लाडसक्का वाणी" समाजाची "लाडसक्की" ही मातृभाषा"
- dileepbw
- Sep 20, 2022
- 2 min read
"लाडसक्का वाणी" समाजाची "लाडसक्की" ही मातृभाषा"
मध्य आशियातून भारतात स्थलांतरीत झालेल्या "सका/शक/Scythian" लोकांचा लाड देशात(सध्याचा दक्षिण गुजरात) स्थिरावलेला वाणी म्हणजे व्यापारी समाज "लाडसक्का वाणी" या नावाने ओळखला जातो.
जगातील बहुतेक प्रमुख भाषांप्रमाणेच, मराठी भाषाही एकाहून अधिक पद्धतींनी बोलली जाते. मुख्य भाषेशी नाते कायम ठेवलेली, तिची पोटभाषा दर १२ कोसांगणिक उच्चारांत, शब्दसंग्रहांत, आघातांत व वाक्प्रचारांत बदलत रहाते. असे असले तरी लिखित भाषेत फारसा फरक नसतो.पिढ्या न् पिढ्या विशिष्ट राज्यात स्थायिक झाल्यामुळे मराठी भाषकांच्या मूळ मराठी बोलीवर त्या राज्याच्या स्थानिक भाषेचा ठसा सुस्पष्टपणे उमटलेला दिसतो. त्यामुळे ' मी मराठी बोलतो' असे कुणी विधान केले तर ' कुठली मराठी बोलता?' असा प्रश्न आपोआपच उपस्थित होतो. कारण मूळ मराठी भाषेचे व्याकरण जरी एकच असले तरी स्थानमहात्म्यानुसार मराठी बोलीचे ' कोंकणी,कोल्हापुरी,कारवारी,अहिराणी,मराठवाडी, नागपुरी, असे अनेकविध प्रकार कानांवर पडतात. "लाडसक्का वाणी" समाजाची "लाडसक्की" ही मातृभाषा या पैकी "अहिराणी" या गटात मोडते.
भौगोलिक परिसरा नुसार कोल्हापुरी,चंदगडी,नागपुरी, मराठवाडी,कोकणी,वऱ्हाडी,बेळगावी,मालवणी,मोरस मराठी,झाडीबोली,तंजावर,बगलांनी,नंदुरबारी,खाल्यांन्गी, वर्ल्यांगी,तप्तांगी,डोंगरांगी,जामनेरी,खानदेशी असे बोलींचे आणखी उपप्रकार होतात. "लाडसक्का वाणी" समाजाची "लाडसक्की" ही मातृभाषा या पैकी ""खानदेशी" या गटात मोडते.गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यांमध्ये बोलल्या जाणार्या "भिल्ली,बागलाणी,भिल्ली (खानदेश),भिल्ली(सातपुडा),लेवा,डांगी,अहिराणी,
लेवापातीदार,गुजरी इ.भाषेतील काही शब्दांचा समावेश "लाडसक्की" भाषेत झालेला आढळतो.
"लाडसक्का वाणी" समाजाची "लाडसक्की" भाषा ही खानदेशात बोलल्या जाणार्या "अहिराणी" या भाषेची पोटभाषा समजली जाते.शब्दांमध्येये नाद आणि लय हे या बोलीचे वैशिष्ट्य आहे. भालचंद्र नेमाडे, ना. धों. महानोर, के.नारखेडे या लेखकांनी आपल्या साहित्यात या बोलीचा वापर केला आहे.जामनेर, भुसावळ, जळगाव, बांदवर, रावेर, यावल इ. तालुक्यात स्थिरावलेल्या "लाडसक्का वाणी" समाजाच्या "लाडसक्की" भाषेवर "तावडी" या बोली भाषेचा प्रभाव असल्याचे आढळून येते. 'क' च्या जागी 'ख' चा उच्चार केला जातो. उदाहरणार्थ- डोखं (डोकं), मोखा (मोका). बहिणाबाई चौधरींच्या कवितांमधून "तावडी" बोलीचा आविष्कार दिसतो. पुर्वी या बोलीला "अहिराणी" समजत असत परंतु नवीन विचारानुसार ही स्वतंत्र बोली मानली गेली आहे.
वर्हाडात स्थायिक झालेले "लाडसक्का वाणी" समाज बांधव मराठीतील 'ड'चा 'ळ', 'ळ'चा 'य' असा उच्चार करतात.जसे, 'नदीच्या गायात, गाय फसली' (नदीच्या गाळात गाय फसली). तसेच "जो" हा प्रत्यय असलेली देईजो, येईजो, घेईजो अशी रूपे येतात. फारशी व हिंदीचा प्रभाव या बोलीवर आहे. म्हाइंभट यांचा 'लीळाचरित्र' हा मराठीतील पहिला गद्यग्रंथ वऱ्हाडी बोलीत लिहिला गेला. महानुभाव पंथातील अनेक रचना याच बोलीतून झाल्या आहेत.
धुळे,नंदुरबार या भागात स्थायिक झालेल्या "लाडसक्का वाणी" समाज बांधवाच्या "लाडसक्की" भाषेवर "देहवाली" या भिल्ल समाजात बोलल्या जाणार्या बोली भाषेचा प्रभाव आढळते. गुजराती आणि हिंदी भाषेचा यावर मोठा प्रभाव आढळतो. बोलीची गुजरातीशी वाक्यरचनाही मिळतीजुळती आहे.या भाषेचे "खळवाड" आणि "मेवासी " असे दोन पोटप्रकारही आहेत. देहवाली च्या मूळ स्वरात 'ळ', 'क्ष' आणि 'ज्ञ' ही व्यंजने नाहीत, तर 'छ', 'श' आणि 'ष' यांच्याऐवजी 'स' हे एकच व्यंजन वापरले जाते. या भाषेचे अभ्यासक चामुलाल राठवा यांनी देहवाली मौखिक साहित्य शब्दबद्ध केले आहे. विश्राम वळवी, देवेंद्र सावे, बळवंत वळवी, सोबजी गावीत यांनी या भाषेत लेखन केले आहे. भाषासाहित्य प्रकल्पाअंतर्गत अकादमी द्वारे हे प्रसिद्धही झाले आहेत.
मध्य आशियातून भारतात स्थलांतरीत झालेल्या "सका/शक/Scythian" लोकांचा लाड देशात(सध्याचा दक्षिण गुजरात) स्थिरावलेला वाणी म्हणजे व्यापारी समाज "लाडसक्का वाणी" या नावाने ओळखला जातो.हा समाज "व्यापारी" समाज असल्याने व्यापार करताना इतरांना कळू नये म्हणून "नंदभाषा " ही एक सांकेतिक भाषा इतिहासात वापरत होता. आजही काही ठिकाणी तीवापरात आहे. त्या भाषेमध्ये चलनाच्या उल्लेखांसाठी निराळे शब्द आहेत. उदाहरणार्थ भुरका - एक, आवरू - दोन, उधानू - तीन, पोकू - चार, मुळू - पाच, शेली - सहा वगैरे. विसोबा खेचर (नामदेवांचे गुरू) यांनी या नंदभाषेच़ा वापर करून शंकराची स्तुती करणाऱ्या काव्यरचनाही केल्या आहेत.
"लाडसक्का वाणी" समाजाच्या "लाडसक्की" या मातृभाषेचे हे असे अनेक पैलू आहेत.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी
व्यवस्थापक
फेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या दीड लाख)




Comments