"माझे दलितायन - भाग ३"
- dileepbw
- Sep 14, 2022
- 2 min read
"माझे दलितायन - भाग ३"
राम नगरकरांचे "रामनगरी" हे वगनाट्य किती जणांनी पाहिलेले आहे ? भारतीय समाज व्यवस्थेतील "जातीची उतरंड" त्यात फार छान वर्णन केलेली होती.आपल्या सर्वांनीच कमी अधिक प्रमाणात ही "जातीची उतरंड" अनुभवलेली आहे.अगदी काशिनाथ सारखे "दाहक चटके" आपण भोगलेले नसले तरी आपल्या मनाला देखील काही प्रसंगी वेदना झालेल्या आहेतच.त्या आयुष्यभर कुरवाळत बसणार का ? आपण तशा वेदना इतरांना न देणे हाच त्यावर उत्तम उपाय नाही का ? असाच एक प्रसंग सांगतो.
ती तेव्हा पनवेलच्या रयत शिक्षण संस्थेच्या काॅलेजमधे PD ला होतो.पनवेलच्या विठोबा खंडाप्पा हायस्कूलमधे तसेच कुलाबा जिल्ह्यात SSC बोर्डाच्या परीक्षेत पहिला आलेला असून देखील प्रथेप्रमाणे पुण्या-मुंबईला शिकायला न जाता पनवेलच्या नवीनच सुरू झालेल्या व एका प्राथमिक शाळेच्या इमारतीत भरणार्या काॅलेजमधे शिकत होतो.सर्वांना याचे फार कौतुक होते.त्यामुळे माझ्या शाळेच्या बक्षीस समारंभाला माझे काॅलेजमधील सर्व मित्र व प्राध्यापक माझे कौतुक पहाण्यासाठी उपस्थित होते.मी सर्वच विषयात पहिला असल्याने सगळी बक्षीसे मलाच मिळाली होती.त्यामुळे मला स्टेजवरच थांबायला सांगीतले होते.एका मागोमाग एक पुरस्कार जाहिर होत होते व माझे काॅलेजमधील सर्व मित्र व प्राध्यापक टाळ्यांचा कडकडाट करीत होते.माझी छाती गर्वाने फुलत होती.तिला लवकरच जातीयतेची टाचणी खुपसली जाऊन तिच्यातील हवा भसकन बाहेर येणार आहे याची मला कणभर देखील कल्पना नव्हती.
बक्षीस समारंभ संपला.काॅलेजमधील सर्व मित्र व प्राध्यापक यांचा "गराडा" अभिनंदन करण्यासाठी माझ्या भोवती पडला.काय काय बक्षीसे मिळाली ते पहाण्यासाठी माझ्या सभोवती तुफान गर्दी झाली होती.बक्षीसाची पाकिटे फोडल्यावर त्यात पैसेच नसल्याचे आढळले.नुसत्याच पावत्या ! मग आम्ही सर्वजण रोख रक्कम घेण्यासाठी शाळेच्या कार्यालयात गेलो.तेथे गेल्यावर जे कळाले ते माझ्या मनावर खूप मोठा आघात करून गेले.सर्व बक्षीसांसाठी "ब्राह्मण" असणे आवश्यक होते.माझा चेहेराच पडला.बरोबरच्या प्राध्यापकांचा राग अनावर झाला.पण देणगीदारांच्या अटीपुढे त्यांचे काहीही चालले नाही."ब्राह्मण-इतरेजन" वादाचा हा फार मोठा झटका मी न कळत्या वयात भोगला.ही वार्ता काॅलेजमधे गेली.बहुजन समाजाच्या रयत शिक्षण संस्थेच्या काॅलेजने त्याहून मोठी पारातोषिके मला PD मधे पहिला आलो तेव्हा जाहिर केली."जातीयतेचे विषारी बीज" माझ्या मनात रूजवायला हा प्रसंग पुरेसा होता.मी काय त्याचा "विषारी वटवृक्ष" होऊ द्यायचा का ?




Comments