तुम भी गुनगुनाओगे
शेवटी म्हणावेसे वाटते
वो जब याद आये,बहोत याद आये
मोहम्मद रफी यांना विनम्र अभिवादन !




Comments