top of page

विवाह समस्या

  • dileepbw
  • Nov 25, 2022
  • 2 min read

लाड सका(शाखीय) वाणी समाजातील विवाह जुळविण्यासाठी समर्पित असलेल्या "संस्कारवाणी,मुंबई" चा या वर्षी "अठरावा उपवर वधू-वर मेळावा" संपन्न होणार !

"संस्कारवाणी,मुंबई" च्या या दैदीप्यमान वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !

लाड सका(शाखीय) वाणी समाजातील सद्याच्या वैवाहिक समस्यांचे निराकरण करायचे असेल तर कठोर आत्मपरीक्षणाची आवश्यकता आहे.

खालील विश्लेषण वाचा व आपल्या प्रतिक्रिया या अभ्यासगटात निर्भीडपणे मांडा :-

उपवर मुलींनो व त्यांच्या पालकांनो कुठेतरी थांबायला शिका रे !

सर्वसाधारणपणे १७/१८ व्या वर्षी मुलगी वयात येते.या वयात साधारण दिसणाऱ्या मुलीही चांगल्या दिसतात.मुळातच सुंदर असल्या तर त्या अधिकच छान रेखीव आकर्षक दिसतात.

विविध लग्नसमारंभात/कार्यक्रमात अशा मुली उठुन दिसतात.बऱ्याच वेळी अशा मुलींना आपणहुन चांगली स्थळे सांगुन येतात विचारणा होते.स्वतःहुन असे कुणी विचारले व जरी ते स्थळ चांगले असले तरी मुलीच्या बापाच्या डोक्यात वारं शिरतं.तो अचानक भाव खायला लागतो.

मुलीला अजुन शिकायचे आहे.करीयर करायचे आहे.स्वतःच्या पायावर उभे करायचे आहे.असे सांगुन अशी चांगली चालत आलेली स्थळे टाळली जातात.

मग काय मुलगी पण अभ्यासाला लागते.चांगली डिग्री मिळवते.तोपर्यंत ती २२/२३ वयाची होते.मग लगेच लग्नाचा विचार करायला हरकत नसते. पण ?

नुसत्या डिग्रीने काय होते.अजुन उच्च शिक्षण घेतले म्हणजे अजुन मोठ्ठे तोलामोलाचे स्थळ मिळेल म्हणुन परत शिक्षण सुरुच रहाते.तोपर्यंत मुली पंचवीशीच्या होतात.अभ्यास करुन करुन तब्बेत बिघडते.चेहऱ्यावरील गोडवा कमी होत जातो.

पुर्वीच्या पिढीत पंचवीशीत पोरींना दोन एक पोर होवुन परत त्या फिरायला मोकळ्या रहायच्या.आता पंचविशीत मुलगी नोकरीच्या शोधात व बाप स्थळाच्या शोधात निघतो.

बरे स्थळ शोधतांना किती किस काढावा ?

सरकारी नोकरीच हवी वा चांगल्या कंपनीत चांगल्या पदावर असावा,खुप खुप पगार असावा,गाडी फ्लॅट हवा,दिसायला चांगला हवा,वयात जास्त अंतर नको व अगदी कमीही नको.एकुलता एक शक्यतो नसावा(सासु सासरे मग कायमच बोकांडी बसतील नां !) आई बाप मुलाजवळ रहाणारे नकोत.धंदेवाईक नको, शेतकरी नको ! फक्त पुणे,मुंबई,बंगलोर सारख्या मेट्रो सिटीतच हवा वा US/UK त !

काय काय म्हणुन अपेक्षा असाव्यात याला मर्यादाच नाही !

बरे सगळा तपास बाहेर बाहेरुनच चालतो.प्रत्येक स्थळात काही ना काही खोट काढत काढत पोरीचे वय २७/२८ वर येवुन पोहोचते ! पोरगी नोकरी करायला लागली असेल तर वा नोकरी लागली नाही म्हणुन चेहऱ्याचे तेज कमी कमी होत जाते.तोलामोलाचे स्थळ मिळणे मुश्किल होत जाते.अजुनही तडजोड करायची तयारी नसते.जिथे नोकरी करते त्याच गावातील स्थळ हवे.आपल्यापेक्षा जास्त पगारवालाच हवा या नादात वये वाढत जातात.मग केव्हातरी कुणालातरी उपरती होवुन २८/३० त लग्ने उरकली जातात.सगळ्यांचा उत्साह तोपर्यंत निघुन गेलेला असतो.

बरे २८/३0 त लग्ने होवुनही यांना मुलाबाळांची घाई नसते.अगोदर सगळे व्यवस्थित झाल्यावरच मुल आणायचे असे यांचे विचार ! तोपर्यंत प्रकृतीचा व शरीराचा आकार पार बिघडुन गेलेला असतो.

मग काय ?

सगळे स्थिर स्थावर झाल्यावर मुलाचा विचार.३४/३५ व्या वर्षी मुल.तोपर्यंत मुलीच्या आईचे / सासुचे वय ६० च्या पुढे.त्यांना स्वतःचेच सुधरत नाही तर त्या काय पोरींचे बाळांतपण व पुढचे सोपस्कार करतील.पण करतात बिचाऱ्या स्वतःची ओढाताण करुन.

नंतर मग ?

मग काय ? ४/६ महीन्याचे बाळ आईच्या / सासुच्या बोकांडी मारुन ह्या चालल्या नोकरीवर.त्यांचाही नाईलाज व बाकीच्यांचाही !

खरे तर वेळच्या वेळी सगळ्या गोष्टी झालेल्या चांगल्या असतात.म्हणुन म्हणतो की उपवर मुलींनो व त्यांच्या पालकांनो, काहीतरी तडजोड करुन कुठेतरी थांबायला शिका रे !

संसारात सगळ्याच गोष्टी मनासारख्या नाही मिळत ! काहीतरी डावं उजवं होतच !

जाणवले म्हणुन लिहीले.गैरसमज नसावा.कुणीही वैयक्तिक घेवु नये.ही नम्र

विनंती.

आपला कृपाभिलाषी,

प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी

व्यवस्थापक

फेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या - ७२७२)

Recent Posts

See All
कुलग्राम व कुलनाम

सर्वांच्या माहितीसाठी लाड सका(शाखीय) वाणी समाजातील धार्मिक कार्ये ज्यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी केली जातात त्या नाशिकच्या सर्व...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page