लीड्स,यु.के.ची खाद्य संस्कृती
- dileepbw
- Nov 20, 2021
- 1 min read
"लीड्स,यु.के.ची खाद्य संस्कृती"
खानदेशी "खाद्य संस्कृती" मधील मांडा,दाल बाटी, मांडळ,कोंडाळे,चुरमा,चोटाना लाडू,शेवना लाडू इ. पदार्थ एकाच ठिकाणी,एकाच वेळी चाखायला मिळाले तर काय बहार येईल नाही ?
संपूर्ण जगभरातील "खाद्य संस्कृती" एकाच ठिकाणी, एकाच वेळी चाखायची संधी मला "रेड अँड हॉट,लीड्स, इंग्लंड या ठिकाणी अनुभवायला मिळाली.
जेवणापूर्वी 'वदनी कवळ' म्हणणारी भारतीय संस्कृती एका रात्री पुरती बाजूला ठेवून "खाण्याची विकृती" काय असते याचा या ठिकाणी अनुभव घेतला.
सुरवातीस "आपोष्णी" म्हणून चिअर्स,चिअर्स म्हणून ग्लासावर ग्लास आदळून "वॉर्मिंग अप" केले.आज कालच्या विवाह संस्कृतीत रूढ झालेली "बुफे" पध्दत व देश-विदेशातील खाद्य पदार्थ जागेवरच मागणी प्रमाणे करून देणारे स्टॉल्स् व प्रत्येक खंडातील वैशिष्ट्यपूर्ण अशा तयार पदार्थांचे स्टॉल्स् अशी या "रेड अँड हॉट" उपहारगृहाची रचना होती.
भारतीय भजी,सामोसे,बटाटेवडे, रोटी,नान,पराठे, चायनीज नुडल्स, इटालियन पिझ्झा व पास्ता, तुर्कस्तानचा शोरमावा,ब्रेडचे नानाविध प्रकार,देशो विदेशीचे पुलाव, बिर्याणी, फ्राईड राइस, जिरा राइस,जपानी सुशी,नानाविध प्रकारचा सॅलड नावाचा भपकेदार झाडपाला,कोशिंबीरी, चटण्या,रायते,पंचामृत,जेवणानंतर खायची डझनावारी डेझर्टस् असा अभूतपूर्व मेनू होता. नुसते पाहूनच पोट भरत होते. मठ्ठा, ताक, सार याची आठवण विसरण्यासाठी फ्रेश लेमन ज्यूस, सोडा,फळांचे रस,खंडीभर प्रकारची आईस्क्रीम्स् होतीच !
त्यामुळे एकाच हाताने जेवण करण्याचे संस्कार विसरून यथेच्छ ताव मारला.देवाने दोन हातांसारखीच दोन पोटे का दिली नाहीत,असे क्षणभर वाटून गेले.सरते शेवटी मसाल्याचे वास तसेच ठेवून,पेपर नॅपकीनने हात,तोंड पुसून "अव्हेंजर" या त्रिमिती सिनेमाचा मनमुराद आनंद लुटला.
"फॉरवर्ड झालो,फॉरवर्ड झालो" म्हणून डंका पिटणार्या तरूण पिढीने स्वच्छ, शुद्ध, निर्मळ,निसर्गदत्त भारतीय संस्कृतीला विसरू नये व भारतीय "खाद्य संस्कृती" लयास जावू देवू नये.असे मात्र नक्कीच वाटून गेले.





Comments