top of page

"आशा भोसले यांचा वाढदिवस"

  • dileepbw
  • Sep 8, 2022
  • 9 min read

आज ८ सप्टेंबर ! मातुल घराण्याकडून माझ्या लाड वाणी समाजाच्या,चिरतरुण,चतुरस्त्र पार्श्वगायिका आशा भोसले यांचा वाढदिवस ! आजही एखाद्या विशीतल्या तरुणाला पाडेल,एवढी प्रचंड ऊर्जा, लगबग त्यांच्यात आहे.८७ व्या वर्षीही त्यांच्यात गाण्याची,स्वर उंचावण्याची क्षमता एवढी आहे की, ऐकणारे थक्कच होतील. ‘ऐंशी वर्षांची म्हातारी बुढी अन् वय काय सांगते सोळा? आंधळा मारतो डोळा...’ या दादा कोंडकेंच्या गाण्यातील मर्म आशाताईंनी आपल्या कर्तृत्वाने सार्थ करून दाखवले आहे.मंगेशकर घराणं हे मंगेशाचाच अवतार आहे. तरीही आशा भोसले हा चमत्कार आहे.तिच्या आवाजात वीज आहे.ती कोसळते,पण ज्या झाडावर पडते ते जळून जाण्याऐवजी उजळून जातं.वादळ आहे पण काहीही उध्वस्त करीत नाही.मादकता तर विलक्षण आहे पण कामुकता नाही.ती गाताना गाण्याप्रमाणे अल्लड बालिका होऊ शकते,यौवनात प्रवेश करू शकते,स्वत:च्या आयुष्याकडे तटस्थपणे बघणारी योगिनीही होते.लताला सरस्वती माना खुशाल, आशा सरस्वतीच्या हातातली वीणा आहेवीणेच्या असंख्य तारांपैकी कोणती न कोणती तार प्रत्येकाला छेदून जाते.सरस्वतीला आपण नमस्कार करतो.आदराने पण लांबून.वींणा आपल्या हाताच्या अंतरावर आहेसं वाटतं.लताचा सूर तुम्हांलाअज्ञात प्रवासाला घेवून जातो.आशा आपल्या घरी येवून गाते असं वाटतं. घरकुलाला ती ऊब देते.आशाताई अघोषित भारतरत्न’ च आहेत, हे कोणताही संगीतरसिक नाकारणार नाही. लतादीदींसोबत कुण्याही गायिकेची तुलना होऊच शकत नाही,हे एकवेळ मान्य केले तरी, लतादीदींच्या तुलनेत आशा भोसलेंचे गानकर्तृत्व कुठेही मागे नाही. उलट आशा भोसले यांच्या सुरांना जी ‘शार्प धार’ आहे, जे माधुर्य आहे, शब्दफेकीची अनोखी नजाकत आहे, ते अन्य कोणत्याही गायिकेकडे नाही.गाण्यांची जेवढी व्हेरायटी; मग ते शास्त्रीय गीत असो, गज़ल असो, मादकगीत असो, भक्तिगीत-भावगीत असो, पॉपगीत-कॅबरेगीत असो,लावणी-ठुमरी असो वा कव्वाली असो; सादरीकरणाची खास शैलीतील विलक्षण हातोटी आशा भोसलेंनी जोपासली आहे, जी अन्य कुठल्याही गायिकेच्या वाट्याला आली नाही, याची पावती तर दस्तुरखुद्द लतादीदीही देतात!

"स्वतंत्र छाप" आशाताईंनी संगीतविश्वाच्या सुरील्या दुनियेत उमटवली,तेही लतादीदींसह शमशाद बेगम,गीता दत्त,नूरजहॉं,सुरैया यांसारख्या पट्टीच्या गायिका फिल्म इंडस्ट्रीमध्ये सक्रिय असताना! सर्वांत मोठी गोष्ट अशी की, आशा भोसले यांना वैवाहिक जीवनात, चित्रपटसृष्टीत जो संघर्ष करावा लागला, तेवढा अन्य कुठल्याही गायिकेला नाही! तब्बल सहा दशके रसिकमनावर गारूड घालणार्‍या व आज वय वर्षे ८६ असतानाही तोच मधुर स्वर आशाताईंकडे आजही कायम आहे.

‘मेलोडी क्वीन’ आशाताई यांचा सहा दशकांचा प्रवास अतिशय संघर्षपूर्ण, खडतर असाच राहिलेला आहे. प्रारंभी अतिशय वाईट दिवस त्यांनी आयुष्यात अनुभवलेले आहेत. वयाने जवळपास दुप्पट असलेल्या ज्या व्यक्तीवर नितांत प्रेम केले व लतादीदींसह घरातील सर्वांचाच कडाडून विरोध असताना त्यांचा रोष पत्करून आयुष्याचा जोडीदार म्हणून घरातून पळून जाऊन ज्याची मोठ्या विश्वासाने निवड केली, त्याच्याचकडून म्हणजे गणपतराव भोसले यांच्याकडून विश्वासाला तडा गेल्यानंतर जिव्हाळ्याचे सर्वच लोक गमावल्याचे जे दिवस आशाताईंनी अनुभवले व त्यानंतरही त्या न डगमगता कुणाच्याही सहकार्याविना केवळ आपल्या गानकौशल्याच्या बळावर ज्या धीरोदात्तपणे उभ्या राहिल्या आणि प्रचंड यशस्वी झाल्या, त्याला खरोखरच तोड नाही! ‘संघर्षाचं प्रतीक’ म्हणूनही आशाताईंकडे पाहिल्यास ते वावगं ठरणार नाही. कारण ती वस्तुस्थिती आहे. त्यांच्या जागी अन्य दुसरी कुठलीही महिला राहिली असती, तर कदाचित कधीच आत्महत्या करून मोकळी झाली असती. कारण, पदरात दोन मुले टाकून व गर्भात एक बाळ सोडून गणपतराव भोसले व त्यांचे बंधू आशाताईंच्या जिवावर उठले होते.अतिशय घाणेरडी वागणूक मिळाल्याने आशाताईंनी ६० साली गणपतराव भोसले यांच्याशी घटस्फोट घेतला होता, हा सत्य परंतु कटु असा खाजगी इतिहास आहे. आपल्या इच्छेविरुद्ध आपल्याच स्वीय सचिवासोबत लग्न केले म्हणून संपूर्ण मंगेशकर कुटुंबाच्या कर्त्या करवित्या लतादीदी यांचीही साथ-जिव्हाळा त्या गमावून बसल्या होत्या. गणपतराव हे लतादीदींचे स्वीय सचिव होते. लग्नाच्या वेळी आशाताईंचं वय १६ तर गणपतराव ३१ वर्षांचे होते. अशा कठीण दिवसांत आशाताईंनी कारकीर्द घडवायला प्रारंभ केला तेव्हा त्यांना अनेक खडतर, कटु अनुभवांचा सामना करावा लागला. कुणी गाणे गाण्याची संधी देत नसत, अन्य गायिकेने नकार दिलेली गाणी त्यांच्या वाट्याला येत असत, अल्प मानधनावर त्यांना टुकार गाणी गावी लागत असत. बी ग्रेड, सी ग्रेड नायिकांवर चित्रित असलेली गाणी त्यांना गावी लागत असत. हे सर्व आशाताईंच्या वाटेला प्रारंभी येत गेलं व आशाताईंनीही नशिबाचे भोग समजून ते स्वीकारलं. स्वीकारण त्यांना भागच होतं, परिस्थितीच तशी होती! मात्र त्यांनी, मिळालेल्या या प्रत्येक संधीचं सोन्यात रूपांतर केलं, असं की ‘देखनेवाले देखतेईच रह्य गये!’ प्रत्येक गाणं तन-मन ओतून असं काही तडाखेबाज गायलं की बस्सं!

आशाताईंच्या वाईट दिवसांमध्ये गुरुदत्त यांची पत्नी गीता दत्त, शमशाद बेगम, लता मंगेशकर या फिल्म इंडस्ट्रीतील टॉपच्या गायिका होत्या. पुढे पंचमदांची साथ मिळाल्यानंतर आशाताईंनी एकापेक्षा एक अशा गाण्यांची ज्या गोडव्याने बरसात केली, त्याने ‘चिंब’ झालेले रसिकमन कधीच ‘कोरडे’ होत नाही. लावणी, भावगीतं-भक्तिगीतं, गज़ल, पॉप, उडत्या चालीतली गाणी, लोकगीतं, कव्वाली, रवींद्र संगीत आदी सर्वांमध्ये आशाताईंनी अमिट मुद्रा उमटवली.

१९४३ साली ‘माझा बाळ’ या चित्रपटात दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘चला चला नव बाळा...’या गाण्याने आशाताईंनी चित्रपट गायनाला प्रारंभ केला होता. ४८ साली हंसराज बहल यांच्या ‘चुनरियॉं’ या चित्रपटात ‘सावन आया...’हे गीत गाऊन आशाताईंनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं.५३ साली बिमल रॉय यांनी ‘परिणीता’साठी आशाताईंना संधी दिली, ५४ साली राज कपूर यांनी ‘बूट पॉलिश’मध्ये मोहम्मद रफी यांच्यासोबत ‘नन्हे मुन्ने बच्चे तेरे मुठ्ठी मे क्या है...’ गायला दिलं. पुढे ओ. पी. नय्यर यांनी ५६ साली ‘सीआयडी’साठी संधी देऊन आशादीदींच्या पदरात मोठं यश दिलं. ५७ साली ‘नया दौर’मध्ये ओपींच्या उडत्या चालीवर रफीसाहाबसोबतचं ‘मॉंग के साथ तुम्हारा’, ‘उडे जब जब जुल्फे तेरी’, हेमंतकुमार यांच्या संगीतातलं ‘जागृती’मधलं ‘दे दी हमे आझादी बिना खड्‌ग बिना ढाल, साबरमती के संत तुने कर दिया कमाल’, सी. रामचंद्र यांचा संगीतसाज आणि भरत व्यास यांनी रचलेलं ‘नवरंग’मधलं ‘आधा है चंद्रमा रात आधी’, ‘तू छुपी है कहॉंऽ मै तडपता यहॉं’, जयदेव यांचं संगीत असलेलं देव आनंद-साधनावरचं ‘हम दोनो’मधलं रोमॅण्टिक ‘अभी ना जाओ छोडकर के दिल अभी भरा नही’, ‘काला पानी’तलं देव आनंदला विनंती करणारं मधुबालाचं ‘अच्छा जी मै हारी चलो मान जाओ ना’,मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेलं ‘मेरा साया’तलं ‘झुमका गिरा रे’, ओपी-कमर जलालाबादींचं ५८ सालच्या ‘फागून’मधलं ‘एक परदेसी मेरा दिल ले गया, जाते जाते मिठा मिठा गम दे गया’, ‘तिसरी कसम’चं लोकगीतं ‘पान खाये सैया हमारो, सावली सुरतीयॉं होठ लाल लाल’, ‘किस्मत’मधलं शमशाद बेगमसोबतचं ‘कजरा मोहोब्बतवाला अखियों मे ऐसा डाला’, ‘पेईंग गेस्ट’मधलं चुलबुल्या नूतनला देव आनंद छेडतो तेव्हाचं ‘छोड दो आँचल जमाना क्या कहेगा’, ‘वक्त’मधलं ‘आगे भीऽ जाने ना तूऽ,पिछे भी जाने ना तू, जो भी है, बस यही एक पल है’, कोंबडी पकडणार्याव ‘बांगडू’ किशोरदांसोबतचं ‘हाल कैसा है जनाब का’, ‘हावडा ब्रिज’मधलं ‘आईयेऽ मेहरबॉं’, झीनतवरचं ‘हरे रामा’तलं ‘दम मारो दम’, ओपींचं ‘चॉंद उस्मानी-किशोरदां यांच्यावरचं ‘बाप रे बाप’मधलं ‘पिया पिया पिया मोरा जिया पुकारे, हम भी चलेंगे सैया संग तुम्हारे’, शहरयार यांनी रचलेलं खय्याम यांनी संगीत दिलेलं ‘उमराव जान’मधलं ‘इन आँखो की मस्ती के, मस्ताने हजारों है’, ‘ये क्या जगहा है दोस्तो, ये कौनसा दयार है’, ‘तुमसा नही देखा’तलं ‘सर पे टोपी लाल, हाथ मे रेशम का रूमाल, हो तेरा क्या कहना’, ‘एक मुसाफिर एक हसीना’तलं ‘बहुत शुक्रिया बडी मेहरबानी’, नासिर हुसेन यांच्या ‘तिसरी मंझील’मधलं अतिशय गोड ‘ओ मेरे सोना रे सोना रे सोना रे, दे दुंगी जान जुदा मत होना रे’, ‘ओ हसीना जुल्फोवाली जानेजहॉं’, ‘आजा आजा मै हू प्यार तेरा’, ‘आदमी और इन्सान’मधलं ‘जिंदगी इत्तफाक है’, ‘अनहोनी’मधलं ‘मैने होठो से लगाई तोऽऽ हंगामा हो गया’, ‘बांगडू’सोबतचं ‘आशा’मधलं ‘इना मिना डिका’, ‘काश्मीर की कली’तलं ‘इशारों इशारों मे दिल लेनेवाले’, गुलजार यांचं ‘मेरा कुछ सामान, तुम्हारे पास पडा है’, हेलनच्या बहारदार नृत्यावरचं ‘कारवॉं’तलं ‘पिया तू अब तो आजा’, ‘मेरे सनम’चं ‘जाईये आप कहॉं जायेंगे, ये नजर लौटके फिर आयेंगी’, ‘ज्वेल थिफ’चं ‘रात अकेली है, बुझ गए दिये’, ‘शिकार’चं ‘पर्दे मे रहनें दो पर्दा ना उठाओ’, ‘द ग्रेट गॅम्बलर’मधलं अमिताभ-झीनतवरचं फॉरेनमध्ये होडीतलं रोमॅण्टिक ‘दो लफ्जों की हैऽऽ दिल की कहानी’,‘पुकार’मधलं ‘बचके रहना रे बाबाऽऽ बच के रहना रे’, परवीनबॉबीचं नृत्य असलेलं ‘जवानी जानेमन हसीन दिलरूबा’,‘हम किसी से कम नही’तलं ‘ये लडका हाये अल्ला कैसा है दिवाना’, ‘चुरा लिया है तुमने जो दिलको’, ‘मुकद्दर का सिकंदर’चं ‘ओ साथी रे तेरे बिना क्या जिना’, ‘लगान’चं ‘राधा कैसे ना जले’ अशी खूप मोठी गाणी आशाताईंची आहेत. मराठीत गदिमा-यशवंत देवांचं ‘उघडी नयन शंकरा, वसंत ये वनांतरी’, ‘सिंहासन’मधलं सुरेश भटांचं ‘उष:काल होता होता काळरात्र झाली’, बहिणाबाईंचं ‘अरे खोप्यामंधी खोपा सुगडिणीचा चांगला’, खेबुडकरांचं ‘सतीचं वाण’ मधलं किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला’, ‘फटाकडी’तलं नांदगांवकरांचं ‘लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा, बेंगलोर गोवा नि काश्मीरला, कुठं कुठं जायाचं हनीमूनला’, हेमंतकुमार यांच्यासोबत गायलेलं सुधीर मोघेंचं ‘हा खेळ सावल्यांचा’मधलं ‘गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय’, पी. सावळाराम यांचं ‘भालू’मधलं ‘गंध फुलांचा गेला सांगून तुझे नि माझे व्हावे मिलन, व्हावे मिलन’, सुधीर फडके उपाख्य बाबुजींसोबत गायलेलं खेबुडकरांचं ‘पान जागे फूल जागे, भाव नयनी जागला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला’, भटांचं ‘चांदण्यात फिरताना माझा धरलास हात’, शांता शेळके यांनी रचलेलं ‘जिवलगा, राहिले रे दूर घर माझे, पाऊल थकले, माथ्यावरचे जड झाले ओझे’,भा. रा. तांबेंचं वसंत प्रभूंच्या संगीतसाजातलं बाबुजींसोबत गायलेलं ‘तुझ्या गळा, माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा’, ‘शापित’ मधलं सुधीर मोघेंचं गीत आणि बाब 'राष्ट्रीय पुरस्कार', असंख्य 'फिल्मफेअर पुरस्कार', मध्य प्रदेश सरकारचा 'लता मंगेशकर पुरस्कार', 'महाराष्ट्र सरकारचे १५ पेक्षा जास्त पुरस्कार' आणि नुकताच २००८ मध्ये मिळालेला 'पद्मविभूषण पुरस्कार' - हे पुरस्कार आशाताईंना बहाल करण्यात आले आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार ‘दादासाहेब फाळके सन्मान’ आशाताईंना २०००-२००१ मध्ये प्रदान करण्यात आला. भारत-पाकिस्तान असोसिएशनचा ‘नाईटिंगेल ऑफ एशिया’ हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. तसेच ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्या हस्ते, बी.बी.सी.आकाशवाणीच्या वतीने 'जीवनगौरव पुरस्कार'ही त्यांना देण्यात आला. आशाताईनी आजपर्यंत सुमारे ९०० चित्रपटांना आवाज दिला आहे. त्यांनी आत्तापर्यंत १४ भाषांमध्ये सुमारे १२००० गाणी गायली आहेत.

लता म्हणजे ब्रॅडमन,आशा म्हणजे सोबर्स - अष्टपैलू.’ इति आर.डी.बर्मन ! जगात दोनच भोसले झाले. एक शिवाजीराव आणि दुसरी आशा भोसले. बाकीचे नुसतेच बाबासाहेब भोसले !

'मला आयुष्यभर एक सल आहे.मी कायम ‘नंबर टू’ राहिले.’ इति आशा भोसले.‘आमची आशा भन्नाट गाते.मला सगळ्यात आवडणारं तिचं गाणं म्हणजे रोशनचं ‘निगाहे मिलाने को जी चाहता है’ इति लता मंगेशकर.

मी महाराष्ट्रात, महाराष्ट्राबाहेर व परदेशात इतक्या लोकांशी बोलल्यावर माझं असं इम्प्रेशन झालंय आणि ते चुकीचं नाही की आशा लतापेक्षा काकणभर जास्तच लाडकी आहे,पण कमी नाही. हे आशालाही माहित्येय,पण तिच्या हातातला केशरी दुधाचा प्याला ओठांपर्यंत जाईपर्यंत त्यात मिठाचा खडा पडतोच.तो अहेतुकपणे टाकणारी कोण तर सख्खी थोरली बहीण.तिनं काय केलं? काही नाही, फक्त गायली, गायली आणि गायली. लता आधी आली, मोठी झाली व मोठीच राहिली. आम्ही कानसेनांनी स्वेच्छेनं तिची गुलामी पत्करली. आशा हतबुद्ध झाली आणि तरीही दिमाखदार चौकार आणि षटकार मारत राहिली. हार मानणं तिच्या रक्तातच नव्हतं. मास्टर दीनानाथांचं रक्त. तेच थोरलीत होतं, तेच धाकटीत होतं. लता लता असेल तर आशा आशा होती. फक्त आम्ही लताचे होतो आणि आशाचे होण्याचा प्रयत्न करीत होतो. माझे प्रयत्न यशस्वी होताना दिसतायत आता आता..

आशा लताच्या शिफारसीनं, पाठिंब्यानं व प्रोत्साहनानं या क्षेत्रात आली नाही. हे रोपटं स्वतंत्र रुजलं, स्वतंत्र वाढलं व स्वतंत्र फोफावलं. बाजूलाच एक महावृक्ष फोफावला होता. हा ना त्या रोपट्याचा दोष ना त्या वृक्षाचा. सुरुवातीची पाच-दहा वर्षे आशाच्या वाट्याला क्लब डान्सर, सहनायिका व दुय्यम स्त्रीभूमिकांच्या वाट्याला असलेली फुटकळ, उडती गाणी आशानं गायली हा फार मोठा गैरसमज आहे. ‘रामन’मध्ये लताच्या विनोदनं आशाला दहापैकी आठ गाणी दिली होती. ती गाजली नाहीत म्हणून त्यांना उडती व फुटकळ म्हणायचं वाटतं? ‘ठोकर’मध्ये सरदार मलिकनं आशाला आठपैकी सहा गाणी, ‘पापी’मध्ये एस. मोहिंदरनं आठपैकी सहा गाणी व ‘राजमहल’मध्ये पं. गोविंदरामनं सातपैकी सहा गाणी आशाला दिली होती. रोशन (९९ गाणी), सी. रामचंद्र (१३२), खय्याम (९०), हेमंतकुमार (७८), एस. डी. बर्मन (१४०), मदनमोहन (१९०), कल्याणजी आनंदजी (२९७), लक्ष्मीकांत-प्यारेलाल (४८५) या दिग्गजांनी वेचून फालतू गाणी आशाला दिली असं कोणायला म्हणायचंय का?

लता सार्वभौम होती त्या पन्नास ते साठ या हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णदशकाच्या कालखंडात आशा अस्तित्वात अवश्य होती, पण ती नंतर झाली तशी राज्यकर्ती नव्हती. तिला आपला बालेकिल्ला पूर्णपणे गवसला नव्हता. ती शब्द चावून म्हणायची. आवाजात थोडी कृत्रिमता व चोरटेपणा होता. शब्दांची फेक तोकडी पडायची. आवाज गुदमरतोय व मोकळा व्हायला धडपडतोय अशी ऐकताना भावना व्हायची. आत्मविश्‍वासाचा अभाव हेच याचं संभाव्य कारण दिसतं. एरव्ही इतक्या दाणेदार व पल्लेदार आवाजाच्या मालकिणीला कसली आल्येय डर?

हा आत्मविश्‍वास तिला ओ. पी. नय्यरनं दिला. शमशाद व गीता दत्त यांना बाजूला सारून आपण ओ.पी.च्या प्रमुख गायिका झालोय या विचारानं तिच्यातली खरी आशा बाहेर आली. तिला मोकळं रान मिळालं. (ओ.पी.कडे लताच्या स्पर्धेचा प्रश्‍नच नव्हता.) आशाच्या पंखांना गरुडाचं सामर्थ्य देण्याची किमया नि:संशयपणे ओ.पी.च्या ठसकेबाज संगीतानं केली. ओ. पी.नं आशा घडविली हे जितकं खरं आहे तितकंच आशानं ओ.पी.च्या संगीताला चार चाँद लावले हेही तितकंच खरं आहे. दोघांनाही एकमेकांची नितांत आवश्यकता होती आणि कानसेनांना या दोघांची! ‘छम छम छम’ (१९५२) ते ‘टॅक्सी ड्रायव्हर’ (१९७३) या एकवीस वर्षांत ५१ चित्रपटांत ओ.पी.नं आशाला १६२ ‘सोलो’ व १५४ द्वंद्वगीते दिली. त्यातल्या या थोड्यांवर नजर टाका – ‘जाइये आप कहाँ जायेंगे’ (‘मेरे सनम’), ‘आँखों से जो उतरी है दिल में’ (‘फिर वही दिल लाया हूं’), ‘यही वो जगह है’ (‘ये रात फिर ना आयेगी’), ‘आओ हुजूर’ (‘किस्मत’), ‘कुछ तो ऐसी’ (‘कैदी’), ‘छोटासा बालमा’ (‘रागिनी’), ‘आइये मेहरबाँ’ (‘हावडा ब्रिज’), ‘रातों को चोरी चोरी’, (‘मुहोब्बत जिंदगी है’), ‘ये है रेशमी’ (‘मेरे सनम’), मैं शायद तुम्हारे लिए’ (‘ये रात फिर ना आयेगी’), ‘जरासी बात का हुजुरने’ (‘मुसााफिरखाना’), ‘जादूगर सावरिया’ (‘ढाके की मलमल’), ‘बेईमान बालमा’ (‘हम सब चोर है’), ‘छुन छुन घुंगरू बोले’ (‘फागून’), ‘पूछो न हमें’ (‘मिट्टी में सोना’), ‘मेरी जान तुमपे सदके’ (‘सावन की घटा’), ‘चैन से हमको कभी’ (‘प्राण जाये पर वचन न जाये’)…

बघता बघता आशा महाराणी झाली.थोरली आधीच होती.

आशा दत्तपाड्यात (बोरिवलीला) एका लहान घरात राहत होती तेव्हा तिला भेटायला तिची आई-माई आली. आशा तेव्हा घरातील कामे करीत होती. ते पाहून माई म्हणाली, ‘या असल्या कामांसाठी तुझा जन्म झालेला नाही. लक्षात ठेव, तुम्ही महाराण्या आहात.’

ओ. पी. नय्यर कधीही भेटला की तिरकसपणे मला विचारायचा, ‘क्या कहेती है वो पेडर रोड की दो महारानीयाँ?’ गाण्याच्या ‘रॉयल्टी’वरून रफी व लता यांचा वाद विकोपाला गेला तेव्हा लताच्या समोरच रफी मुकेशला म्हणाला, ‘जाहीर है, आप तो महारानी के साथही होंगे.’ ‘मैं हूँही महारानी.’ लता उसळून म्हणाली, ‘लेकिन उससे आपको क्या तकलीफ है?’

लता व रफी यांच्या एकापेक्षा एक सरस द्वंद्वगीतांइतकेच (नेमका आकडा ४४७) हे ‘रॉयल्टी’वरून झालेलं द्वंद्व मनोज्ञ आहे.

ओ. पी.व्यतिरिक्तही इतर संगीतकारांकडे आशाची उत्तम गाणी आहेत. (संख्या अर्थातच कमी) नमुना म्हणून ही काही गाणी बघा – ‘दिल श्याम से डूबा जाता है’ ‘संस्कार’ अनिल विश्‍वास, ‘दिल लगाकर हम ये समझे’ ‘जिंदगी और मौत’ – सी. रामचंद्र, ‘सबासे से कहे दो’ – ‘बँक मॅनेजर – मदन मोहन, ‘निगाहे मिलाने को’ (कोरस) – ‘दिल ही तो है’ – रोशन, ‘पान खाये सैंय्या’ – ‘तिसरी कसम’ – शंकर-जयकिशन, ‘काली घटा छाये’ – ‘सुजाता’ – एस. डी. बर्मन, ‘किस जगह जाये’ – ‘लाइट हाऊस’ – एन. दत्ता, ‘मेरा कुछ सामान’ – ‘इजाजत’ – आर. डी. बर्मन, ‘पिया तू’ – ‘कारवान’ आर. डी. बर्मन, ‘नजर लागी राजा’ – काला पानी’ – एस. डी. बर्मन, ‘दम मारो दम’ – ‘हरे राम हरे कृष्ण’ – आर. डी. बर्मन, ‘मुझे गले से लगा लो’ – ‘आज और कल’ – रवी, ‘मेरे जीवन में आया है कौन’ – ‘प्यासे नैन’ – एस. के. पाल. ‘दिल चीज क्या है’ – ‘उमराव जान’ – खय्याम, ‘झूठे नैना बोले’ – ‘लेकिन’ – हृदयनाथ मंगेशकर, ‘तन्हा तन्हा यहाँ पे जीना’ ‘रंगीला’ – रहेमान, ‘इन आँखो की मस्ती के’ – ‘उमराव जान’ – खैय्याम.

एकदा मी आशाच्या घरी गप्पा मारीत बसलो असताना आशा मला म्हणाली, ‘माझ्या ‘ये है आशा’ या कार्यक्रमात मी तुमच्या ‘माझी फिल्लमबाजी’ तले गाजरका हलवा वगैरे किस्से सांगते.’

‘काही हरकत नाही.’ मी म्हणालो, ‘मीदेखील माझ्या एकपात्री कार्यक्रमात तुमची काही गाणी म्हणतो. लोक म्हणतात की, मी जास्त चांगला गातो.

लोक म्हणतात, बाबा!’

आशा खळखळून हसली. इतक्या वैयक्तिक निर्घृण आघातानंतर आशा इतकी निर्मळ व खळखळून हसू शकत असेल तर ती फार मोठी गोष्ट आहे. त्यासाठी सिंहाचं काळीज लागतं. आशा जन्मजात लढवय्यी आहे.

जुग जुग जियो, आशाजी. अशाच लढत राहा, हसत राहा, गात राहा.

म्हणा पाहू –

‘पत्ता पत्ता यहां राजदा है मेरा,

जर्रे जर्रे में रख दी है मैंने जुबाँ

पूछते है सभी मुझसे ये हर घडी

भूल बैठे है क्या प्यारको मेहेरबाँ‘

भूल जाओ जो तुम तो मुझे गम नही है

सभी गम के मारे मुझे जानते है

मैं शायद तुम्हारे लिए अजनबी हूँ

मगर चांदतारे मुझे जानते है…’

मला लतादीदींचे गायन "नंदादीपा" सारखे वाटते,तर आशाताईंचे गायन गणपतीच्या आराशीतल्या विद्युत रोषणाई सारखे ! या माझ्या समाज भगिनींना त्रिवार दंडवत !


 
 
 

Recent Posts

See All
"Oppenheimer - Part २०"

"Oppenheimer - Part २०" काल रात्री जावई सागर,कन्या किर्ती,बंधू सुहास,वहिनी प्रतिभा व पत्नीची वहिनी माधवी असा सहकुटुंब सहपरिवार घरबसल्या...

 
 
 
"आपटा रेल्वे स्टेशन"

"आपटा रेल्वे स्टेशन" माझ्या आयुष्यात "पनवेल-आपटा रेल्वे स्टेशन" ला मनोरंजनाच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे. अकरावी,पी.डी.व...

 
 
 
"मृगागड किल्ला, ता.सुधागड,जि.रायगड"

"मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" आपला वर्गमित्र बापू घोडके यांने नुकताच "मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" हा आपल्या सुवर्ण महोत्सवी...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page