top of page

"शोले" मधल्या "बसंती" ची "धन्नो" घोडी व "टांगा"

  • dileepbw
  • Aug 18, 2022
  • 2 min read

Updated: Sep 3, 2022

"Roman Holiday" मधील "Vespa scooter" चा प्रसंग पाहून मला "शोले" मधल्या "बसंती" ची "धन्नो" घोडी आठवली.Gregory Peck व Audrey Hepburn यांनी जसा "Roman Holiday" मधला "Vespa scooter" चा प्रसंग गाजवला तसाच हेमा मालिनी व धर्मेंद्र या जोडीने "शोले" या चित्रपटात पनवेलचा "धन्नो घोडीचा टांगा" गाजवला.


मी अकरावीत असताना पनवेलला रिक्षा अजून आलेल्या नव्हत्या. लाईन आळीतील जग्गू कुरघोडे टांगेवाला,मुस्लिम नाक्यावरचा कय्यूम बेग,पनवेलचे नगरसेवकपद भूषविलेले क्रिकेटियर इब्राहिम पटेल ऊर्फ बाबू टांगेवाला हे पनवेलचे सुप्रसिध्द टांगेवाले ! सुप्रसिध्द यासाठी की सर्वांनीच आपले घोडे व टांगे यांच्या सकट बाॅलीवूडच्या अनेक चित्रपटात टांगेवाल्यांच्या भूमिका वठविलेल्या.

पनवेलच्या इतिहासात टांग्याचे स्थान खुपच महत्वाचे होते. माझ्या शालेय जीवनाच्या काळात "टांगे" हेच गावात प्रवासी साधन होते.पनवेल बस स्टँड समोर ओळींत ऊभे असणारे टांगे मला आजही आठवतात.१९७०-७१ सालची बर्‍याच जणांची अशी आठवण आहे की गावाहून ST ने बस स्टँड वर आलं की रस्ता ओलांडून जकात नाक्या जवळील टांग्याकडे जायचं!


मिडलक्लास सोसायटीला त्या काळी फक्त सोसायटी म्हटलं जात होतं.सोसायटी सोसायटी असं ओरडल्यावर एखादा टांगेवाला येण्याची खूण करी मग त्या टांग्यात बसायचे.टांगेवाल्या शेजारी बसून प्रवास करताना खूप मजा यायची.हळूहळू वाढणारी घोड्याची धांव.अगदी हलकेच हलणारा टांगे वाल्याच्या हातातील चाबूक,लगामाच्या सहाय्याने घोड्याला डावी उजवीकडे वळवणे व थांबवणे हा सगळा प्रकार अद्भुत वाटायचा ! टांगा वळून तो पार दिसेनासा होई पर्यंत टक लावून पहायचा हा अनेकांचा क्रम असायचा.शाळेत असताना मिडल क्लास हौसिंग सोसायटीच्या ग्राउंडवर सुटीच्या दिवशी बहूतेक रविवारी टांग्यांना क्रमांक देण्यासाठी सगळे टांगे जमायचे.एकापेक्षा एक सजवलेले टांगे "नवरदेवा" सारखे सजवलेले घोडे मग छोटेखानी शर्यत ह्वायची.मस्त मजा पहायला मिळायची. काही घोड्यांना मालक मंडळी जाग्यावर नाचवायचे. एकदम मस्त माहोल असायचा.नुकताच "शोले" प्रदर्शित झाला होता.त्यामुळे शोलेतल्या "बसंतीचा टांगा" ह्याच मधला कोणता तो आम्ही शोधत असू.


काही वर्षांनी "मनोरंजन" अस नाव लिहिलेली वेगळ्याच आकाराची "रिक्षा" गांवात आली.तिला दरवाजे होते आणि मागे विविध रंगात गांडूळासारख्या अक्षरात लिहिलेलं "मनोरंजन"! या नावामुळे आम्ही मंडळी तीला "गांडूळ रिक्षा" म्हणायचो. ही रिक्षा पनवेलीस आली व पेव फुटावं तशा रिक्षा सर्वत्र दिसू लागल्या.टांगे हळूहळू गायब झाले. क्वचित प्रसंगी भाजी अथवा ऊसाची मोळी वाहताना टांगा दिसे.मग ऊरली घोड्यांची पाणी पिण्याची मोठ्ठी दगडी आयताकृती द्रोण ! जी अगदी अलीकडे पर्यंत ST stand समोर विसावा हाॅटेल समोर दिसायची.तीही कालौघात अदृश्य झाली त्याजागी रिक्षा उभ्या रहातात.

पनवेलला "पहिली रिक्षा" आली ती श्री.अनिल मठकर यांची ! श्री.वाणी,यशवंत ब्रदर्स,मेवाड हाॅटेल,पनवेल यांचे शेजारी ती उभी असे.नंतर त्यांनी रिक्षा स्पेअर्सचे दुकान देखील टाकले.दुसरी रिक्षा बाबासाहेब खाडे यांची व तिसरी जांभळे भाऊंची !

पनवेलचे सुप्रसिध्द डाॅ.केशव हरी गोखले हे दररोज मिडल क्लास हौसिंग सोसायटीमधून रतन टाॅकीज जवळील आपल्या दवाखान्यात टांग्यातून यायचे.तसेच श्री. दाजीसाहेब भिडे वकील रोज टांग्यातून कोर्टात जायचे. रोजची अशी गिर्‍हाईके सांभाळून पनवेलच्या टांगेवाल्यांनी सिकंदर-ए-आझम व शोले सारख्या भव्यदिव्य चित्रपटांमधून आपले टांगे व घोडे नाचविले आहेत, याचे मनापासून कौतुक वाटते.


फोटो शोध सौजन्य - गुगल

सूचना - सदर लिखाण डॉ. दिलीप वाणी © कॉपीराईट आहे.

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page