कै.लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली
- dileepbw
- Feb 7, 2022
- 3 min read
Updated: Sep 3, 2022
आज दि.६ फेब्रुवारी,२०२२ रोजी नेमक्या माझ्या मातोश्रींच्या ८८ व्या वाढदिवशीच लतादीदींचे दुख:द निधन झाले व मनाला चांगलाच चटका लागला.त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली !
गान सम्राज्ञी "लता मंगेशकर" यांच्या मातोश्री "श्रीमती शेवंती उर्फ शुद्धमती या माझ्या समाजातील "शेठ हरिदास रामदास लाड" यांच्या द्वितीय कन्या ! शेठ हरिदास रामदास लाड हे "लाड वाणी" समाजाच्या "लाड" घराण्यातील सावकार ! तापी नदीच्या तीरावरील "थाळनेर" हे त्यांचे आजोळ म्हणजे माझ्या लाड वाणी समाजाची सांस्कृतिक राजधानी असलेल्या "धुळे" जिल्ह्यातील एक लहानसे गाव ! त्यांना या "माहेरची सय" आल्यावर त्यांच्या आजी म्हणायच्या ते खानदेशमधील माझ्या "अहिराणी" भाषेतले हे गीत आठवलेले दिसते.काय सुंदर गाणे आहे ना ? कवी गवंड्याला सांगतो आहे माझ्या साठी असे घर बांध ज्याला बर्फीच्या विटा,जिलबीच्या खिडक्या,शेवच्या पायर्या असतील व भिंती लिंपायला साखरेचा "गारा" वापरला असेल.
इ.स.१९२७ साली शेठ हरिदास रामदास लाड यांची द्वितीय कन्या शेवंती उर्फ शुद्धमती यांचा शुभ विवाह "मास्टर दिनानाथ मंगेशकर" यांच्याशी झाला व काळाच्या ओघात श्रीमती "शेवंती उर्फ शुद्धमती" यांनी संपूर्ण जगाला "लता,आशा,उषा,मीना व हृदयनाथ" अशी "पंच स्वररत्ने" बहाल केली.त्या पैकी एक "*ल*य" आणि "*ता*ल" म्हणजे "*लता*"! काय सांगावे या स्वररत्नाबद्दल ?
शांत भक्तिगीते जिची ऐकून,सकाळ जागी होते ती लता !
आश्वासक आवाजाने जिच्या दिवस उजाडू लागतो ती लता !
मनमोहक सुरांनी जिच्या संध्या धुंद होते ती लता !
हळुवार स्वरांनी थकवा दूर करणारी अंगाई गाते ती लता !
बागेतल्या मंद हवेत जिची भावगीते ऐकावीत ती लता !
दूर डोंगरांवर जेव्हा ढग उतरतात तेंव्हा झाकोळून टाकते ती लता !
झरझर झरणाऱ्या निर्मल पाण्यासारखी खळखळते ती लता !
नदीच्या शांततेचं आणि समुद्राच्या अथांगतेचं दर्शन घडवते ती लता !
ग्रीष्मात तळपते श्रावणधारेसारखी बरसते भिजवून टाकते ती लता !
थंडगार हवेत मस्त गाण्यातून पश्मीना शालीची उब देते ती लता !
कृष्णाला आर्त साद घालून राधेचं प्रेम सादर करणारी ती लता !
मीरेचं भजन, ज्ञानोबाचं पसायदान गाणारी ती लता !
आईची ममता, बहिणीची माया, मुलीचे आर्जव जागवते ती लता !
उषेची लाली पसवुन आशेला दिशा दाखवते ती लता !
आकाशाची निळाई मीनेवर चढवून हृदयनाथवर सावली धरते ती लता !
कुणीही गायलं तरी तिनं कसं गायलं असतं हे आठवून देणारी ती लता !
ती सदा गातच रहावी, अशी कामना खुद्द गानदेवताच करेल ती लता !
स्वर, सूर, *ल* य, *ता* ल, मेलडीची अनिभिषिक्त सम्राज्ञी लता अशी लुप्त होणार नाही ! भारतरत्नांच्या मांदियाळीतील हा *ल* खलखता ध्रुव *ता* रा *लता* कायमच चमकत राहील !
आज स्वर्गलोकांत आनंदउसत्व साजरा होईल.सनई चौघडे वाजवले जातील.पूर्ण स्वर्गलोकात ठिकठिकाणी फुलांची आरास सजवली जाईल.स्वर्ग लोकांत ठिकठिकाणी कमानी टाकून नेत्रदीपक रोषणाई केली जाईल.स्वर्ग लोकांतील प्रत्येक घरावर गुढी उभारून आकाशकंदील लावले जातील.प्रत्येक रस्त्यावर सुगंधी अत्तराचा सडा मारला जाईल.कारण आज स्वर्ग लोकात येणारी व्यक्ती ही कुणी सामान्य व्यक्ती नसून "भारतरत्न" ने सन्मानित पूर्ण पृथ्वीवर आपलं नावं गोंदवणारी अशी अजरामर व्यक्ती,ज्या व्यक्ती च्या सुमधुर भूपाळीने सकाळच्या सुर्याच आगमन होत.आणि रात्री च्या अंगाईने पृथ्वीवरची मुलं त्याचा लाडिक चाळा थांबवून शांत झोपतात. त्यांच्याच आवाजाच्या साथीने प्रियेसी आपल्या प्रियकराला आपल्या मनोव्यथा सांगते.त्यांच्याच आवाजाने सैन्याला स्फुरण चढत.त्यांच्याच आवाजाने वीरमरण पावलेल्या सैनिकांची यशोगाथा ऐकताना डोळ्यात अश्रूचां पूर येतो. त्यांनी गायलेल्या आरतीने देवांचा साक्षात्कार होतो.असं देवरूप लाभलेल्या आपल्या लाडक्या लता दीदी या आज भूलोकातून स्वर्गलाकात जाणार.आज भूलोकात शोककळा पसरणार.आणि स्वर्गलोकांत आनंद उसत्व साजरा होणार. जरी दिदी आपल्यातून गेल्या तरी त्या त्यांच्या कार्याने त्याच्या आवाजाने या पृथ्वीवर अजरामर राहतील ! त्यांचं वास्तव्य या पृथ्वीवर कायमस्वरूपी राहील.पुढच्या अनंत पिढ्या क्षणोक्षणी त्यांच्या चिरंतन स्मृती सदैव जागृत ठेवतील यात तीळमात्र शंका नाही.
तूच ऊठवले प्रभात समयी
गाऊन भूपाळी छान
तुच निजवलेरात्री आम्हा
अंगाई ग तुझाच मान
बालगिते ती तुझीच एकून
स्वप्नात रमलो विसरून भान
यौवनात केले पदार्पण
तुझीच गाणी ऐकत ऐकत
प्रेम कराया शिकलो मी
विरहात तू मिलनात तू
लग्नात तू मधुचंद्राच्या वेळी
मनात तू कानात तू
अंकुरल्या प्रेमाच्या साक्षीत
तुझेच गीत ओठावरती
डोहाळ्याला तू बारशाच्या सोहळ्याला तू
संसाराच्या सार्या क्षणाला तू
मरणाच्या प्रार्थनेत तू
देवाच्या आळवणीत तू
ये मालिक तेरे बंदे हम
सांगणारी तूच
जन पळभर म्हणणारीतूच
सार जीवन व्यापणार्या तुला
कोटी कोटी प्रणाम
तुझ्या त्या मधात भिजलेल्या स्वरतंतूना सलाम
तूच इतक दिलयस आम्ही काय देणार तुला
एक मात्र नक्की जगाच्या अंतालासारे ध्वनी संपतील
पण एक स्वर गुंजत राहिल
ओम् नमोजी आद्या- - -
आणि देव म्हणतील ही तर लता, जी चिरंजीवी आहे !
दिदी साष्टांग दंडवत !
भावपूर्ण श्रद्धांजली !
"अखेरचा हा तुला दंडवत" या तुम्हीच गायलेल्या गाण्याने मी तुम्हाला श्रद्धांजली देतो !
फोटो शोध सौजन्य - गुगल
सूचना - सदर लिखाण डॉ. दिलीप वाणी © कॉपीराईट आहे.







Comments